सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Updated : गुरूवार, 6 जानेवारी 2022 (09:26 IST)

बाळशास्त्री जांभेकरांचे दिवस ते 21 वे शतक, असं बदलतंय पत्रकारितेचं विश्व

ओंकार करंबेळकर
6 जानेवारी या दिवशी महाराष्ट्रात पत्रकार दिन साजरा केला जातो. 1832 साली याच दिवशी बाळशास्त्री जांभेकर यांनी 'दर्पण' वृत्तपत्राला सुरुवात केली होती.
 
बाळशास्त्री जांभेकर यांच्या कार्याची ओळख ज्येष्ठ पत्रकार नीला उपाध्ये यांनी युगप्रवर्तक 'बाळशास्त्री जांभेकर - काळ आणि कर्तृत्व' या पुस्तकात करून दिली आहे. बीबीसी मराठीला त्यांनी 'दर्पण' वर्तमानपत्र, 'दिग्दर्शन' मासिक आणि जांभेकरांच्या आयुष्याबाबत माहिती दिली.
 
त्या सांगतात, "बाळशास्त्री जांभेकरांनी 6 जानेवारी 1832 रोजी 'दर्पण'ची सुरुवात केली. त्यांची नक्की जन्मतारिख उपलब्ध नसली तरी 20 फेब्रुवारी 1830 साली बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीत नोकरीचा अर्ज करताना आपलं वय 17 असल्याचे त्यांनी नमूद केलं होतं. त्यावरून त्यांच्या वयाचा अंदाज येतो.
"या नोकरीसाठी त्यांना 100 रुपये वेतन मिळायचं. त्यानंतर अक्कलकोटच्या युवराजांचे शिक्षक म्हणून प्रतिमहा 120 रुपयांवर ते नोकरी करू लागले आणि 20 महिन्यांनी ते एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये पहिले एत्तदेशिय असिस्टंट प्रोफेसर म्हणून रुजू झाले."
 
...आणि दर्पण सुरू झाले
"बाळशास्त्री जांभेकरांनी मुंबईत काळबादेवी येथे 'दर्पण' सुरू केल्यानंतर त्याचे स्वरूप मुद्दाम द्विभाषिक ठेवले. सरकारविरोधी कोणतीही कृत्यं वर्तमानपत्रातून केली जात नाही, असं सांगण्याचा त्यांचा उद्देश असावा," असे उपाध्ये सांगतात. वर्षअखेरीपर्यंत 'दर्पण' विकत घेणाऱ्यांची संख्या 300 पर्यंत गेली होती.
"8 जुलै 1840 पर्यंत 'दर्पण' सुरू राहिला. 1 मे 1840 रोजी त्यांनी 'दिग्दर्शन' हे मासिक सुरू केलं. गणित, भूगोल, इतिहास अशा विविध विषयांवर त्यांनी ग्रंथ लिहिले होते. 1845 साली त्यांनी 'ज्ञानेश्वरी'ची मराठीतील पहिली संशोधित मुद्रित प्रत सिद्ध केली. त्यानंतर 'शून्यलब्धी आणि मूलपरिणती गणित', 'इंग्लंड देशाची बखर' यांसारखे अनेक ग्रंथ त्यांनी लिहिले," असं नीला उपाध्ये सांगतात.
 
पत्रकारितेत बदल
गेल्या पावणेदोनशे वर्षांमध्ये महाराष्ट्रात स्वातंत्र्यलढ्यासह अनेक क्षेत्रांमध्ये बदल घडवण्यासाठी पत्रकारितेने योगदान दिलं आहे.
 
आता 21व्या शतकात बदलत्या काळानुसार पत्रकारितेचे स्वरूप, पत्रकार आणि त्यांच्याकडे पाहाण्याची समाजाची दृष्टी यामध्ये काही बदल झाला का, याकडे तटस्थपणे पाहाण्याची वेळ आली आहे.
 
"जांभेकरांच्या काळामध्ये आणि आजच्या काळात पत्रकारिकेच्या उद्देशात बदल झाला आहे," असं मत नीला उपाध्ये व्यक्त करतात.
 
'सत्याधारित माध्यमं टिकून राहातील'
 
ज्येष्ठ पत्रकार आणि लोकमतचे समूह संपादक दिनकर रायकर यांच्यामते आताच्या काळात सर्वच क्षेत्रात मोठे बदल झालेले दिसून येत आहेत. त्याचाच परिणाम पत्रकारितेवरही झाला आहे.
 
त्यांच्या मते, "1947 पूर्वी स्वातंत्र्यासाठी पत्रकारांनी मोठं योगदान दिलं. स्वातंत्र्यानंतर समाजात काही ठोस बदल व्हावेत, स्वातंत्र्य अबाधित राहावं, यासाठी प्रयत्न झाले. हे सर्व 1977 पर्यंत सुरू होतं. इतकंच नव्हे तर आणबाणीच्या विरोधातही काही पत्रकार उभे ठाकले. मात्र त्यानंतर परिस्थिती बदलत गेल्याचं जाणवलं."
 
बदलत्या पत्रकारितेबद्दल रायकर सांगतात, "पत्रकारितेला अर्थप्राप्तीची जोड मिळाली आणि बातमीबरोबर इतर अनेक कामं पत्रकार करू लागले. जाहिराती, वाढत्या स्पर्धा, बातमी देण्याची घाई आणि समाजमाध्यमांसारखा आलेला नवा प्रतिस्पर्धी या सर्वांचा बातम्यांवर परिणाम होत गेला.
 
"माझ्या गेल्या साडेचार दशकांच्या कारकिर्दीचा जेव्हा मी विचार करतो तेव्हा यापुढच्या काळात सत्याधारित बातम्या लिहिणारे, विश्वासार्हता कायम ठेवणारी माध्यमे टिकून राहातील असं मला वाटतं."
 
पत्रकारितेत येण्याचा हेतू काय?
गेल्या दोन दशकांच्या काळात पत्रकारितेमध्ये प्रवेश करण्यासाठी विद्यार्थ्यांचा ओढा दिसून येतो. एकेकाळी मोठ्या शहरांमध्येच उपलब्ध असणारे पत्रकारितेचे अभ्यासक्रम आता मध्यम आकाराच्या तसंच लहान शहरांमध्येही आले आहेत.
 
पेनापासून लॅपटॉपर्यंत असा पत्रकारितेचा प्रवास अनुभवणारे ज्येष्ठ पत्रकार चंद्रशेखर कुलकर्णी सांगतात की, "पत्रकारिता किंवा कोणत्याही क्षेत्रात काम करण्यामागे जीविका आणि उपजीविका, असे दोन उद्देश असतात.
 
"जीविका म्हणजे जगण्याचा हेतू आणि उपजीविका म्हणजे जगण्यासाठी साधन. तुमचा पत्रकारिता करण्याचा हेतू प्रामाणिकपणे प्रतिबिंबित झाला तर व्यवस्थेत बदलही घडवून आणता येतो."
 
1985 नंतर माहिती, दूरसंचार, संवाद क्रांतींचे परिणाम दिसू लागले आणि 90च्या दशकामध्ये जागतिकीकरण झालं त्या टप्प्यात श्रमिक पत्रकार म्हणजे पूर्णवेळ पत्रकारिता संकल्पना संपुष्टात आली, असं कुलकर्णी यांचे मत आहे. "त्याच काळात कॉन्ट्र्क्ट पद्धतीही आली. यामध्ये पगार जास्त, पण कायमस्वरूपी नोकरीची हमी नाही, अशी स्थिती निर्माण झाली."
 
उपलब्ध संधी अधिक तुमचा वकूब
पत्रकारितेतील बदलांबाबत सांगताना कुलकर्णी म्हणतात, "याच काळात तंत्रज्ञानात बदल झाले, काही बदल स्वीकारणं जुन्या पत्रकारांना कठीणही गेलं. पण पेन, टाइपरायटर नंतर संगणक, कॅमेरा, आता डिजिटल, असं स्थित्यंतर वेगानं झालं."
 
"मध्यंतरी इंजिनियरिंगच्या अभ्यासक्रमाकडे सर्वांचा ओढा दिसून येत होता. तसं पत्रकारितेच्या बाबतीतही दिसून येतं. इलेक्ट्रॉनिक मीडियामुळे लोकांना आपला चेहराही पडद्यावर दिसेल, याची स्वप्नं पडू लागली.
 
"पत्रकार झालं की थोरा-मोठ्यांमध्ये उठबस होते, भेटीगाठी होतात, कामं होतात, असं वरपांगी चित्र तयार होतं. त्यामुळेही या क्षेत्रात यावंसं वाटू शकतं. पण पत्रकारिता हा पेशा नक्की का स्वीकारायचा, याचा विचार करा. उपलब्ध संधी आणि तुमचा वकूब याचा मेळ घालता आला पाहिजे," असं ते म्हणतात.
सोशल मीडियानं बदलली माध्यम
सोशल मीडियाच्या काळात ट्रेंड्स, हॅशटॅग्स आणि लाईव्ह्सवरच बऱ्याच बातम्यांचा भर असतो. अशा काळात समाजमाध्यमांमुळे माध्यमांवर काय परिणाम झालायं, याविषयी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागातील सहाय्यक प्राध्यापक योगेश बोराटे सांगतात, "सोशल मीडियामुळे माध्यमांचे वाचक, प्रेक्षक आणि ग्राहकच बदलले. बातम्या स्वीकारण्याचं माध्यम बदलल्यावर वर्तमानपत्रं, टीव्ही, वेबसाइट्स यांनाही तिकडे वळावं लागलं.
 
"आजच्या काळात सोशल मीडिया प्रभावी असल्यामुळे पूर्वी पॅसिव्ह असणारा मीडिया आता अॅक्टिव्ह झाला आहे. लोक आपली मतं थेट त्याच वेळेस मांडू लागले. त्यांच्या प्रतिक्रियासुद्धा बातमीचे विषय झाल्या, इतका त्याचा प्रभाव आहे. सोशल मीडियाचा वापर वाचक, प्रेक्षकांना अधिकाधिक आपल्याकडे आणण्यासाठी केला जाऊ लागला."
 
याच विभागात शिकणाऱ्या प्रणित जाधवने पत्रकारितेत विविध क्षेत्रांमध्ये काम करण्याच्या इच्छेने प्रवेश करायचा निर्णय घेतला आहे. "आपल्याला आवड असलेल्या विषयात अधिक संशोधन करता येतं," असं त्याचं मत आहे. योग्य तयारीमुळे न्यू मीडिया, वेब पोर्टल्स, टीव्ही, अशा अनेक ठिकाणी काम करण्याची संधी उपलब्ध होते, असंही तो सांगतो.