ज्योती आजीची पूजा
पानसेंची ज्योती आजी म्हणजे जगन्माताच. सगळ्यांना आपलीशी हवीहवीशी वाटणारी.
तिचा मुलगा विनीत आणि विद्या बँकेत नौकरीला असल्यामुळे सकाळी 8.45 ला घर सोडतात. त्या आधी सई सकाळी 8 वा. शाळेत जायला बसमध्ये बसते. ती सगळी घाईगडबड आटोपल्यानंतर घरी दिलीपराव आणि ज्योती दोघेच राहतात. दिलीपराव जरी चार वर्षांपूर्वी रिटायर्ड झाले असले तरी त्यांनी त्यांचे रुटिन छान सेट केले होते. त्यांचे मित्रमंडळ, सहली, गाणे शिकणे वगैरे छंद जोपासली होती. सकाळी मॉर्निंग वॉकला जात ते 10 वा. पर्यंत परतत. ज्योती म्हणजे सईची आजी साठीची झाली तरी संसारात आकंठ बुडालेली. मुलगा सून नात बाहेर पडल्यावर आधी सगळे पसारे आवरते घर स्वच्छ करते. स्वयंपाक झालेला असतो. आंघोळ करून तिच्या आवडीचे काम पूजा करणे. हे करायचे असल्यामुळे आधी फुले तोडणे इ. पूजेची तयारी सुरू असते.
पूजा सुरू करून देव तम्हणात काढून नुकतीच पुजेला सुरुवात करून 'तुझ्या नामाची अपरिमित शक्ती, तेथे माझी पापे किती' हे व्यंकटेश स्तोत्र सुरू असतं तोच दारात दूधवाला दत्त म्हणून महिन्याचे बील घेवून उभा असतो. ते देणं प्राप्त असतं. ती देवाला सांगते
"देवा आज थोडं थांबा हं" असं म्हणून देवांना थांबवते.
दूधवाल्याची जागा कधी गॅस सिलेन्डरवाला, फळवाला, भाजीवाला, गुरखा, भिकारी कोणीही घेतं.
तम्हणातले देव या माऊलीचं 'वर्क इज वर्शिप' बघून मंद मंद हसत असतात. माऊलीचं आता 'धाव पाव रे गोविंदा, हाती घेऊनीया गदा, करी माझ्या कर्माचा चेंदा, सच्चिदानंदा श्रीहरी.... असे म्हणत देवाशी लडिवाळपणे संवाद सुरू असतो.
तेवढ्यात दिलीपराव परतले असतात त्यांना गोळ्या घ्यायच्या असल्यामुळे कपभर दूध गरम करून देते.
आता 'यांत नवल ना तीळभर'......
घटकेत दिसे गजानन घटकेत सूर्याजिपंत नंदन' म्हणत देव देव्हाऱ्यात बसवले जातात. सगळे फोटो पुसून जागेवर ठेवण्यात येतात. तेवढ्या वेळात भांडेवाली बाई भांडी घासून निघताना सांगून जाते पुढे दोन दिवस तिची सुट्टी राहील. ज्योती आजी मान डोलावून 'अनुदिनी अनूतापे तापलो रामराया' म्हणत पूजा चालू ठेवते. हळद कुंकू गंध फुले वाहून होतात. सुगंध दरवळत असतो. वातवरणात प्रसन्नता येते. नैवेद्य दाखवून होतो. गणपतीची करूणाकराची आरती होते मन सद्गदित होतं. तिच्या मनात रोज येतं सगळी अड्जस्टमेंट करणारा फक्त माझा देवच आहे. तिच्या डोळ्यात अश्रू येतात. शेवटी ती आळवते ' अपराध क्षमा आता केला पाहिजे, अबद्ध सुबद्ध गुण वर्णियले तुझे.... गुण दोष न लावावा सेवकाकडे...
देव्हाऱ्यात बसलेले समस्त देव मंद मंद हसत माऊलीला भरभरून आशीर्वाद देत असतात.....
लेखन - स्नेहल खंडागळे