सोमवार, 7 ऑक्टोबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: शनिवार, 23 सप्टेंबर 2023 (16:38 IST)

'मला पुरुष आणि स्त्री दोन्ही आवडत होते, मग एके दिवशी कळलं, मी बायसेक्शुअल आहे'

viraj
आशय येडगे
"मी चौदा वर्षांचा होतो, तेव्हाच मला माझ्या वर्गातल्या मुली तर आवडत होत्याच, पण मला मुलंही आवडू लागली होती. कोण होतो मी? माझं लिंग नेमकं काय होतं? मला मुलं आवडत होती म्हणजे मी 'गे' होतो का? पण मला मुलीही आवडत होत्या, मग मी नेमका कोण होतो? माझ्या लैंगिक ओळखीबाबत मनात निर्माण झालेल्या या प्रश्नांनी मला त्या वयात भंडावून सोडलं होतं.
 
"मराठवाड्यातल्या एका खेडेगावात मला या प्रश्नांची खरीखुरी उत्तरं देऊ शकणारं कुणीही माझ्या आवतीभोवती नव्हतं.
 
"मी अनेक पुस्तकं वाचली, अनेक व्हीडिओ बघितले. त्यातून मला LGBTQIA+ समाजाबद्दल, तृतीयपंथी व्यक्तींबद्दल, समलिंगी समूहाबद्दल बरंच काही कळलं. पण माझ्या शरीर आणि मनात पुरुष आणि स्त्रियांबद्दल असणाऱ्या आकर्षणाबाबत मला नेमकी उत्तरं मिळत नव्हती.
 
"मी प्रचंड निराश झालो होतो, गोंधळलो होतो...."
 
पुण्यात राहणारा 27 वर्षांचा विराज आज त्याची ओळख करून देताना तो 'बायसेक्शुअल' असल्याचं मोठ्या आत्मविश्वासाने सांगतो. त्याला पुरुष आणि स्त्री या दोन्ही लिंगांच्या व्यक्तींचं लैंगिक आणि भावनिक आकर्षण असल्याचं तो मान्य करतो.
 
IPSOS नावाच्या एका आंतरराष्ट्रीय संस्थेने केलेल्या सर्वेक्षणामध्ये असं आढळून आलंय की, भारतातील सुमारे 9 टक्के लोक हे स्वतःची लैंगिक ओळख ही बायसेक्शुअल अशी करून देतात.
 
अर्थात हा एका खाजगी संस्थेचा अहवाल असला तरीही आपल्या समाजात बायसेक्शुअल व्यक्तींचं प्रमाण किती आहे हे सुचवण्यासाठी हे आकडे पुरेसे आहेत.
 
दरवर्षी 23 सप्टेंबर हा दिवस 'इंटरनॅशनल बायसेक्शुअलिटी डे' म्हणजेच आंतरराष्ट्रीय उभयलिंगी दिवस म्हणून साजरा केला जातो.
 
अगदीच व्याख्येनुसार सांगायचं झालं तर बायसेक्शुअल व्यक्तींना पुरुष आणि स्त्री या दोन्ही लिंगांच्या व्यक्तींचं लैंगिक किंवा भावनिक आकर्षण असू शकतं.
 
बायसेक्शुअल व्यक्तींना त्यांच्यासारखाच लिंगभाव असणाऱ्या व्यक्तीचं तर आकर्षण असतंच. पण त्यांच्या विरुद्धलिंगी व्यक्तीकडेदेखील ते आकर्षित होऊ शकतात आणि हे आकर्षण लैंगिक अथवा भावनिक कोणत्याही प्रकारचं असू शकतं.
 
बऱ्याचवेळा त्यांना असणारं आकर्षण हे पुरुष किंवा स्त्री या दोन लिंगांपुरतं मर्यादित असत नाही तर त्यांना इतरही लिंगभाव असणाऱ्या व्यक्तींचं आकर्षण असू शकतं त्यामुळे अनेकदा ते स्वतःची ओळख पॅनसेक्शुअल (बहुलिंगी) अशीही करून देतात.
 
एखाद्या व्यक्तीने स्वतःची जी कोणती लैंगिक ओळख शोधली आहे, स्वीकारली आहे त्याचा माणुसकीच्या पातळीवर जाऊन स्वीकार आणि आदर करणं खूप महत्वाचं आहे.
 
बायसेक्शुअलिटी ही एक अत्यंत वैध लैंगिक ओळख असल्यामुळे ती नेमकी काय आहे हे समजून घेण्यासाठी, विराजचा प्रवास जाणून घेणं नक्कीच मदत करू शकेल.
 
शाळेतच 'मी नेमका कोण आहे?' असा प्रश्न पडला होता...
विराजला तो बायसेक्शुअल असल्याचं नेमकं कधी आणि कसं कळलं याबाबत बोलताना तो म्हणतो की, "मी एका ग्रामीण भागातल्या शाळेत शिकायचो. चौदा वर्षांचा होतो तेव्हाच मला माझ्या शाळेतील मुली तर आवडत होत्याच. पण कधी कधी मुलांबद्दलही आकर्षण वाटायचं.
 
"मी स्वतःची लैंगिक ओळख शोधण्यासाठी अनेक पुस्तकं वाचली, व्हीडिओ बघितले. त्यातून सुरुवातीला मला असं वाटलं की मी बहुधा गे (समलिंगी) असेन. मी प्रचंड गोंधळलो होतो.
 
"अशातच मी एका डॉक्टरांना भेटलो. सुदैवाने त्यांना मी नेमकं काय म्हणतोय हे कळत होतं.
 
"त्यांनी माझ्या भावना, माझे प्रश्न, माझ्या मनात निर्माण झालेला गोंधळ नीट समजून घेतला आणि मला पहिल्यांदा बायसेक्शुअलिटी बद्दल सांगितलं. ते हेदेखील म्हणाले की तुला वाटणारं आकर्षण हे अतिशय नॉर्मल आहे.
 
"तू अजिबात जगावेगळा नाहीस आणि विशेष म्हणजे तुझ्यासारखे असंख्य लोक या जगात आहेत. डॉक्टरांनी काही पुस्तकं देखील मला सुचवली आणि त्या वयात मला माझी लैंगिक ओळख कळली होती."
 
'24 व्या वाढदिवशी मी जगाला सांगून टाकलं...'
विराज पुढे शिक्षणाच्या निमित्ताने पुण्यासारख्या मोठ्या शहरात आला. पुण्यामध्ये त्याला LGBTQIA+ समुदायाबाबत माहिती मिळाली.
 
पुरुष आणि स्त्री या दोन लिंगांच्या व्यतिरिक्त इतरही लिंगभाव असणारे लोक त्याच्या आयुष्यात आले आणि अर्थातच स्वतःच्या लैंगिक ओळखीबाबत तो अधिक स्पष्ट झाला.
 
मात्र विराज सांगतो की, "जसजसं वय वाढत होतं तसतशी मनातली घुसमट वाढत चालली होती. मी अजूनही माझ्या कुटुंबियांना, माझ्या मित्रमैत्रिणींना मी नेमका कोण आहे, हे सांगितलं नव्हतं.
 
त्या अर्थाने माझी दुहेरी लढाई सुरू होती कारण स्वतःच्या मनातील नैसर्गिक आकर्षण लपवून केवळ समाजाला दाखवण्यासाठी म्हणून मी एक खोटा मुखवटा घेऊन जगत होतो.
 
त्यामुळं अखेर मी ठरवलं की माझ्या चोविसाव्या वाढदिवशी मी जगाला माझी खरी ओळख सांगून टाकेन."
 
 याबाबत बोलताना विराज म्हणतो की, "6 एप्रिल 2020 ला माझा चोविसावा वाढदिवस होता. त्यादिवशी मी माझं व्हाट्सअप स्टेटस ठेवलं की, मी एक 'बायसेक्शुअल' व्यक्ती आहे. मला पुरुष आणि स्त्री या दोन्ही लिंगांच्या व्यक्ती आवडतात.
 
"आता माझी लैंगिक ओळख तुम्हाला मान्य असेल तर आज संध्याकाळी माझ्या घरी या आपण एकत्र मिळून माझा वाढदिवस आणि माझं लैंगिक अस्तित्व या दोन्ही गोष्टी साजऱ्या करू आणि जर तुम्हाला माझं सत्य मान्य नसेल तर तुम्ही मला खुशाल ब्लॉक करू शकता."
 
विराजच्या या घोषणेनंतर त्याच्या अनेक मित्रांनी त्याचा स्वीकार केला. अनेकांनी त्याच्या लिंगभावापलीकडे जाऊन त्याचं मित्र असणं, माणूस असणं स्वीकारलं.
 
पण विराज म्हणतो की, "त्यानंतर अनेकांनी मला खरोखर ब्लॉकही केलं. ज्या लोकांना मी माझा अतिशय चांगला मित्र मानायचो त्यांनीही मला त्यांच्या आयुष्यातून काढून टाकलं.
 
होमोफोबिया किंवा समलिंगी व्यक्तींबाबत समाजात असणारी भीती मला त्यावेळी पहिल्यांदा बघायला मिळाली."
 
बायसेक्शुअल व्यक्तींवर कुणीही विश्वास ठेवत नाही..
 
स्वतःच्या नात्यांबद्दल बोलताना विराज सांगतो की, "मी एका गे मुलासोबत एक वर्ष रिलेशनशिपमध्ये होतो. त्याकाळात त्या नात्यामध्ये आम्ही दोघेही प्रचंड आनंद होतो. आमच्या भावनिक आणि लैंगिक गरजा ते रिलेशनशिप पूर्ण करत होतं.
 
"काही कारणांमुळे आम्हाला पुढे वेगळं व्हावं लागलं पण अनेक गे मुलांना असं वाटतं की बायसेक्शुअल व्यक्ती या फक्त आणि फक्त मौजमजेखातर गे मुलांसोबत रिलेशनशिपमध्ये येतात आणि नंतर त्यांना एखादी मुलगी मिळाली की ते समलिंगी पुरुषासोबत असणाऱ्या नात्यातून बाहेर पडतात.
 
"यामुळं बायसेक्शुअल मुलांवर नेहमी अविश्वास दाखवला जातो. एवढंच काय मुलीही आमच्यासोबत रिलेशनशिपमध्ये येताना अविश्वास दाखवतात. "
 
विराज पुढे सांगतो, "आम्ही कोणत्याही मुलाकडे आकर्षित होऊ शकतो अशी भीती त्यांना वाटते पण मला हे सांगायचं आहे की एखाद्या नात्यात जो विश्वास, जे समर्पण लागतं ते आम्हीही देत असतो.
 
"प्रत्येक नात्याचा पाया हा विश्वास असतो आणि तोच नसेल तर मग आमच्यासोबत कुणी का म्हणून रिलेशनशिपमध्ये येईल.
 
"उद्या मी जर एखाद्या मुलाच्या प्रेमात पडलो तर मी त्या नात्याबाबत शंभर टक्के प्रामाणिक असेन. मात्र काहीही केलं तरी अनेकांच्या मनात असणारा बायफोबिया काही जात नाही."
 
LGBTQIA+ समुदायाच्या हक्कांसाठी आयोजित करण्यात येणाऱ्या प्राईड मार्चमध्येही विराज सहभागी झालेला आहे.
 
या समुदायाबाबत त्याला आलेला अनुभव सांगताना तो म्हणतो की, "मी एका मार्चमध्ये गेलो आणि मला त्यांच्या एका व्हाट्सअप ग्रुपमध्ये अॅड केलं गेलं. तिथे प्रत्येकाला स्वतःची लैंगिक ओळख सांगावी लागते. मीही मी बायसेक्शुअल असल्याचं सांगितलं आणि दोनच दिवसात मला त्या ग्रुपमधून काढून टाकण्यात आलेलं होतं. त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही बायसेक्शुअल व्यक्तींवर विश्वास ठेवू शकत नाही."
 
बायसेक्शुअल असल्यामुळे योग्यता असूनही विराजला एका कंपनीत प्रमोशन नाकारलं गेल्याचंही त्याने सांगितलं.
 
बायसेक्शुअल म्हणजे फिफ्टी-फिफ्टी आहे का?
बायसेक्शुअल व्यक्तींबाबत बोलतांना अनेकदा हे सांगितलं जातं की, या लिंगभावाच्या व्यक्तींना पुरुष आणि स्त्रियांबाबत वाटणारं आकर्षण हे फिफ्टी-फिफ्टी आहे.
 
त्यांना पुरुषही तेवढेच आवडतात आणि स्त्रियाही तेवढ्याच आवडतात.
 
याबाबत विराज सांगतो की, "असं ठरवून, मोजून मापून प्रेम करता येत नाही. अर्थात हे व्यक्तिपरत्वे बदलत असतं. एखाद्या बायसेक्शुअल व्यक्तीला एखाद्या विशिष्ट लिंगभावाच्या व्यक्तीचं जास्त आकर्षण असू शकतं, एखाद्याला कमी असू शकतं.
 
"पण, सरसकट सगळ्यांना पन्नास टक्के पुरुष आणि पन्नास टक्के स्त्रिया आवडतात असं म्हणणं हे अत्यंत असंवेदनशील विधान आहे. आम्हीदेखील माणसं आहोत. बायसेक्शुअल असणं हे अत्यंत नैसर्गिक आहे. प्रेमाला कधीही लिंग नसतं."
 
बायसेक्शुअल लोकांबाबत असणाऱ्या अविश्वासाचं एक कारण म्हणजे लॅव्हेंडर मॅरेज
स्वतःची लैंगिक ओळख सार्वजनिक न करता केवळ कुटुंब आणि समाजाच्या दाबावाखातर लग्न करून, विवाहबाह्य संबंध ठेवणं म्हणजे लॅव्हेंडर मॅरेज होय.
 
याबाबत बोलताना विराज म्हणतो की, "जर समजा एखादा पुरुष गे असेल किंवा बायसेक्शुअल असेल तर अशावेळेस केवळ सामाजिक दबावाला बळी पडून ते एखाद्या बाईशी लग्न करतात आणि लग्नानंतर त्यांच्या लिंगभावाप्रमाणे एखाद्या पुरुषासोबत लैंगिक संबंध ठेवतात.
 
"असं करणं अत्यंत चुकीचं आहे, यामुळं तीन आयुष्य तर उध्वस्त होतातच पण एखाद्या व्यक्तीने अशा पद्धतीने लॅव्हेंडर मॅरेज केल्याने संपूर्ण बायसेक्शुअल समूह त्यामुळं बदनाम होतो."
 
माझ्या आईला वाटायचं की मी माझ्याकडे लक्ष वेधण्यासाठी बायसेक्शुअल असल्याचं सांगत आहे
पुण्यात राहणारी वीस वर्षांची मधुरीमा स्वतःची लैंगिक ओळख एक बायसेक्शुअल अशी करून देते.
 
तिचं असं म्हणणं आहे की, "पुण्यासारख्या शहरातही तुम्ही बायसेक्शुअल असाल तर अनेकांचा विरोध, अनेकांचे टोमणे सहन करावे लागतात. मुळात तुमच्या कुटुंबातील व्यक्तीच तुमची ओळख स्वीकारत नाहीत.
 
"मला लहान असल्यापासूनच मुलं आणि मुली दोन्ही आवडायच्या. पुढे मी याबाबत खूप वाचलं, संशोधन केलं आणि मी बायसेक्शुअल असल्याचं माझ्या घरी सांगितलं.
 
"माझ्या मोठ्या बहिणीने त्याचा स्वीकार केला, पण आईला असं वाटायचं की मी माझ्याकडे लक्ष्य वेधून घेण्यासाठी किंवा मी काहीतरी 'युनिक' आहे हे दाखवण्यासाठी असं सांगत आहे.
 
"कालांतराने आईनेही माझं अस्तित्व स्वीकारलं. मी खूपच नशीबवान आहे की LGBTQIA समुदायातील इतर व्यक्तींच्या नशिबी येणारा संघर्ष माझ्या वाट्याला आला नाही."
 
मधुरीमा पुढे सांगते, "माझ्यासाठी माझी ओळख सार्वजनिक करणं इतरांच्या तुलनेत तसं सोपं होतं. पण, अनेकांना त्यांच्या लैंगिक ओळखीमुळे बलात्कार, खुनाच्या धमक्या मिळाल्या आहेत.
 
"मी आशा करते की, कधीतरी एक असा दिवस येईल जेंव्हा माझ्या समुदायाला माणूस म्हणून स्वीकारलं जाईल, त्यांच्यासोबत कसलाही भेदभाव केला जाणार नाही आणि त्यांना कसल्याही भीतीशिवाय निवांत जगता येईल.
 
भारतात जिथे अजूनही स्त्री आणि पुरुष या दोन लिंगांच्या पलीकडे मानवी लैंगिकतेबाबत असणारी सामूहिक समज अजूनही विकसित होत आहे, तिथे मानवी लिंगभावाचे वेगवेगळे पदर समजून घेत असताना मोठी कसरत होऊ शकते. पण इंटरनॅशनल बायसेक्शुअलिटी डे सारखे दिवस आपल्याला हे समजून घेण्यामध्ये, याविषयी मोकळेपणाने बोलण्यामध्ये नक्कीच मदत करू शकतात.
 
मुळात आपल्याकडे तृतीयपंथी व्यक्तींबाबत अनेक समज-गैरसमज आहेत, समलिंगी विवाहांचं समर्थन करणारे अनेकजण असले तरी त्याला विरोध करणारेही मोठ्या प्रमाणात आहेत आणि अशा परिस्थितीत बायसेक्शुअल व्यक्तींचा संघर्ष प्रचंड वेगळा आहे.
 
विराज आणि मधुरीमा यांची ही गोष्ट प्रातिनिधिक आहे. मुळात 'आपण बायसेक्शुअल आहोत' हे आधी स्वतः स्वीकारण्यापासून ते समाजाला सांगण्यापर्यंत'चा प्रवास खूप मोठा आणि गुंतागुंतीचा आहे.
 
लैंगिकता ही एक अत्यंत खाजगी गोष्ट असली तरी त्यामध्ये असणारं वैविध्य स्वीकारणं हे अत्यंत गरजेचं आहे.