रविवार, 5 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. सण
Written By
Last Updated : रविवार, 12 सप्टेंबर 2021 (08:30 IST)

जेष्ठा गौरी विशेष : ज्येष्ठ गौरी पूजा विधी

अखंड सौभाग्यप्राप्तीसाठी स्त्रिया भाद्रपद मासात गौरींचे पूजन करतात. तीन दिवस साजरा केल्या जाणार्‍या या पूजेत भाद्रपद शुक्ल पक्षाच्या षष्ठीला ज्येष्ठा गौरीचे आवाहन केले जाते. दुसर्‍या दिवशी पूजन व नैवेद्य तसेच तिसर्‍या दिवशी विसर्जन करतात.
 
पौराणिक कथेनुसार असुरांच्या त्रासाला कंटाळून सर्व स्त्रिया आपले सौभाग्य अक्षय करण्यासाठी गौरीला शरण गेल्या. तिची प्रार्थना केली तेव्हा श्री गौरीने भाद्रपद शुद्ध अष्टमीला असुरांचा संहार करून पृथ्वीवरील प्राण्यांना सुखी केले. अखंड सौभाग्य प्राप्त होण्यासाठी स्त्रिया ज्येष्ठा गौरी हे व्रत करतात.
 
पूजा करण्याची पद्धत -
हे पूजन करण्याच्या विविध पद्धती आहेत. यामध्ये परंपरेनुसार धातूची, मातीची प्रतिमा किंवा कागदावर श्री गौरीचे चित्र काढून, तर काही ठिकाणी नदीकाठचे पाच लहान खडे आणून त्यांचे गौरी म्हणून पूजन केले जाते. अनेक ठिकाणी पाच लहान मडक्यांची उतरंड रचून त्यावर गौरीचा मातीचा मुखवटा बसवतात. काही ठिकाणी धातूच्या कोठ्यांवर मुखवटा बसवतात. काही ठिकाणी सुवासिक फुले येणार्‍या वनस्पतीची रोपे अथवा तेरड्याची रोपे एकत्र बांधून त्यांची प्रतिमा तयार करतात आणि त्यावर मातीचा मुखवटा चढवतात. रूढीप्रमाणे मूर्तीला साडी नेसवून अलंकारांनी सजवतात. गौर सजवल्यानंतर शुभ मुहूर्तात गौरी बसवितात. गौरीला घरात आणताना रांगोळीने आठ पावले काढतात. थाटामाटात घरात आणता प्रत्येक पावलावर गौरीला थांबवून आत आणून आसनावर विराजमान करतात.
 
महापूजनात पाना-फुलांची आरास करतात, शेवंतीची वेणी माळवतात. हार, चाफ्याचे फूल, केवड्याचे पान वाहतात. गौरीची स्थापना झाल्यानंतर दुसर्‍या दिवशी ज्येष्ठ नक्षत्रावर महालक्ष्मीची पूजा करतात व महानैवेद्य दाखवितात. माहेरी आलेल्या गौरीला विशिष्ट प्रकाराचे पदार्थ खाऊ घालण्याची पद्धत आहे. माहेरवाशीण ज्येष्ठ गौरीला पुराणाचा नैवेद्य दाखवतात. नैवेद्याला १६ भाज्या, १६ कोशिंबिरी,१६ चटण्या,१६ पक्वान्ने तसेच फराळाचे पदार्थ करतात. पुरणाची १६ दिव्यांनी आरती करतात.संध्याकाळी हळदी-कुंकवाचा समारंभ केला जातो.अनेक जागी रात्री झिम्माफुगड्या,घागरी फुंकणे असे खेळ खेळून जागरण केले जाते.
 
तिसर्‍या दिवशी खीर-कानवल्याचा नैवेद्य दाखवून गौरीचे विसर्जन करतात. परंपरेनुसार मुखवटे हालवण्यात येतात, खडे असल्या नदीत विसर्जन करून परत येताना नदीतील माती घरी आणून ती सर्व घरभर पसरवतात.