सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. फॅशन
Written By

Nauvari Saree नऊवारी साडी कशी नेसायची

Nauvari Saree नऊवारी हा महाराष्ट्राचा पारंपरिक पेहराव आहे. महाराष्ट्रात कोणताही सण असो वा महाराष्ट्रीयन लग्न किंवा मांगलिक कार्य. स्त्रियांनी नटायचा विचार केला की नऊवारी साडीचं चित्र डोळ्यासमोर उभं राहतं. महाराष्ट्राची शान समजली जाते पारंपारिक नऊवारी साडी. नऊवारी म्हणजे नऊ-वार कापड. विशेष म्हणजे नऊवारी साडीच्या आत परकर घालण्याची गरज नसते. नऊवारी साडी विशेष करुन महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या राज्यातील स्त्रिया परिधान करतात. 
 
नऊवारी इतिहास
महाराष्ट्राची ओळख बनलेल्या नऊवारीचा इतिहास शतकानुशतके जुना आहे. सुरुवातीच्या काळात ही साडी धोतीसारखी बांधली जात असे. राजे-सम्राटांच्या काळात स्त्रियांना रणांगणावर जावे किंवा शस्त्रास्त्रांचे ज्ञान घ्यायचे असताना त्यांना आरामदायी कपड्यांची गरज भासू लागली. पुरुषांच्या धोतरापासून प्रेरणा घेऊन नऊवारी साडीचा जन्म झाला. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे ते परिधान केल्याने शस्त्रे वापरणे आणि कोणत्याही अडथळ्याशिवाय आपले लढाऊ कौशल्य दाखवणे सोपे होते. 
 
नऊवारी नेसून शारीरिक काम करणे सोयीचे होते. इतिहासाची पाने राणी ताराबाई, राणी लक्ष्मीबाई, अहिल्याबाई यांसारख्या पराक्रमी वीरांच्या शौर्यगाथांनी भरलेली आहेत. त्यांच्यात साम्य आहे, त्यांच्या पोशाखात म्हणजे नऊवारी.
 
जिजाबाई, सावित्रीबाई, आनंदीबाई जोशी ह्या नऊवारीतच वावरल्या आणि त्या काळी बायका ही साडी नेसूनच पोहत देखील होत्या. आजही अनेक बायका नऊवारी साडीत सहज शेतात काम करताना किंवा मजूरी करताना दिसून येतात.
 
काळानुसार नऊवारी साडी नेसण्याची पद्धतही बदलत गेली. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागात साडी बांधण्याच्या पद्धतीत काही फरक आहे. याला नऊवारीला काष्टा साडी, सकच्चा आणि लुगडी असेही म्हणतात.
 
नऊवारी साडीचे प्रकार
ब्राह्मणी नऊवारी साडी
ही नऊवारी साडी नेसायची एक विशिष्ट पद्धत असते. या साडीचा काठाकडचा भाग वर कमरेला खोचायचा असतो ज्याला ओचा म्हटतात. पूर्वी स्त्रिया या घोळदार ओच्यामध्ये काही वस्तू ठेवत असे. या पद्धतीच्या साडीमध्ये निऱ्या कमरेला न खोचता त्या एकत्र घेऊन त्याचे ‘केळं’ काढतात. पूर्वी स्त्रिया यात पैसे ठेवायच्या.
 
पेशवाई नऊवारी साडी
पेशवाई नऊवारी साडीचा ओचा ब्राह्मणी नऊवारी साडी पेक्षा कमी असतो. यात भरजरी साड्या वापरल्या जातात. पेशव्यांच्या राजवटीत महिलांनी बांधलेल्या साडीला पेशवाई हे नाव पडले. ही साडी नेसताना बेसिक प्लीट्स टाकल्या जातात. नंतर डाव्या बाजूच्या प्लीट्सला मागे टेकल्यानंतर, उजव्या बाजूच्या प्लीट्स झिग-झॅग स्टाईलमध्ये पुढे सेट केल्या जातात.
 
काष्टा नऊवारी साडी
मूळ शैली म्हणजे काष्टा, ज्यामध्ये साडीची बॉर्डर पाठीमागे खोचलेली असते. काष्टा साडी ही मुळात सुती कापडाची असते जेणेकरून ती सहज नेसता येते आणि रोजची कामे करताना कुठलीही अडचण होत नसते. काष्टा नऊवारी साडी गुडघ्या पर्यंत नेसतात. हा प्रकार जुना असून शेतकरी महिलांना या प्रकाराची साडी नेसलेली पाहिले असेल.
 
कोळी नऊवारी साडी
हा प्रकार कोळी समाजातील स्रिया नेसतात. समुद्रामध्ये काम करत असल्यामुळे ही नऊवारी साडी गुडघ्या पर्यंत नेसतात. साडीचा पदराचा भाग कमरेला गुंडाळलेला असतो आणि ब्लाऊज वर डिझाइन असलेली कॉटनची ओढणी घेण्यात येते. शक्यतो कॉटनच्या या साड्यांवर फुलांचे नक्षी काम बघायला मिळतात.
 
कोल्हापुरी नऊवारी साडी
या प्रकारच्या नऊवारी साडीत दोन काष्टा असतात. या साडीला डबल काष्टा असेही म्हटलं जातं. ही साडी गुढघ्या पर्यंत नेसली जाते.
 
सिल्क नऊवारी साडी
हल्ली सिल्कच्या नऊवारी साड्यांचे फॅशन आहे. यात पैठणी सिल्क जास्त प्रमाणात वापरली जाते. मागचा काष्टा काढताना साडीचे दोन्ही काठ मधेमध येतात. सिल्कपासून बनवलेल्या साड्या सण किंवा इतर विशेष प्रसंगी नेसल्या जातात. मराठा राजवटीत ही पद्धत खूप लोकप्रिय होती. घोड्यावर स्वार होण्याबरोबरच स्त्रियांना युद्धातही लढावे लागत असे.
 
कॉटन नऊवारी साडी
उन्हाळ्यात सर्वात पसंत केली जाणारी म्हणजे कॉटन नऊवारी साडी. ही साडी नेसायला खूप सोपी असते आणि घाम देखील शोषून घेते.
 
रेडिमेड नऊवारी साडी
हल्ली फॅशन म्हणून नऊवारी साडी नेसली जाते. अशात नेसणे अवघड जातं आणि सांभाळणे देखील. अशा स्त्रियांसाठी रेडीमेड नऊवारी साडी बाजारात उपलब्ध असतात. किंवा नऊवारी साडी घेऊन आपल्या माप आणि आवडीप्रमाणे शिऊन घेता येतात.
 
नऊवारी साडी कशी नेसायची ? 
नऊवारी साडीचा मध्य दोन भागात घडी करून काढायचा. मग तो मध्य मागे कंबरेवर ठेऊन साडीची दोन टोकं पुढे आणून त्यांची पोटावर गाठ मारायची. नंतर दोन्ही टोके पायांमधून काढून उजव्या टोकाला निर्‍या घालून पाठीमागे कंबरेत खोचायच्या. डाव्या टोकाला पायाभोवती घेयचे आणि उजव्या खांद्यावर पदर टाकायचे.