सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Updated : बुधवार, 29 जानेवारी 2020 (14:31 IST)

राज ठाकरेंच्या हिंदुत्वाकडे हिंदूंनी कसं पाहावं?

23 जानेवारीला मनसेचा झेंडा भगवा झाला. त्यानंतर अनेक हिंदुत्ववाद्यांना राज ठाकरेंबद्दल ममत्व वाटू लागले आहे. मराठी भाषिक हिंदूंना सावरकरांनंतर चांगला नेता लाभलेला नाही. जे लाभले ते स्वार्थी होते, कुटुंबाच्या भल्यासाठी राज्य धाब्यावर ठेवणारे होते. पण धोब्याने प्रश्न उभा केल्यानंतर रामाने आपल्या प्राणाहून प्रिय पत्नीला दुःखी अंतःकरणाने वनवासात पाठवले होते. त्याने स्वतःच्या कुटुंबाचा विचार नाही केला, त्याने राष्ट्राचा विचार केला, राज्याचा विचार केला... आजच्या राजकारणात इतका मोठा त्याग करावा अशी माझी मुळीच धारणा नाही. पण खरंच आपला नेता जनतेचा विचार करतो का हे पाहणं गरजेचं आहे..  
 
राज यांनी हिंदुत्व हाती घेतल्याने त्यांना एक संधी दयायला हवी किंवा त्यांना स्वीकारायला हवे असे म्हणणे चुकीचे आहे. पहिल्यापासूनच ठाकरेंची वृत्ती ही धरसोड वृत्ती राहिलेली आहे. शिवसेनेचा प्रवासही मराठीवादाकडून हिंदुत्ववादपर्यंत आणि आता बंडल पुरोगामीत्वाकडे सुरू आहे. एखादी राजकीय परिस्थिती समोर येणे आणि त्या परिस्थितीचा फायदा उचलणे हे राजकारण आहे. तसे करायलाही हरकत नाही. पण जेव्हा तुम्ही इतकी वर्षे मांडत आलेले विचार स्वतःच खोटे ठरवता तेव्हा तुमच्या प्रमाणिकपणावर संशय घ्यायला वाव असतो. दुसरी गोष्ट प्रादेशिक पक्ष हे एका कुटुंबाच्या भल्यासाठीच काढले जातात, त्याला अस्मितेची जोड दिली जाते. आणि पालखीचे भोई या पक्षांची पालखी आपल्या खांद्याबर उचलतात. राष्ट्रवादी पवार कुटुंबाचा पक्ष, शिवसेना थोरल्या ठाकरेंच्या कुटुंबाचा पक्ष, मनसे राज ठाकरेंच्या कुटुंबाचा पक्ष... यात राष्ट्र आणि राज्य कुठे आहे. दुर्दैवाने केंद्रातला काँग्रेस पक्ष सुद्धा एकाच कुटुंबाच्या दावणीला बांधलेला आहे. 
 
हिंदूंनी या कुटुंबनियोजन पक्षांकडे अधिक डोळसपणे पाहिलं पाहिजे... राज यांना खरोखर महाराष्ट्राचा विकास करायचा आहे असे जर आपण गृहीत धरले तर सलग 14 वर्षे अपयशी होऊनही नेतृत्वाची धुरा स्वतःच्याच खांद्यावर का पेलली? महाराष्ट्रासाठी मनसे महत्वाची की ठाकरे कुटुंब? असले प्रश्न आपल्याला का पडत नाहीत? आता त्यांनी हिंदुत्व स्वीकारले आहे, म्हणून त्यांनी हिंदूंवर उपकार केलेले नाहीत. आपण असे मानुया की आपण हिंदुत्वाच्या विशाल सागरातला खारटपणा आहोत, खारटपणा आणि सागराला वेगळं करता येत नाही. पण राज हे हिंदुत्वासाठी नवखे आहेत. जरी त्यांचा पूर्वीचा पक्ष हिंदुत्ववादी म्हणून मिरवत होता तरी हिंदुत्वाच्या परीक्षेत ते अजून उत्तीर्ण झालेले नाहीत. तसे ते मराठीवादाच्या परीक्षेतही अनुत्तीर्ण ठरलेले आहेत. 
 
एखाद्या मुलाला कॉमर्स विषय कठीण जातो म्हणून तो आर्टस् घेतो अशी परिस्थिती राज यांची आहे... मराठी विषय त्यांना जड गेला, त्यात ते अनुत्तीर्ण झाले म्हणून नव्या कॉलेजमध्ये हिंदुत्व नावाचा नवा विषय त्यांनी घेतलेला आहे. ते अजूनही विद्यार्थीदशेत आहेत, कॉलेजच्या फर्स्ट इयरला आहेत आणि आपल्यातले काही अतिउत्साही हिंदुत्ववादी त्यांना डिग्री देऊन मोकळे झाले. आधी त्यांना उत्तीर्ण तर होऊ द्या, त्यांना कामे तर करू द्या. राज हे हिंदुत्वाच्या महासागरात नदी बनून आलेत की ऑइल स्पिल बनून आलेत हे अजून कळलेलं नाही. नदी ही सागरात अशी काही मिसळते की तिला आपण सागरापासून वेगळं करू शकत नाही. पण ऑइल स्पिलचा परिणाम आपल्या सर्वानाच माहीत आहे. 
 
म्हणून हिंदूंनी आपले नेते पारखून घ्यावे. राज यांच्या हिंदुत्वाकडे पाहताना हिंदूंनी डोळसपणे पाहावे.  हिंदुत्वाच्या बाबतीत आपण सर्वसामान्य हिंदुत्ववादी राज ठाकरेंचे सिनियर आहोत आणि त्यांच्या 100 पावले पुढे आहोत. एक गोष्ट लक्षात ठेवा, हिंदुत्वाला राज ठाकरेंची आवश्यकता नाही. पण राज ठाकरेंना हिंदुत्वाची आवश्यकता आहे.
 
लेखक: जयेश शत्रुघ्न मेस्त्री