भंडारा सिल्क अर्थात कोसा साडी
खरं तर फॅशनचं जग ग्लॅमरस आहे. त्यातून एखाद्याला प्रसिद्धी मिळाली की ती फॅशन सर्वसामान्य होत जाते. वस्त्रांच्या दुनियेतही फॅशन आली आणि गेली. पण परंपरा कायमच राहिल्याचे चित्र दिसते. भंडारा येथे तयार होणारी रेशीम भंडारा कोसा साडी म्हणून सुपरिचित आहे. कधी नव्हे एवढी मागणी गेल्या पाच वर्षापासून या साडीला वाढली आहे. कारण या साडीकडे पहाण्याचा दृष्टीकोन 'इको फ्रेंडली' झाला आहे. पर्यावरणाला साजेशी साडी म्हणून या साडीकडे पाहिले जाते.
कोसा हा रेशमाचा एक प्रकार. भंडार्यातील जंगलात कोसा पद्धतीचे कोष मोठ्या प्रमाणावर नैसर्गिकरित्या दिसतात. त्या कोषापासून धागे तयार केले जातात. या धाग्यांना नैसर्गिक रिच लुक असतो. त्यातून साडी तयार केली जाते, नव्हे विणली जाते. अलिकडे या साडीचे विणकाम हे अत्याधूनिक अशा विणकर मशिनद्वारे होत असल्याने साडीचा पोत अधिकच चांगला येतो. काठांवर असणारी बारीक वेलबुटी आणि नॅचरल पद्धतीचा काठ, त्यावर कॉन्ट्रॉस कलर साडी आकर्षित करण्यासाठी विशेष पुरेसा असतो.
हल्ली कपडे अगर साडी खरेदीला तसे सणवारांचे महत्त्व नसते. किंबहुना साडी खरेदीला तर निमित्त शोधण्याची आवश्यकता नाही. सिल्क साडीचे वैशिष्ट्ये असे की ह्या साड्या नेहमी वापरत नसल्याने अगदी कंटाळा येईपर्यंत या वापराव्या लागतात. मात्र त्या जपून ठेवणे आवश्यक असते. अन्यथा साडीची घडी तशीच ठेवली तर मग कसर तरी लागते अथवा घडीच्या जागेवर फाटते तरी.
भंडारा सिल्क साडी ही सौंदर्य खूलवणारी साडी आहे. या साडीचा लूक रिच असतो. एकाचवेळी पाश्चात्य आणि पारंपरिकता जपण्याचा प्रकार ही साडी घातल्याने होतो. भंडारा सिल्क साडीचे वैशिष्ट्य म्हणजे या साडीचे रंग नैसर्गिक स्वरुपाचे असतात त्यामुळे रिचनेस अधिक येतो. साडीवर ब्लाऊज हवा त्या पद्धतीचे शिवून घातल्यास या साडीमुळे व्यक्तिमत्त्वात वेगळीच ओळख निर्माण होते. विशेषत: मी जेव्हा जेव्हा एखाद्या समारंभात अथवा धार्मिक कार्यक्रमांना जाते तेव्हा साडीची पहिली पसंती भंडारा सिल्कला देते. याचे कारण म्हणजे या साडीत असणारे अंगीभूत वैशिष्ट्य म्हणजे रिचनेस आणि स्ट्रक्चर यांचा अनोखा संगम होय.
या कापडाचे ड्रेसदेखील उत्तम होतात. त्यातून नवनव्या फॅशनद्वारे जीन्सवर टॉप म्हणून कुर्ता अगर शॉर्ट घालता येवू शकते. विशेषत: महाविद्यालयात जाणार्या असंख्य तरुणी या कपड्याचा झब्बा घालताना दिसतात. टसर साडीचे वैशिष्ट्ये म्हणजे ही साडी अंगाला घट्ट लपेटून राहते. त्यामुळे व्यक्तीपरत्वे साडीचे महत्त्व वाढते. फॅशनच्या दुनियेत अनेक नवनवे प्रकार आले परंतु भंडारी सिल्क साड्यांनी आपले महत्त्व आजही कायम ठेवले आहे. हे विशेष!