शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. »
  3. मराठी सिनेमा
  4. »
  5. नाट्य-चित्र-समीक्षा
Written By चंद्रकांत शिंदे|

लालबाग- परळ- गिरणी कामगारांचा संघर्ष

PR
दार मोशन पिक्चर्स प्रस्तुत
सत्य अश्वमी फिल्म्स द्वारा निर्मित.
निर्माता- अरुण रंगाचारी
दिग्दर्शक- महेश मांजरेकर
कथा-पटकथा- जयंत पवार, महेश मांजरेकर
गीतकार- श्रीकांत गोडबोले
संगीत- अजित परब.

निर्माता-लेखक-अभिनेता-दिग्दर्शक अशा अनेक भूमिका पार पाडणारा महेश मांजरेकर सध्या मराठीत एकापेक्षा एक चांगले चित्रपट घेऊन येऊ लागला आहे त्याबद्दल त्याचे अभिनंदन करावे लागेल. शिक्षणाच्या समस्येवर आधारित शिक्षणाच्या आयचा घो नंतर महेश आता लालबाग-परळ झाली मुंबई सोन्याची हा गिरणी कामगारांच्या समस्येवरील चित्रपट घेऊन प्रेक्षकांसमोर आला आहे.

अण्णा (शशांक शेंडे) मिल कामगार असतात. घरात खाणारी सहा तोंडे, मिलमधील विभाग बंद झाल्याने नोकरी नाही. मिल मालकाने वीआरएस घेतल्यानंतरही पैसे देण्यास केलेली टाळाटाळ त्यामुळे दोन वेळच्या जेवणाचीही समस्या. मोठा मुलगा मोहन (विनीत कुमार) एका पतपेढीत दुकानांमध्ये जाऊन पैसे गोळा करण्याचे काम करीत असतो. मधला मुलगा बाबा (अंकुश चौधरी) याला लेखनाची आवड असते. छोटा मुलगा नरू (करण पटेल) भाईगिरी करण्यात दिवस घालवत असतो तर छोटी बहीण मंजू (वीणा जमकर) एका ब्युटी पार्लरमध्ये काम करून घरखर्चाला मदत करीत असते. आई (सीमा विश्वास) कशी तरी सगळ्यांच्या पोटापाण्याची सोय करीत असते. या कुटुंबाच्या माध्यमातून महेशने गिरणी कामगारांच्या संपाची तीव्रता पडद्यावर भेदकपणे मांडलेली आहे.

शेंडे परिवारातील या सगळ्यांच्या भूमिका खूपच उत्कृष्ट झालेल्या आहेत. सीमा विश्वासने छोट्याश्या भूमिकेतही असहाय गिरणी कामगाराची पत्नी उत्कृष्टरीत्या साकार केली आहे. करन ने नारूची आणि अंकुश चौधरी ने बाबाची भूमिकाही चांगल्या पद्धतीने साकारली आहे.

अन्य कलाकारांमध्ये सिद्धार्थ जाधवने स्पीडब्रेकरच्या भूमिकेत जान ओतली आहे. त्याची देहबोली, त्याचा अभिनय एका गिरणी कामगाराच्या मुलाचे योग्य रूप पडद्यावर उतरवतो. सचिन खेडेकरने गिरणी कामगारांचा नेता राणे याची, गणेश यादवने परशा भाईची तर समीर धर्माधिकारीने कावेबाज आणि लालची मिल मालकाची भूमिका चांगल्या पद्धतीने वठवली आहे. विनय आपटेही छोट्या भूमिकेत प्रभाव पाडतात. यांच्याबरोबरच खरोखरच्या गिरणी कामगारांच्या मुलांनाही महेशने चांगले वापरून घेतले आहे. सतीश कौशिक यांनी मामा आणि कश्मीरा शहाने मामीची भूमिका साकारली आहे.

एका वेळच्या अन्नाची ददात असल्याने गिरणी कामगारांची मुले कशी देशोधडीला लागतात, गिरणी मालकांची अरेरावी आणि घर खर्च चालवण्यासाठी शरीर विक्रय करण्यास गिरणी कामगाराची मुलगी कशी तयार होते ते विदारकपणे दाखवले आहे. चित्रपटाचा बाज चकचकीत न ठेवता ग्रे ठेवला असल्याने तीव्रता अंगावर येते. खरे तर मुंबईचे वातावरण प्रदूषित असल्याने कॅमेर्‍यात चकचकीतपणा दिसत नाही परंतु काही दिग्दर्शक दाखवतात. महेशने हे टाळले आहे. गिरणी कामगारांच्या खडतर जीवनातील प्रेमप्रसंगही मोजक्याच दृश्यात महेशने दाखवले आहेत. परंतु काही ठिकाणी दृश्ये उगाचच ताणली आहेत असे वाटते. अर्थात ती दृश्ये अंगावर यावीत म्हणून महेशने असे केले असावे. एका दृश्यात सचिन खेडेकर एखाद्या वेड्याप्रमाणे भात खाताना दाखवला आहे. तेव्हा वाटते की हा आता वेडा झाला असावा परंतु दुसर्‍याच दृश्यात तो गिरणी कामगारांसमोर उत्कृष्ट भाषण देताना दिसतो. काही उणीवा सोडल्या तर गिरणी कामगारांचा हा जीवनपट सुंदरच आहे. जयंत पवार यांच्या कथेतच प्राण आहे आणि महेशने चित्रपटही तितक्याच ताकदीने मांडला आहे.