सुंदर पावलांची कशी घ्याल निगा
'
आपके पैर कितने कोमल हैं, इन्हें ज़मीन पर मत रखिएगा। वरना ये मैले हो जाएँगे...! ' 'पाकीजा' या चित्रपटातील राजकुमार यांच्या तोंडातील हे वाक्य नाजूक, सुंदर पावलांचे कौतुक करणारे आहे. चेहरा व हात यांच्या सौंदर्यासोबत सुंदर पावले देखील आपल्या व्यक्तिमत्त्वाला उठाव देतात. त्यामुळे आपण पावलांच्या सौंदर्याकडे ही लक्ष दिले पाहिजे. आपल्या संपूर्ण शरीराचा भार आपले पाय उचलतात मात्र आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करून त्यांची उपेक्षा करीत असतो. आपण जेव्हा चप्पल किंवा जोडे घालतो तोपर्यंत ठीक आहे. मात्र, आपण जेव्हा कुणाकडे जातो व तेथे चप्पल- जोडे काढण्याची वेळ येत तेव्हा मात्र चांगलीच पंचाईत होते. काळवटलेली नखे व फाटलेल्या टाचा पाहून आपली आपल्यालाच लाज वाटते. असे म्हणतात व्यक्तीची ओळख त्याच्या जोड्यांवरून होते. मात्र, त्या जोड्यांच्या आत असलेल्या पावलांचीच आपण उपेक्षा करतो. पण पावलांकडे दुर्लक्ष करण्याचे कारण काय? जास्त वेळ पाण्यात राहणे, पायांची नियमित स्वच्छता न करणे, उंच हिलच्या चप्पल व जोडे वापरणे आदी गोष्टी पायांसाठी भविष्यात अडचणीच्या ठरू शकतात. एका सर्वेक्षणात 60 टक्के स्त्री-पुरूष टाचांचे दुखणे, पायावर सूज, पायांना छाले येणे, बोटांमध्ये जखमा होणे आदी समस्यांनी ग्रस्त असतात. कशी घ्याल निगा :-* कोमट पाण्यात मीठ टाकून पाय त्यात काही वेळ टाकून ठेवावे. * पायांना टॉवेलने स्वच्छ पुसून त्यावर क्रीम व माइश्चराइजर लावावे. * दररोज पायांची हलकी मालीश करावी. * नखे ही दात व कात्रीने काढण्यापेक्षा ते काढण्यासाठी नेलकटरचा वापर करावा. * नखे कापताना त्यांना व्यवस्थित आकार द्यायला विसरू नका. * 15 दिवसातून 'पॅडीक्योर' जरूर करावे.* घरातही चप्पल घालायला विसरू नका. * नियमित व्यायाम करा.*जास्त घट्ट व उंच हिलच्या चप्पल व जोडे अजिबात वापरू नका.