गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. सण
Written By

Chaitra Gauri 2024: चैत्रांगण चैत्रगौरी पुढे काढली जाणारी रांगोळी

Chaitrangan : चैत्र शुद्ध तृतीया ते वैशाख शुद्ध तृतीया म्हणजेच अक्षय्य तृतीयेपर्यंत देवघरात छोटया पाळण्यात गौर विराजमान होते. महिनाभर लाडक्या माहेर वाशिणीच्या रूपाने चैत्र गौरीचे घरोघरी आगमन होते. पूजेतील अन्नपूर्णा आसनांवर बसवून तिची पूजा केली जाते. तिला नैवेद्य दाखवून जवळच्या सुवासिनींना हळदी-कुकुंवासाठी निमंत्रण दिले जाते. अन्नपूर्णा म्हणजेच साक्षात पार्वतीचं असल्याने तिच्या स्वागतास घरातील अंगण सारवून त्यावर रांगोळी काढतात. ह्या वैशिष्ट्यपूर्ण रांगोळीला चैत्रांगण असे म्हटले जाते.
 
सध्याच्या काळात चैत्रांगणाचा साचा पण मिळतो. या चैत्रांगणाच्या रांगोळीमध्ये 51 प्रकाराची अशी शुभ चिन्हे असतात. सूर्य-चंद्र, शिव-पार्वती, गणपती, सरस्वती, यशाचा प्रतीक म्हणजे ध्वज, सगळ्यात महत्वाचे म्हणजे गुढी. माहेरवाशीण घरी येणाचा आनंद दर्शवणारी. शंख, पद्म, गदा, चक्र, गोपद्म, ओम, स्वस्तिक, सौभाग्याचे लेणं म्हणजे हळदी-कूंकुवाचा करंडा, फणी, आरसा, सनई, चौघडा, मोरपीस, बासरी- ह्याला श्रीराम, विष्णूंचे अवतार मानलेले आहे.
 
ब्रह्मकमळ, ज्ञानकमळ, हे जगत्पिता ब्रह्मदेवाचे स्वरूप. विष्णूचा अवतार म्हणून कासव, तुळशी वृंदावन. गाय, वासरू हे कामधेनूचे प्रतीक. अंबारी घेतलेला हत्ती ऐश्वर्याचे प्रतीक. शंकरातील गळ्याचा नाग, श्रीराम म्हणजे विष्णू त्यांचे वाहन गरुड काढले जाते. पूर्ण फळे आंबा, केळी, सवाष्णींची ओटी म्हणून खण, नारळ, शिवलिंग, पणती, कलश, रुद्र, उंबर, पिंपळ वृक्ष आणि पाळणा.
 
रांगोळीला अधिक उठाव यावा म्हणून गेरू किंवा लाल-तपकिरी रंगाच्या मातीने रांगोळी काढण्याची जागा सारवून घेतात. त्यावर पांढर्‍या रंगाची रांगोळी उठून दिसते तसंच  विविध रंगदेखील भरले जातात.
 
अश्या या हिंदू संस्कृतीचे प्रतीक म्हणजेच रंगीत रांगोळी भरून काढलेले चित्रच म्हणजे चैत्रांगण होय. अशीही छान सुंदर कल्पना या चैत्रांगण रांगोळीमागे आहे. ह्या रांगोळीला काढण्याचे कौशल्यच आहे. काढल्यावर ही रांगोळी अतिशय सुंदर दिसते. चला तर मग या चैत्रात ही रांगोळी काढू या. आणि आपल्या संस्कृतीला  जपू या..
 
Edited By- Priya Dixit