सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: शुक्रवार, 1 एप्रिल 2022 (12:53 IST)

मृत्युंजय अमावस्या

गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी म्हणजे फाल्गुन अमावस्येच्या दिवशी हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांची औरंग्याने निर्घृण हत्या केली... या अमावास्येला आपण मृत्युंजय अमावस्या म्हणतो.
 
चाळीस दिवस सतत मृत्यूच्या छायेत वावरूनही तसूभरही न ढळता हिंदवी स्वराज्यासाठी स्वतःचे शिरकमल अर्पण करणाऱ्या संभाजी महाराजांनी त्या मृत्यूवरही विजय मिळवला आणि आपला हिंदू धर्म स्वाभिमानाने जपला. म्हणून ही मृत्युंजय अमावस्या..
 
चालताना साधा काटा रुतला तर आई गं म्हणणारे आपण... कसं सोसलं असेल हो त्या सिहांच्या छाव्याने? अंगावरचे केस उपटले गेले, सालटी काढली गेली, त्यावर मीठ टाकलं गेलं, मिरचीची धुरी देण्यात आली, चाबकांचे फटके मारण्यात आले, हाता पायाची नखे उपटण्यात आली, जीभ छाटली गेली, दोन्ही डोळ्यात तापलेल्या लालबुंद सळया टाकण्यात आल्या.. हात पाय तोडण्यात आले, आणि शेवटी शिर छाटण्यात आले...रोज एक एक छळ. असे किती दिवस?? तब्बल चाळीस दिवस... किती ही सहनशीलता? किती हे धैर्य? किती हे कठोर मनोबल? कुठून आलं हे सर्व? कोणी बळ दिलं इतकं सोसायला? कोणासाठी? कशासाठी सहन केलं? फक्त आणि फक्त स्वधर्मासाठी...
 
आपण खूप थाटामाटात हिंदू नववर्षाचे स्वागत करतो. ज्यांनी हिंदू धर्म रक्षिला त्या छत्रपती पिता-पुत्रांचे आपण साधे स्मरणही करत नाही. त्यांनी मुघलांना रोखले नसत तर सर्व हिंदूंचा सुंता करून मुघलांनी मोठे धर्मांतर घडवले असते. मग.... कोणता हिंदू आणि कोणते नववर्ष ?
 
सर्वच हिंदू बांधव विसरले आहेत असेही नाही.आजही हजारो लाखो हिंदू बांधव संभाजी महाराजांनी ज्या यातना ४० दिवस भोगल्या त्याची थोडी तरी झळ स्वतःला बसावी म्हणून हे ४० दिवस अनवाणी चालतात, अनेक जण एक वेळचे अन्नत्याग करतात, अनेक जण चाळीस दिवस एखादी आवडती वस्तू त्यागतात, एखादा अतिशय आवडता खाद्य पदार्थ त्यागतात, अनेकजण चाळीस दिवस मौन सुद्धा धारण करतात.. जसे जमेल तसे स्वतःच्या देहाला यातना देतात.
 
मृत्युंजय अमावस्येला सर्वांनी जमेल त्या प्रकारे निदान या एका दिवशी तरी वरील पैकी एक पर्याय स्वीकारावा.. शंभू महाराजांच्या बलिदानास आठवावे. त्यांनी सोसलेल्या छळास मनोमन अनुभवावे. त्यांच्या नावाने एक दिवा लावावा. हीच त्यांना खरी सुमनांजली असेल.
 
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय