ज्येष्ठ अभिनेते कुलदीप पवार यांचे निधन
मुंबई- भारदस्त आवाजाचा अभिनेता म्हणून मराठी चित्रपटसृष्टीमध्ये ओळख असलेले ज्येष्ठ अभिनेते कुलदीप पवार (वय 64) यांचे सोमवारी रात्री मुंबईत निधन झाले. अंधेरीतील कोकोळीबेन अंबानी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कुलदीप पवार मुळचे कोल्हापूरचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर आज, मंगळवारी वर्सोवा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
कुलदीप पवार यांना मुंत्रपीडाचा विकार असल्याने त्यांना शनिवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृती अधिक खालावल्याने त्यांना आयसीयूत हलविण्यात आले होते. परंतु उपचार सुरु असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.
नाटक, दूरचित्रवाणीवरील मालिका आणि चित्रपटांमधून विविधांगी भूमिका साकारणारे पवार यांनी अचानक एक्झिट घेतल्यामुळे कलाकरांनी दु:ख व्यक्त केले आहे.
चित्रपटांबरोबरच मराठी नाटक आणि मालिकांमध्येही त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. 'नवरे सगळे गाढव', 'शापित','देवाशपथ', 'नवरा माझा नवसाचा','जावयाची जात','एकापेक्षा एक','सर्जा','संसार पाखरांचा','ढगाला लागली कळ','खरा खासदार'असे कुलदीप पवार अभिनित गाजलेले काही चित्रपट.
नाटके: 'पती सगळे उचापती', पाखरू', 'रखेली','निष्कलंक', 'अश्रूंची झाली फुले', 'वीज म्हणाली धरतीला'