महाजन बंधूंच्या यशस्वी K2K चॅलेंजची गिनीज बुकात नोंद
नाशिकच्या महाजन बंधू फाउंडेशन तर्फे आयोजित के2के (श्रीनगर ते कन्याकुमारी) या विशेष मोहिमेची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये नोंद झाली आहेमहाजन बंधू सध्या सी टू स्काय या त्यांच्या मोहिमेवर असून नेपाळ मध्ये 17500 फूट उंचीवरून हिमवर्षा होत असताना उणे 10 तापमानात डॉ. महाजन बंधूंना ही खुशखबर मिळाली.
यापूर्वी भारताची उत्तरेतून दक्षिणेकडे सर्वात वेगवान सायकल प्रवास प्रकारात अमरिकेतील डब्ल्यूयुसीए अर्थात वर्ल्ड अल्ट्रासायकलिंग असोसिएशनच्या विक्रमांच्या वहीत या मोहिमेची नोंद झाली आहे. गिनीज आणि डब्ल्यूयुसीए यांनी या मोहिमेसाठी 12 दिवसांची वेळ निर्धारित केली होती. नोव्हेंबर 2018 मध्ये श्रीनगरपासून काश्मीर ते कन्याकुमारी हे 3850 किलोमीटर अंतर केवळ 10 दिवस 10 तासात पूर्ण करत त्यांनी विक्रम केला होता. गिनीज बुकने आज (दि. 24) रोजी अधिकृतपणे या विक्रमाची नोंद घेतली.साहसी क्रीडा प्रकारात मोडलेल्या या मोहिमेत आरोग्य आणि शिक्षणाविषयी जागरुकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
5 नोव्हेंबर 2018 रोजी सकाळी 7.44 वाजता लाल चौक श्रीनगर येथून के2के मोहीम सुरू झाली आणि 15 नोव्हेंबरला 5:45 वाजता केप कोमोरिन, कन्याकुमारी बीच (भारतीय द्वीपकल्पाच्या दक्षिणेकडील सर्वात उंच ठिकाणी) समाप्त झाली. तंबाखु मुक्ती आणि खेलो इंडिया या योजनांना समर्थन देण्यासाठी ही मोहीम समर्पित करण्यात आली. यात एकूण 10,000 हँडबिल मुद्रित करून त्या लोकांना वितरित करण्यात आल्या. युवकांना "तंबाखू सोडण्याचे आवाहन करत व्यायाम आणि खेळांच्या सवयी लावण्यास सांगण्यात आले.
यावेळी थेट नेपाळ मधून आपले मनोगत व्यक्त करताना डॉ. महेंद्र महाजन म्हणाले की, माझा असा विश्वास आहे की या मोहिमेद्वारे जनजागृती केल्याने आपल्याकडे निरोगी नागरिक असतील आणि निरोगी नागरिकच एक मजबूत राष्ट्र निर्माण करू शकतात. डॉ. हितेंद्र महाजन यांनी याविषयी माहिती देताना सांगितले की, आम्ही डिसेंबर 2018 च्या शेवटच्या आठवड्यात गिनीजला मोहिमेचे सर्व पुरावे सादर केले होते. त्यानंतर गिनीजच्या अधिकाऱ्यांनी सर्व पुरावे तपासले. विविध प्रश्नांची उत्तरे देऊन अखेर आम्हाला रेकॉर्ड स्वीकृतीबद्दल संदेश देण्यात आला.
या मोहिमेत कठोर मार्गदर्शक तत्त्वांसह आमच्या 6 सहकाऱ्यांनी पुरावे गोळा करणे, संपूर्ण सदस्यांचे साक्षीपत्र, लॉगबुक आणि जीपीएस डेटा भरणे आवश्यक होते. जायंट स्टारकेनचे सीईओ प्रवीण पाटील यांच्यासह वरील काम यथायोग्य पूर्ण करण्यासाठी डॉ. हितेंद्र महाजन यांनी किशोर काळे (सायकलिस्ट, शिवशक्ती सायकल शोरुम), दत्तात्रय चकोर (व्यवसायाने वकील अल्ट्रा सायकलस्वार), विजय काळे (सरकारी नोकरी आणि अल्ट्रा सायकलस्वार), कबीर राचुरे (वकिल, रॅम2019 स्पर्धे मध्ये जाण्यासाठी प्रयत्नशील), सागर बोंदार्डे (छायाचित्रकार आणि व्यावसायिक लघुपट निर्माते) आणि संदीप पराब (चालक) यांचे आभार मानले. संपूर्ण मोहिमेदरम्यान सोबत असणाऱ्या कुटुंब आणि नाशिक सायकलीस्टचे डॉ. महाजन बंधूंनी आभार मानले.