कुलदीप पवार : रांगडा (खल) नायक
भारदस्त आवाज व आकर्षक व्यक्तीमत्व लाभलेले कुलदीप पवार मराठीतील एक गाजलेले अभिनेते आहेत. लहानपणापासून रूपेरी पडदा त्यांना खुणावत होता. त्यासाठी त्यांनी कोल्हापूर येथील घरही सोडले. कऱहाड, पुणे आणि अखेर मायानगरी मुंबईत जाऊन ते धडकले. तोपर्यंत त्यांच्या नावावर 'एक माती अनेक नाती' हा चित्रपट होता. पण तेवढ्या जोरावर त्यांना काम कुठेच मिळेना. शेवटी एका मध्यस्थामार्फत ते नटश्रेष्ठ प्रभाकर पणशीकरांपर्यंत जाऊन पोहोचले आणि त्यांच्या नौकेला योग्य किनारा मिळाला. पणशीकर तेव्हा 'इथे ओशाळला मृत्यू'तील संभाजीच्या भूमिकेसाठी कलाकाराच्या शोधात होते. योगायोगाने पवारांची भेट झाली नि त्यांना हवा तसा संभाजी मिळाला. भारदस्त आवाज नि धिप्पाड शरीरयष्टी पवारांच्या पथ्थ्यावर पडली. त्यानंतर मग त्यांना मागे वळून पाहण्याची संधी मिळाली नाही. एकामागोमाग एक चांगली नाटकं मिळत गेली. मग रूपेरी पडद्यावरही दणक्यात पुनरागमन झाले. अश्रूंची झाली फुले, होनाजी बाळा, वीज म्हणाली धरतीला ही काही त्यांची गाजलेली इतर नाटके. पती माझा उचापती हे गेल्या काही दिवसांपासून गाजत असलेले नाटकही त्यांचेच. चित्रपटात त्यांनी लक्षणीय ठसा उमटवला. साधा, भोळा नायक ते बेरकी खलनायक अशा विविध छटांच्या भूमिका त्यांनी ताकदीने उभ्या केल्या. तुळजाभवानी, कलावंतीण या चित्रपटात त्यांना छोट्या भूमिका मिळाल्या. पण अनंत मानेंच्या दरोडेखोर चित्रपटाने त्यांच्या कारकिर्दीस नवे वळण दिले. अरे संसार संसार मधला शेतकरी त्यांनी जसा साकारला तितक्याच तडफदारपणे त्याने शापित चित्रपटातला खलनायकही. त्यानंतर मग जावयाची जात, बिनकामाचा नवरा, नवरे सगळे गाढव, गुपचूप गुपचूप, खरा वारसदार हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट. पवारांनी नंतर छोट्या पडद्यावरही उल्लेखनीय काम केले. विशेषतः त्यांची परमवीर ही डिटेक्टीव्ह मालिका खूप गाजली. स्टार प्लस वाहिनीवरील तू तू मैं मैं या मालिकेच्या माध्यमातून सध्या ते प्रेक्षकांना हसवत आहेत. कुलदीप पवार अभिनित गाजलेले काही चित्रपट : एकापेक्षा एक, सर्जा, नवरे सगळे गाढव, संसार पाखरांचा, शापित, देवाशपथ, नवरा माझा नवसाचा जावयाची जात ढगाला लागली कळ खरा खासदार नाटके-अश्रूंची झाली फुलेवीज म्हणाली धरतीलापाखरूरखेलीनिष्कलंकपती माझे उचापती