सोमवार, 3 फेब्रुवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. सखी
  4. »
  5. फॅशन
Written By वेबदुनिया|

किटी पार्टीची वाढती क्रेझ

WDWD
काळ ज्या वेगाने बदलत आहे त्याच वेगाने आपली जीवनशैलीही बदलत आहे. कालपर्यंत 'क्लब संस्कृती' ही केवळ पुरुषांची मक्तेदारी होती. महिलांचे जीवन म्हणजे चूल आणि मूल याच चौकटीत सीमित होते. मात्र, आता महिलाही पुरूषांच्या एक पाऊल पुढे आहेत. मोठमोठ्या महानगरात नांदत असलेली 'क्लब संस्कृती' आता महिलापर्यंत पोहचली आहे.

पूर्वी महिला सकाळी पाणी भरण्याच्या ठिकाणी किंवा संध्याकाळी घराच्या ओटयावर गप्पा मारत. आज त्याच गप्पांची ठिकाणे बदलली आहेत. महिलांमध्ये किटी पार्टीची क्रेझ जरा जास्तच वाढली आहे. नटून थटून महिला आपल्या मैत्रिणींना भेटायला क्लबमध्ये जातात. किटी पार्ट्या करतात. किटी पार्टीच्या माध्यमातून गप्पा तर होतातच शिवाय फॅशन परेडही होते. टीव्हीवरील सासू- सुनाच्या त्याच त्या मालिका पाहून कंटाळलेल्या महिला अशा पार्ट्यांमध्ये जाऊन टाईमपास करत असतात.
  पूर्वी महिला सकाळी पाणी भरण्याच्या ठिकाणी किंवा संध्याकाळी घराच्या ओटयावर गप्पा मारत. आज त्याच गप्पांची ठिकाणे बदलली आहेत. महिलांमध्ये किटी पार्टीची क्रेझ जरा जास्तच वाढली आहे      


किटी पार्टीला जाणार्‍या बायकोचे चोचले पूर्ण करता करता त्यांच्या नवर्‍यांच्या नाकी नऊ येत असतात. त्याच्या खिशावर वायफळ खर्चाचा व बिनकामाचा बोजा पडत असतो. फॅशनेबल जमान्यात मॅचिंगचे फॅड काही ओरच आहे. प्रत्येक साडीवर मॅचिंग ब्लॉऊज, मॅचिंग सॅंडलसोबत ज्वेलरीही मॅचिंगच पाहिजे असते.

सुंदर दिसण्याच्या स्पर्धेत महिला दिवसातून किमान एकदा तरी ब्युटिपार्लरमध्ये जात असतात. कालपर्यंत घराच्या चौकटीत राहून नवर्‍याच्या कमी पगारात सगळं सांभाळणारी बायको अचानक किटी पार्टीला जाऊ लागल्याने कुटूंबाची अर्थव्यवस्था ढासळते. खाण्या-पिण्यापासून तर राहणीमानापर्यंत सगळ्याच गोष्टीत परिवर्तन घडत असते.

किटी पार्टीचे मुख्य आर्कषण म्हणजे छान जेवण व विविध स्पर्धा होय. स्वत:ला इतरांपेक्षा श्रेष्ठ दाखविण्याच्या प्रयत्नात अशा पार्ट्यामध्ये महिला पाण्यासारखे पैसे खर्च करत असतात.

या पार्ट्यांमध्ये विविध स्पर्धांच्या माध्यमातून मौजमजा केली जाते. यातून काहीच निष्पन्न होत नाही. फक्त पैसा व वेळ तेवढा वाया जातो.