गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: शुक्रवार, 22 मे 2020 (17:32 IST)

मराठी बोला चळवळ की मराठी झोडा चळवळ?

काही लोकांचे आणि बुद्धीचे दूरदूरपर्यंत नाते नसते. म्हणजे अगदी काकाच्या मामाच्या ताईच्या वडिलांच्या सासूच्या सूनेची जाऊबाई हे नाते सुद्धा इतके जवळचे वाटावे इतकी यांच्या बौद्धिकतेची दयनीय अवस्था झालेली असते. फेबसुकवर मराठी बोला चळवळ नावाचे एक पेज आहे, ते पेज चालवणार्‍यांचा आणि बुद्धीचा छत्तीसचा आकडा आहे असे बर्‍याचदा आढळून आले आहे. मागे एकदा अशाच चळवळीतील एक कार्यकर्ता एका सेमिनारच्या वेळी भेटला होता. त्याने आपले निवेदन मांडताना म्हणाले की आपल्या पाल्यांना मराठी माध्यमातच घालायचं कारण इंग्रजी माध्यमातील मुले व्यसनाधीन होतात असे दिसून आले आहे. या बेजबाबदार वक्तव्याने मी उडालोच. मी त्यांना जाब विचारला की असा एखादा अहवाल किंवा संशोधन तुमच्याकडे आहे का? जेणेकरुन हे सिद्ध होईल की इंग्रजी माध्यमातील मुले व्यसनाधीन होतात आणि मराठी माध्यमातील मुले व्यसन करीत नाहीत. मी स्वतः मराठी माध्यमात शिकलेली अनेक मुले पाहिली आहेत जी व्यवस्थित व्यसन करतात. मुळात व्यसन आणि माध्यमाचा संबंधच नाही, असेल तर तो पुरावे देऊन अथवा तर्कशुद्ध पद्धतीने सिद्ध करावा लागेल. मी त्या बौद्धिक दिवाळखोरी झालेल्या भल्या मनुष्य प्राण्याला जाब विचारला तेव्हा त्याच्याकडे उत्तर नव्हतं. तो म्हणाला की हे सिद्ध झालंय असं माझ्या वरीष्ठांनी सांगितलं आहे. आता सांगा यांचा हेतू प्रामाणिक आहे का? मराठी माध्यमातील मुलांची संख्या वाढवण्यासाठी इतके खोटे आरोप करण्याची आवश्यकता आहे का?

मागे एका कार्यक्रमात मी हिंदीतून विषय मांडला कारण ऐकणारे श्रोते हे हिंदी भाषिक होते. यावर मर्द मराठे म्हणवून घेणार्‍यांनी माझ्यावर टिका केली. मी त्या मर्द मराठ्यांना म्हटलं की मग दैनिक सामना हिंदीतून का? तर मर्द मराठ्यांकडे उत्तर नव्हते. कुणी इंग्रजीतून भाषण केले तर मात्र या मराठीच्या कैवार्‍यांना त्यात वावगं वाटत नाही. म्हणजे भारतीय भाषांचा द्वेष आणि परकीय भाषेवर प्रेम. माझं म्हणणं स्पष्ट आहे कोनत्यही भाषेचा द्वेष कधीच करुन नये.

मी एक गोष्ट नमूद करु इच्छितो की मी माझ्या मुलाला मराठी माध्यमात घातले आहे. कारण मुलांना शिक्षण त्यांच्या मातृभाषेतून मिळावे, मराठी भाषा वाचवायची असेल तर मराठी शाळा टिकल्या पाहिजे या मताचा मी आहे. मी या विषयावर पथनाट्य/नाटिका सुद्धा लिहिली होती ज्यास खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. काही पालकांनी नाटिका पाहून आम्ही आमच्या मुलाला मराठी माध्यमात घालू असे सांगितले. या नाटिकेला पुरस्कार सुद्धा मिळाला आहे. आज मी जे काही कमावतो ते मराठी भाषेमुळेच. मी व्यवसायाने लेखक आहे, माझी माय मराठी माऊली माझं पोट भरते... माझं तिच्यावर मनापासून प्रेम आहे. त्यामुळे मी मराठी द्वेष्टा ठरत नाही.

आता मूळ विषयाकडे वळूया. तर या मराठी बोला चळवळच्या फेसबुकपेजवरुन चितळे बंधूंवर टिका करण्यात आली आहे. का? तर त्यांनी आपली जाहिरात हिंदीतून दिली म्हणून.
"नेहमी मराठीत आणि कधीतरी इंग्रजीत जाहिरात करणाऱ्या चितळे बंधू मिठाईवाले यांनी अचानक असा बदल का केला?
हा बदल तुम्हाला आवडत नाही असं त्यांना अत्यंत नम्रपणे सांगा.
#मराठीबोलाचळवळ
#माझ्याभाषेतसेवा"  
ही त्यांची पोस्ट आहे. यात हिंदीविषयी द्वेष नि इंग्रजीविषयी प्रेम दिसून येतं. आता ही पोस्ट वाचून आपल्या लक्षात आले असेल की काही लोकांचे आणि बुद्धीचे दूरदूरपर्यंत नाते नसते असे मी का म्हटले. जाहिरातीचे काही तंत्र असतात, ग्राहक वर्ग असतो. त्या त्या ग्राहकवर्गाला आकर्षित करण्यासाठी त्या त्या भाषेत जाहिराती कराव्या लागतात. उलट मराठी माणूस हिंदीत जाहिराती करुन हिंदी भाषिकांपर्यंत आपले उत्पादन पोहोचवत आहे असा आनंद या भामट्यांना होणे अशक्यच आहे. मागे या बुद्धीची दयनीय अवस्था असणार्‍यांनी एक पोस्ट केली होती त्यात कुणा हिंदी भाषिकाने मराठी लावणी प्रकार हिंदीत आणला व लावणीच्या सादरीकरणाचा कार्यक्रम हिंदीत होता ज्यावर टिका करण्यात आली होती. मी त्यांना म्हटलं साहित्य व कलेची देवाण घेवाण होते हे चांगले नव्हे का? आणि मराठी कलाप्रकार जर इतर भाषेत जाणार असेल तर ही मराठीसाठी अभिमानास्पद गोष्ट नव्हे का? जसे गझल आणि हायकू मराठीत आले आणि मराठीचा अविभाज्य भाग होऊन बसले. तशी लावणी जर हिंदीत गेली तर कितीतरी मोठी देणगी असेल मराठी मातीची. पण या भामट्यांना इतकी साधी गोष्ट कळणं अशक्यच आहे. कारण बुद्धीचा आणि यांचा संबंध शून्य... साहित्य, कला, पाककृती, अध्यात्म यांची देवाण घेवाण होत आलेली आहे.

मी अजून एक गोष्ट स्पष्ट करु इच्छितो की काही बुद्धी गहाण टाकलेले घटक सोडले तर मराठी माणूस हिंदी द्वेष्टा नाही. स्वा. सावरकरांनी मराठी भाषेला नवीन शब्दे दिली, मराठी भाषा शुद्धीचळवळ चालवली, मराठी शब्दांसाठी ते प्रायोपवेशनाच्या वेळी म्हणजेच मृत्यू दारात प्रतिक्षा करत असताना सुद्धा आग्रही होते. तरी त्यांनी हिंदी राष्ट्रभाषेचा आग्रह धरला होता हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मुळात हिंदी व मराठी ही अतिशय जवळची भाषा आहे. हिंदी आणि मराठी आपण देवनागरीत लिहितो, दोन्ही भाषेतल्या अनेक शब्दांत साधर्म्य आहे. दक्षिणेकडून शंकराचार्यांपासून जो भक्ती संप्रदाय सुरु झाला तो महाराष्ट्रात ज्ञानोबा माऊलींनी पुढे नेला आहे. ज्ञाबोला माऊली मराठी भाषेबद्दल किती आग्रही होते हे वेगळे सांगायला नको. पण त्यांनी अन्य संस्कृतीचा, भाषेचा द्वेष केला नाही. माझीया मराठीचे बोलू कवतिके परि अमृतातेही पैजांसी जिंके असं माऊलींनी म्हटलेलं आहे. पण हे पेज चालवणार्‍यांनी कोळश्यातही पैजा हरण्याचे ठरवले असेल तर आपण काय करावे? ज्ञानोबांचा जो नाथ संप्रदाय आहे तो उत्तरेकडचा. नाथ संप्रदाय हठयोगावर आधारित आहे. ज्ञानोबांनी दक्षिणेकडील भक्ती चळवळ आणि उत्तरेकडील नाथ संप्रदाय यांचा संगम घडवला आहे. पंचामृतात जसे वेगवेगळे पदार्थ मिश्रित केल्यावर शरीरासाठी अमृताचे काम करते तसे ज्ञानेश्वर माऊलींनी दक्षिणेकडील भक्ती संप्रदाय व उत्तरेकडील नाथ संप्रदाय यांचे मिश्रण करुन जगाला अमृत दिले आहे. ज्या उत्तरेकडून नाथ संप्रदाय आला त्याच उत्तरेत हे अमृत नामदेव घेऊन गेले. शिखांच्या ग्रंथात नामदेवांचे उपदेश सापडतात. हे का झाले? देवाण घेवाण केल्यामुळेच. पण द्वेषाने पेटलेल्या भयंकर मूर्ख लोकांना याचे ज्ञान होण्याचा प्रश्न उद्भवत नाही. तसे झाल्यास मराठीचे थोर भाग्यच म्हणाले लागेल नाही का? अगदी पाककृतीच्या बाबतीत म्हणायचं झालं तर दक्षिणेकडे तांदळाचं वर्चस्व नि उत्तरेकडे सध्या गव्हाचं वर्चस्व पण मराठी स्वयंपाकात तांदूळ आणि गव्हाचं संगम सापडतं. हा मराठीचा किती मोठेपणा आहे. या संगमातून मराठीने जगाला एक नवीन पाककृती दिली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार आहे का? इतकंच काय तर दक्षिणेकडे जो सांभार नावाचा प्रकार सापडतो जो सध्या महाराष्ट्रातही सुप्रसिद्ध आहे. तो मराठीच्या माणसाच्या नावावरुन निर्माण झालेला आहे. छत्रपती संभाजी महाराजांसाठी केलेला पदार्थ म्हणून त्या पदार्थाचे नाव संभाजीवरुन सांभार पडले आहे. हे या महाभागांना कुणीतरी सांगण्याची गरज येऊन ठेपली आहे.

इतिहासाचार्य राजवाडे म्हणतात की, ''ग्रंथ वाचल्याने मनुष्य विचार करू लागतो. विचारांचा खल झाल्यावर आचार बनतात व नंतर समाजाचे पाऊल पुढे पडते.'' पण इथे तर विचारांचा खल होण्याऐवजी मराठीचे खलपुरुष जन्माला येत आहेत यापेक्षा वाईट गोष्ट कोणती असावी? मराठी परंपरा ही ज्ञानाची आणि बुद्धीची परंपरा आहे. गणपती हे आपलं आराध्य दैवत. गणपती ही बुद्धीची देवता आहे. मग या महाराष्ट्राला बुद्धी गहाण टाकलेले लोक वेढा घालत आहेत हे पाहून आपण पुन्हा बुद्धीच्या देवतेची आराधना नको का करायला?

मराठी बोला चळवळ हे फेसबुक पेज चालवणार्‍यांनी आपल्या बुद्धीचे तापमान तपासले पाहिजे आणि त्यावर उपचार केले पाहिजे. नाहीतर मराठी बोला चळवळ ही मराठी झोडा चळवळ ठरेल. कारण ही चळवळ आता भयंकर द्वेषाच्या पायावर उभारली जात आहे. यात मराठीचे हित कमी आणि आपल्या वैयक्तिक विरोधकांचे अहित मात्र जास्त दिसून येत आहे. बौद्धिक दिवाळखोरी दाखवल्याबद्दल आणि मराठी उद्योगाच्या तंगड्यात तंगडी घातल्याबद्दल आणि अशा अनेक वर नमूद केलेल्या कारणांसाठी मी या मनुष्य प्राण्यांचा निषेध करतो. "विचार हे फार प्रखर असतात. सत्याची बूज राखणं हे विचारवंताचं ब्रीद असतं. सत्य सांगताना अनेकांच्या रोषाला बळी पडण्याचे प्रसंग येतात." असं दूर्गाबाई भागवत म्हणतात. मग कुणाच्या रोषाला बळी पडतो म्हणून सत्य सांगण्याचा मोह आपण आवरता घ्यावा का? नाही नाही... या बुद्धी गहाण टाकलेल्या मनुष्य प्राण्यांवर शब्दांचे प्रहार झालेच पाहिजे. बुद्धीचा वारसा चालवायचा असेल तर हे करणे क्रमप्राप्त आहे. नाहीतर वेळोवेळी बुद्धीची परंपरा सुरु करणार्‍या महाराष्ट्रात बुद्धी नसलेल्यांचे राज्य येईल. वसंत व्याख्यानमाला सुरु झाली ती बुद्धीची जोपासना करण्यासाठी. या महाराष्ट्राला या निर्बुद्ध लोकांपासून वाचवायचे आहे. परंतु दुरिताचें तिमिर जावो या ज्ञानदेवांच्या संदेशाला अनुसरुन हे पेज चालवणार्‍यांच्या अज्ञानाचे तिमिर नष्ट होऊन त्यांना ज्ञानाचा प्रकाश मिळावा असी भाबदी का होईना परंतु आशा करणे सुद्धा गरजेचे आहे. या लेखाचा शेवट राजवाडे यांनी 'भाषांतर' या मासिकात लिहिलेल्या एका उतार्‍याने करतो.

राजवाडे लिहितात, "भाषा ही समाजाचे बंधन आहे. भाषा ही विचाराचे वाहन आहे. भाषा ही धर्माचे पुरस्करण आहे. भाषेशिवाय मनुष्यप्राणी संभवत नाही. भाषा व मनुष्य ह्या दोन वस्तूंचे सामान्याधिकरण आहे. ह्या ईश्वरी देणगीच्या द्वारे एकमेकांची सुखदुःखे आपण एकमेकांस कळवितो. ही मायादेवी उच्चनीच जे जे स्वरूप धारण करील त्या त्या प्रमाणे उच्चनीच विकारांची मोहिनी मनुष्यमात्रावर पडते. सर्व मानवी शक्तता हिच्या कृपाकटाक्षावर अवलंबून आहे. उदार विचारांचे अंकुर या अमृतकळीलाच तेवढे फुटतात. हिच्या अभावी सर्वत्र स्तब्धता व शून्यता राज्य करते. ह्या देवतेची मनोभावेकरून आराधना केली असता सर्व काही प्राप्त होते".

लेखक: जयेश शत्रुघ्न मेस्त्री