1. धर्म
  2. हिंदू
  3. सण
  4. Deep Amavasya Katha in Marathi Divyanchya Avasechi Kahani

Deep Amavasya Katha 2026 दिव्यांच्या अवसेची कथा

दीपकांनो, ऐका तुमची कहाणी. 
आटपाट नगरात एक राजा होता.  त्याच्या सुनेने एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि आळ मात्र उंदरावरती घेतला. आपल्यावरचा प्रमाद टाळला. 
 
उंदरांनी ठरविले की, आपल्यावर उगाच आळ आला आहे. आपण सूड घ्यावा.  म्हणून सर्वांनी विचार केला व रात्री हिची चोळी पाहुण्यांच्या अंथरुणात नेऊन टाकली. 
 
दुसऱ्या दिवशी हिची फजिती झाली. सासू व दिरांनी निंदा केली व तिला घालवून दिली. हिचा रोजचा नेम असे, की रोज दिवे घासून तेल-वात करून स्वतः ते लावावे व खडीसाखरेच्या खड्यांनी त्यांच्या ज्योती साराव्यात. दिव्यांच्या अवसेच्या दिवशी त्यास चांगला नैवेद्य दाखवावा. पण ही घरातून निघाल्यामुळे ते सारं बंद पडलं.
 
पुढं ह्या अवसेच्या दिवशी राजा शिकारीहून येत होता. एका झाडाखाली मुक्कामास उतरला, तेव्हा त्याला एक चमत्कार दिसला. आपल्या सर्व गावातले दिवे अदृश्य रूप धारण करून झाडावर येऊन बसले आहेत. एकमेकांपाशी कोणाच्या घरी जेवावयास काय केलं होतं ? कशी कशी पूजा मिळाली, वगैरे चौकशी करत आहोत. सर्वांनी आपापल्या घरी घडलेली हकीगत सांगितली.
 
त्यांच्या मागून राजाच्या घरचा दिवा सांगू लागला. “काय सांगू बाबांनो, यंदा मजसारखा हतभागी मीच. दर वर्षी सर्व दिव्यांत मी मुख्य असावयाचा. माझा थाटमाट जास्ती व्हावयाचा. पण मला यंदा विपत्तीत दिवस काढावे लागत आहेत.” 
 
तेव्हा त्यास सर्व दीपकांनी विचारलं, असं होण्याचं कारण काय? 
 
मग तो त्यास सांगू लागला, “खरं तर मी ह्या गावच्या राजाचा घरचा दिवा. त्या राजाची एक सून होती. एके दिवशी तिने घरातील पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरावर आळ घातला व आपल्यावरचा प्रमाद टाळला. इकडे उंदरांनी हिचा सूड घ्यावा म्हणून रात्री हिची चोळी पाहुण्यांच्या अंथरुणात नेऊन टाकली. दुसऱ्या दिवशी हिची फजिती झाली. सासू-सासऱ्यांनी निंदा केली आणि तिला घरातून घालवून दिली. म्हणून मला असे दिवस आले. ती दर वर्षास माझी मनोभावे पूजा करीत असे,” जिथं असेल, तिथं ती खुशाल असो असं दिव्यानं आशीर्वाद दिला. 
 
हा सारा प्रसंग राजानं ऐकला. आपल्या सुनेचा अपराध नाही, अशी त्याची खात्री झाली. घरी आला. कोणी प्रत्यक्ष पाहिलं आहे काय, म्हणून चौकशी झाली; तेव्हा कोणीही पाहिलं नाही, असं समजलं. मग तिला मेणा पाठवून आणली. झाल्या गोष्टीची क्षमा मागितली. साऱ्या घरात मुखत्यारी दिली. ती सुखानं राज्य करू लागली. 
 
तिला जसा दीप पावला आणि तिच्यावरचा आळ टळला, तसा तुमचा आमचा टळो. 
 
ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.
पुढील लेख
Deep Amavasya 2026 Wishes in Marathi दीप अमावस्येच्या शुभेच्छा