आश्विनशुद्धपक्षीं अंबा बैसली सिंहासनी हो। प्रतिपदेपासून घटस्थापना ती करूनि हो। मूलमंत्रजप करूनी भोवतें रक्षक ठेऊनि हो। ब्रह्माविष्णुरुद्र आईचे पूजन करिती हो।।1।।
उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो। उदोकारे गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो ।।धृ।।
द्वितीयेचे दिवशी मिळती चौसष्ट योगिनि हो। सकळांमध्ये श्रेष्ठ परशुरामाची जननी हो।। कस्तुरीमळवट भांगी शेंदुर भरूनी हो। उदोकारें गर्जती सकळ चामुंडा मिळुनि हो ।।उदो।।2।।
तृतीयेचे दिवशी अंबे शृंगार मांडिला हो। मळकट पातळ चोळी कंठी हार मुक्ताफळा हो।। कंठीची पदके कांसे पीतांबर पिवळा हो। अष्टभुजा मिरविती अंबे सुंदर दिसे लीला हो। उदो।।3।।
चतुर्थीचे दिवशी विश्वव्यापक जननी हो। उपासकां पाहसी अंबे प्रसन्न अंत:करणीं हो।। पूर्ण कृपें पाहसी जगन्माते मनमोहिनी हो। भक्तांच्या माऊली सुर ते येती लोटांगणी हो।।उदो।।4।।
पंचमीचे दिवशीं व्रत तें उपांगललिता हो। अर्घ्यपाद्यपूजनें तुजला भवानी स्तविती हो।। रात्रीचे समयी करिती जागरण हरिकथा हो। आनंदे प्रेम तें आलें सद्भावे क्रिडता हो।।उदो।।5।।
षष्ठीचे दिवशी भक्तां आनंद वर्तला हो। घेऊनि दिवट्या हस्ती हर्षे गोंधळ घातला हो।। कवडी एक अर्पितां देसी हार मुक्तफलांचा हो। जोगावा मागतां प्रसन्न झाली भक्तकुळा हो।।उदो।।6।।
सप्तमीचे दिवशी सप्तशृंगगडावरी हो। तेथें तूं नांदसी भोवतें पुष्पें नानापरी हो।। जाईजुई- शेवंती पूजा रेखियली बरवी हो। भक्त संकटी पडतां झेलूनि घेसी वरचे वरी हो।।उदो।।7।।
अष्टमीचे दिवशी अष्टभुजां नारायणी हो। सह्याद्रीपर्वती पाहिली उभी जगज्जननी हो।। मन माझें मोहिलें शरण आलों तुजलागुनी हो। स्तनपान देऊनि सुखी केली अंत:करणीं हो।।उदो।।8।।
नवमीचे दिवशी नवदिवसांचें पारणें हो। सप्तशतीजप होम हवनें सद्गक्ती करूनी हो।। षड्रसअन्ने नैवेद्यासी अर्पियेली भोजनी हो। आचार्य ब्राह्मणा तृप्त केलें कृपेंवरूनी हो।।उदो।।9।।
दशमीच्या दिवशी अंबा निघे सीमोल्लंघनी हो। सिंहारुढे दारुण शस्त्रें अंबे त्वां घेऊनी हो।। शुंभनिशुंभादिक राक्षसा किती मारिसी रणी हो। विप्रा रामदासा आश्रय दिधला तो चरणी हो।।उदा।।10