बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Updated : मंगळवार, 18 ऑगस्ट 2020 (20:42 IST)

आपल्यातील 'मी' शोधण्याचा मार्ग; कोरोना डायरीज

संपूर्ण विश्व आपल्या दैनंदिन कामाकाजात व्यस्त असताना, अचानक कोरोना नामक राक्षसाने केवळ भारतात नाही, तर संपूर्ण जगात प्रवेश केला. हळू हळू एक एक देशाला शिकार बनवत त्याने भारत देखील गाठले. कोरोनामुळे श्रीमंतांच्या आयुष्यात काही फारसा फरक पडला नाही. पण, सामान्य-मध्यमवर्गीय गरीब झाले. जे गरीब होते, ते अति गरीब झाले. आणि भ्रष्टाचारी अजून भ्रष्टाचारी झाले. एक ना अनेक असे लाखो लोक या आजारातून जाताना अनेकांनी आपले आप्त-स्वकीय गमावले. या काळात रोगप्रतिकारशक्तीची नितांत आवश्यकता असताना, कोरोनाच्या भीतीने नकारात्मक शक्ती देखील आपल्या आजूबाजूला वास करत होतीच. या आजाराने लेखक जयेश दादा मेस्त्री यांच्या घरात जेव्हा पाऊल टाकले; त्यावेळी माझ्यासकट अनेकांच्या मनातील कोरोना आणि मृत्यूची भीती तर दूर झालीच, पण त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. असे नेमके काय झाले असेल? तर त्याचे उत्तर तुम्हा सर्वाना जयेश मेस्त्री लिखित 'कोरोना डायरीज'मध्ये सापडणार आहे.
 
जयेश दादा म्हणजे 'दिसामाजी काहीतरी लिहावे' या समर्थांच्या संदेशाला अनुसरन करणारे लेखक. केवळ ते लेखक नाहीत, तर नाट्ककार, कवी, समीक्षक, पत्रकार असे अनेकविध पैलू असणारी असामान्य व्यक्ती आहे. कोरोनाने त्यांच्या वडिलांचे पितृछत्र हिरावून घेतले खरे, पण त्यामुळे त्यांच्या सकट त्यांच्या वाचकांनी माणुसकीचा एक विदारक अनुभव देखील घेतला. वडील हॉस्पिटलमध्ये एडमिट असताना, शासन, प्रशासन यांच्या चालणाऱ्या भोंगळ कारभाराविषयक जेव्हा अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणून त्यांनी आवाज उठवला; त्यावेळी मात्र काही समाजाकंटकांनी अतिशय हीन दर्जाची टीका त्यांच्यावर केली. त्याच दरम्यान त्यांचे वडील गेले. त्यावेळी मात्र, त्यांना खऱ्या माणुसकीचे दर्शन झाले. त्यांनी लिखाण क्षेत्रात केलेल्या प्रामाणिक प्रबोधनाचे ते फळच म्हणावे. एकीकडे त्यांच्या वाचकांनी त्यांना धीर तर दिलाच, परंतु दुसरीकडे वाचकांना एका वेगळ्या जयेश मेस्त्रींचे दर्शन झाले. लेखक लिहीत असतो, समाजात चांगल्या-वाईट गोष्टींवर तो सातत्याने आवाज उठवत असतो. पण, त्याचे खरे कर्तव्य म्हणजे वाईट विचारांच्या अधीन गेलेल्या समाजाला चांगल्या वृत्तीची शिकवण देणे. आ. संभाजीराव भिडे गुरुजी म्हणतात; कि पत्रकाराने आणि लेखकाने समाजरक्षक आणि समाजशिक्षक असावे. संपूर्ण गळून पडलेल्या घराला धीर देताना जयेश मेस्त्री समाजसाठी शिक्षक देखील बनले. त्याचे प्रकट दर्शन कोरोनाची डायरी आहे.
 
कोरोना झालेल्या व्यक्तीला रोगप्रतिकारशक्ती वाढवणे हाच मोठा उपाय आहे. पण एकीकडे छत्र हरपलेल्या वडिलांची जबाबदारी, आयुष्यातील साथीदार गमावणाऱ्या आईला सावरणे आणि दुसरीकडे गळून न पडता, कोरोनाशी यशस्वी झुंज देणे हि गोष्ट सोपी नव्हती. पण ते सहज शक्य झाले, त्याचे कारण अंगात होते ते बळ जगतजननी भारतमाता, छत्रपती शिवाजी महाराज, ज्ञानेश्वर माऊली आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे! महापुरुष केवळ गौरवण्याकरता नसतात, तर ते अनुकरणीय असतात. ज्या ज्या वेळी आपल्या आयुष्यात अंधकार येतो, त्या वेळी डिप्रेशन म्हणून औषधोपचार करण्यापेक्षा महापुरुषांची चरित्रे, ही आपल्याला नवा जन्म देतात. जगतजननी भारतमाता, छत्रपती शिवाजी महाराज, ज्ञानेश्वर माऊली, स्वातंत्र्यवीर सावरकर हे चार जण त्यागाचे प्रतीक. जगतजननी भारतमातेवर असंख्य आक्रमकांनी आक्रमण केले. तिच्यावर अनेक घाव घातले. रक्ताळलेल्या अवस्थेत देखील त्यागातून तिने जगण्याचा मार्ग दाखवला. जगी दाटतो पूर्णतः अंधकार । दिसे मार्ग न लक्ष्मी सर्वस्वी दूर । अशा संकटी कोणी न घाबरावे। शिवाजी चरित्रास भावे स्मरावे ।।(लेखक - आ. संभाजीराव भिडे गुरुजी) जेव्हा आयुष्यात अंधकार येतो त्यावेळी शिवाजी महाराजांचे चरित्र स्मरून संकटाला सामोरे जावे; हेच जयेश मेस्त्री यांनी केले. अवघ्या लहान वयात समाजाने फेकलेले दगड-शेण अंगावर घेऊन देखील ज्ञानेश्वर माऊलींनी अवघाची संसार सुखाचा करीन हेच मागणे देवाकडे मागितले. त्यांनी समाजासाठी सुख मागितले तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी परकीय म्हणजे ब्रिटिशांच्या आणि स्वकीय म्हणजे समाजाच्या देखील अतोनात यातना सहन करून स्वातंत्र्यप्राप्तीचा लढा दिला. या चौघांना स्मरून, अंगीकारून इतकेच नव्हे, तर संपूर्ण समाजाला आपल्या लेखणीतून या चारही महापुरुषांच्या त्यागाची, लढण्याची आठवण करून देत कोरोनावावर त्यांनी यशस्वी मात केली. त्यातून माझ्यासारख्या अनेकांच्या खचलेल्या मनाला देखील धीर मिळाला.
 
आपल्या प्रामाणिक कार्याची पोचपावती आपल्याला आपल्या संकटात जरूर मिळते. जयेश दादांच्या आयुष्यात हा काळ त्यांनी केलेल्या कामाची परीक्षा होतीच; पण त्यांना मिळालेली त्यांच्या वाचक चाहता वर्गाची साथ ही त्या चांगल्या कार्याची पोचपावती होती. माझा आणि दादांचा परिचय म्हणजे अप्रत्यक्षपणे शिकवण देणारे आणि घेणारे गुरु-शिष्यच. मी पत्रकारिताच्या प्रथम वर्षात शिकत होते. त्यावेळी मी वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला आणि दादा परीक्षक होते. त्यांनी दिलेले मार्गदर्शन पाहून मी प्रेरित झाले. आणि मनोमन या क्षेत्रातील पहिला गुरू मानले. त्यांनी कोरोना सारख्या महासंकटात स्वतः ला कोरोना झाल्यावर जेव्हा खचून न जाता विश्वाला 'आता विश्वात्मकें देवें' हा ज्ञानेश्वर माऊलींचा संदेश जागवला, त्यावेळी मात्र आपल्याला योग्य दिशादर्शक गुरू भेटल्याची जाणीव मनाला झाली. 'हिमालयातील महातम्यांच्या सहवासात' या पुस्तकात स्वामी राम असे लिहितात, कि शिष्याला गुरु सुद्धा गुरु असण्याच्या पात्रतेचा असला पाहिजे. जयेश दादांच्या या गुरुत्वाची सिद्धता मला या काळात मिळाली.
 
तुम्हाला 'कोरोना डायरीज' मध्ये थकलेल्या, थांबलेल्या आणि जीवनाला कंटाळलेल्या मनाला नवसंजीवनी मिळणार आहे. संपूर्ण जग नकारात्माच्या अंधकारात असताना सकारात्मक जीवन जगण्याचे गूढ यामध्ये सापडणार आहे. या कोरोना काळात जयेश दादांनी स्वतः मधील 'मी'चा शोध घेतला. आणि त्यांना जे अनुभव आले, ते लेखणीतून त्यांनी साकारले. हि कोरोना डायरी वाचून आपल्याला देखील आपल्यातील मी गवसणार आहे. चला तर मग, आपल्या 'मी'चा शोध घेऊया.
 
कोरोना डायरीज हे पुस्तक विकत घेण्यासाठी तपशील
ई बुक - कोरोना डायरीज
किंमत फक्त 20/-
9967796254 वर Phone pay, paytm करु शकता.
पेमेंट केल्यावर वरील नंबरवर स्क्रीनशॉट पाठवा आणि इ बुक मिळवा

लेखिका: नेहा जाधव.
पत्रकार आणि लेखिका