शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मराठी दिन
Written By
Last Modified: मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018 (12:17 IST)

मराठी भाषा दिन विशेष : कुसुमाग्रज

मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार, कथाकार व समीक्षक विष्णू वामन शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांचा जन्म 27 फेब्रुवारी 1912 रोजी पुणे येथे झाला. नाशिक येथे त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. बी. ए.ची पदवी मिळाल्यानंतर काही काळ त्यांनी चित्रपट व्यवसायात पटकथा लिहणे, छोट्या भूमिका करणे अशी कामे केली. यानंतर विविध नियतकालिकांचे व वृत्तपत्रांचे संपादक म्हणून त्यांनी काम केले. कुसुमाग्रज या टोपणनावाने त्यांनी कवितालेखन केले. ते आत्मनिष्ठ व समाजनिष्ठ जाणीव असणारे लेखक मानले जातात. वि. स. खांडेकरांनंतर मराठी साहित्यात ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते दुसरे साहित्यिक होते. त्यांचा जन्मदिवस हा मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. 'नटसम्राट, वीज म्हणाली धरतीला' ही त्यांची नाटके. ज्ञानपीठ पुरस्कार, पद्मभूषण पुरस्कार अशा पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले. मडगाव येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद, कोल्हापुरातील मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद, मुंबईतील जागतिक मराठी परिषदेचे अध्यक्ष ही पदे त्यांनी भूषविली. या कविश्रेष्ठांचे 10 मार्च 1999 रोजी निधन झाले.