रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. सण
Written By

Hartalika Teej 2022 हरतालिका तृतीया 2022 शुभ मुहूर्त, संपूर्ण पूजा विधि आणि नियम

hartalika tritiya
भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीया तिथीला हरतालिका तृतीया साजरी केली जाते. असे मानले जाते की हे व्रत केल्यास विवाहित महिलांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात, पतीला दिर्घायुष्य लाभतं तर अविवाहित मुलींना योग्य जीवनसाथी मिळतो. स्त्रिया निर्जलीकरण होऊन हे व्रत पाळतात.

हरतालिका तृतीया पूजा शुभ मुहूर्त- Hartalika teej muhurat 2022
 
तृतीया तिथी : 29 ऑगस्ट दुपारी 03:20 ते 30 ऑगस्ट दुपारी 03:33 पर्यंत
उदयातिथीप्रमाणे हरतालिका तीज व्रत 30 ऑगस्ट रोजी असेल.
 
अभिजीत मुहूर्त : सकाळी 11:33 ते 12:24 पर्यंत
विजयी मुहूर्त : दुपारी 02:05 ते 02:56 पर्यंत
अमृत काल मुहूर्त : संध्याकाळी 05:38 ते 07:17 पर्यंत
गोधूलि मुहूर्त : संध्याकाळी 06:07 ते 06:31 पर्यंत
सायाह्न संध्या मुहूर्त : संध्याकाळी 06:19 ते 07:27 पर्यंत
निशीथ मुहूर्त : रात्री 11:36 ते 12:21 पर्यंत
ग्रह संयोग : या दिवशी हस्त नक्षत्र असेल. दिवसभर रवियोग आणि शुभ योग
 
डिस्क्लेमर : पंचांग भेद असल्याने त्यात वेळेनुसार चढ-उतार होत असतात.
 
हरतालिका तृतीया नियम
हरतालिकेचे व्रत निर्जला केलं जातं.
हरतालिका व्रत अविवाहित मुली आणि विवाहित महिला करतात. विधवा स्त्रिया देखील हे व्रत करू शकतात.
हरतालिका व्रताचा नियम असा आहे की एकदा सुरू केल्यावर आयुष्यभर त्याग करता येत नाही. हे व्रत दरवर्षी पूर्ण नियमांसह केले जाते.
हरतालिका व्रताच्या दिवशी रात्रभर जागरण केलं जातं. रात्रभर स्त्रिया एकत्र जमतात आणि नाच- गाणी, भजन करतात.
जिथे जिथे हरतालिका व्रत पाळले जाते. तेथे ही पूजा दरवर्षी केली जाते.
 
हरतालिका पूजा साहित्य
चौरंग, रांगोळी, तांदूळ, पाण्याचा कलश, ताम्हण, पळी, पंचपात्र, तसराळ, आसन, निरांजन, शंख, घंटा, समई, कापूरारती, हळदकुंकू, अष्टगंध, गुलाल, बुक्का, चंदन, अक्षता, उदबत्ती, कापूर, तुपाच्या व तेलाच्या वाती, अत्तरफाया, विड्याची पाने, सुपार्‍या, बदाम, खारका, नारळ, फळे, खडीसाखर, गूळखोबरे, पंचामृत, कापसाचे वस्त्र, कोरे वस्त्र, तसेच फणी, काजळ, गळेसरी, कांकणे, आरसा इत्यादी सौभाग्यद्रव्ये. याव्यतिरिक्त फुले, दूर्वा, तुळशीपत्रे, व झाडांची पाने.
 
हरतालिका पूजा पद्धत
या दिवशी मुली व सुवासिनींनी सुवासिक तेल लावून स्नान करावे. स्नान केल्यानंतर स्वच्छ केलेल्या जागेवर एका जागी चौरंग ठेवावे. रांगोली काढून व केळीच्या खांबांनी चारही बाजूंनी सुशोभित केलेल्या चौरंगावर वाळू आणून पार्वती आणि सखीसह शिवलिंग स्थापित करावे. उजव्या बाजूस तांदळाच्या एका ढिगावरील सुपारीवर किंवा नारळावर गणपती मांडावा. समोर पाच विडे मांडून तेथे सुपारी, खारीक, बदाम, नाणे, फळ ठेवावे.
 
सर्वप्रथम स्वत:ला हळद कुंकु लावून देवासमोर विडे ठेवावे. अक्षता, हळद कुंकु वाहून मनोभावे नमस्कार करावा. घरातील वडीलधार्‍या मंडळींना नमस्कार करून नंतर पूजा प्रारंभ करावी. पूजा करण्यापूर्वी दिव्यांची पूजाही करावी. सर्वप्रथम गपपतीची आणि नंतर महादेव व सखी-पार्वतीची षोडशोपचारे पूजा करावी. पूजेसाठी घेतलेले साहित्य विधीपूर्वक देवाला अर्पित करावे. 
पूजा केल्यावर धूप-दीप, नैवेद्य दाखवून पत्री वाहावी. हरतालिकेच्या पूजेत जी पत्री वाहतात त्यांचे क्रम असे आहे: बेल, आघाडा, मधुमालती, दूर्वा, चाफा, कण्हेर, बोर, रुई, तुळस, आंबा, डाळिंब, धोतरा, जाई, मरवा, बकुळ, अशोकाची पाने वाहावी. नंतर मनोभावे प्रार्थना करावी. कुमारिकेने इच्छितत वर मिळविण्यासाठी तर सुवासिनीने अखंड सौभाग्य लाभू दे अशी प्रार्थना करावी. दिवसभर कडक उपोषण करावे. शक्य नसल्यास फलाहार करावा. या दिवशी आगीवर बनविलेला कोणताही पदार्थ खात नाहीत. नंतर रात्रभर झिम्मा, फुगडी, टिपऱ्या, गोफ इत्यादी खेळ खेळत जागरण करून हरतालिकेची कथा ऐकून, आरती करून बारानंतर रूईच्या पानावर दही घालून ते चाटावे. दुसर्‍या दिवशी उत्तरपूजा करून ती लिंगे विसर्जन करावी. दुसर्‍या दिवशी सकाळी पूजेनंतर देवीला अर्पित केलेले कुंकु कपाळाला लावले. काकडी खाऊन उपवास मोडवा.