बुधवार, 6 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. सण
Written By

अशी साजरी करा कोजागिरी पौर्णिमा

कोजागिरी पौर्णिमेचे महत्त्व आणि पूजाविधी
 
आश्विन पौर्णिमा ही कोजागरी पौर्णिमा किंवा शरद पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. यास 'माडी पौर्णिमा' असेही म्हणतात. ही शरद ऋतूतील आश्विन महिन्यात येते. या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो. या दिवशी दम्यावरचे आयुर्वेदिक औषध घेण्याची पद्धत आहे. या दिवशी घेतलेले औषध लवकर लागू पडते असा समज आहे. ह्या दिवशी पाळावयाच्या व्रताला 'कोजागरव्रत' म्हणतात. दिवसा उपवास करून रात्री लक्ष्मी व ऐरावतारूढ इंद्र यांची पूजा करावी; या पूजेनंतर रात्री चंद्राला आटीव दूधाचा नैवेद्य दाखवायचा असतो. दूध आटवून त्यात केशर, पिस्ते, बदाम, चारोळ्या, वेलदोडे, जायफळ वगैरे गोष्टी घालून, तसेच साखर घालून, नैवेद्य दाखविला जातो. देव व पितर यांना नारळाचे पाणी व पोहे समर्पण करावेत तसेच ते आप्तेष्टांसह स्वतःही सेवन करावेत. दुधात मध्यरात्री पूर्ण चंद्राची किरणे पडू देतात आणि ते दूध मग प्राशन केले जाते. उत्तररात्रीपर्यंत जागरण केले जाते. अशी आख्यायिका सांगतात की या दिवशी उत्तररात्री साक्षात लक्ष्मी चंद्रमंडळातून पृथ्वीवर उतरते व लक्ष्मीदेवी येऊन (संस्कृतमध्ये) 'को जागर्ति' (म्हणजे 'कोण जागत आहे') असे विचारते, म्हणून या दिवसाला 'कोजागरी पौर्णिमा' म्हणतात.या दिवशी द्यूत खेळावे, असेही सांगितले आहे. लक्ष्मीच्या स्वागतार्थ रात्री रस्ते, घरे, मंदिरे, उद्याने, घाट इ. ठिकाणी असंख्य दीप लावावेत. 
 
सनत्कुमार संहितेत ह्या व्रताची कथा दिली आहे. प्राचीन काळी याच दिवशी 'कौमुदी महोत्सव' साजरा करीत. 'कौमुदी पौर्णिमा' व 'शरत्पौर्णिमा' अशीही नावे ह्या दिवसास आहेत.पावसाळ्यानंतर प्रसन्न अशा शरद ऋतूतील ही पौर्णिमा असल्यामुळेही तिला उत्सवाचे महत्त्व आले असावे.
 
या दिवशी विधीपूर्वक स्नान करून उपास ठेवायला पाहिजे. काही लोक तांब्याच्या किंवा मातीच्या कलश्यावर वस्त्राने झाकलेली सोन्याची लक्ष्मीची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापित करून पूजा करतात. संध्याकाळी चंद्रोदय झाल्यावर सोने, चांदी किंवा मातीचे तुपाने भरलेले १०० दिवे लावतात. देवीला नैवैद्य दाखविला जातो. तूप घातलेली खीर तयार करावी व बर्‍याच पात्रात भरून ती चंद्र किरणांखाली ठेवावी. तीन तासानंतर संपूर्ण खीर लक्ष्मीला अर्पित करून ब्राह्मणांना प्रसाद म्हणून वाढावी. त्याबरोबर मांगल्यमय गाणी म्हणून, भजने म्हणत रात्री जागरण करावे. सकाळी सुर्योदयावेळी स्नान करून लक्ष्मीची सुवर्णाची प्रतिमा गुरूजींना अर्पित करावी. अशीही काही ठिकाणी पद्धत,परंपरा आहे.
 
कोजागरी पौर्णिमेच्या मध्यरात्री देवी महालक्ष्मी आपल्या कर कमलांमध्ये वर आणि अभय घेऊन भाविकतेने आपले व्रत करणार्‍याला प्रसन्न होते. जो मनुष्य जागून माझी पूजा करत असेल त्याला मी अपार अपार धन-धान्य देईन, असे ती म्हणते.
 
दरवर्षी करण्यात येणारे हे व्रत लक्ष्मीला संतुष्ट करण्यासाठी केले जाते. त्याने लक्ष्मी प्रसन्न होऊन समृद्धी लाभतेच पण मृत्यूनंतर परलोकातही सद्गती मिळते. 
 
या दिवशी प्रत्येक कुटुंबातील ज्येष्ठ अपत्याला ओवाळून त्याची किंवा तिची 'आश्विनी' साजरी करतात.