शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. मराठी सिनेमा
  4. »
  5. मराठी कलावंत
Written By अभिनय कुलकर्णी|

संगीतसूर्य पलुस्कर (पुण्यतिथी विशेष)

MH GovtMH GOVT
प्रतिभावान गायक पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांचे तमाम कानसेनांवर थोर उपकार आहेत. या माणसाने संगीताच्या क्षेत्रात जे काही केले त्याला हिमालयाएवढे असे विशेषण सहज लावता येईल.

संगीताच्या क्षेत्रात गुरूशिष्य परंपरा तर रहाणारच. पण तरीही या शिकवणीला एक शास्त्रीय स्वरूप देऊन, त्याचा अभ्यासक्रम, पुस्तके तयार करून, स्वरांच्या नोटेशन तयार करून पलुस्करांनी संगीत सामान्यांपर्यंत पोहोचविले.

सांगली जिल्ह्यातील कुरुंदवाड या संस्थानिक गावात १८ ऑगस्ट १८७२ मध्ये त्यांचा जन्म झाला. पलुस्करांचे वडिल दिगंबर गोपाळ पलुस्कर हे प्रख्यात कीर्तनकार. त्यामुळे त्यांच्या चिरंजीवांचे कान लहानपणापासूनच तयार झाले नसते तरच नवल. शिवाय वडिलांना साथ करण्याच्या दृष्टीकोनातून पलुस्कराना संगीताचे वारे लागले. याचवेळी ते शालेय शिक्षणही सुरू होते.

एकदा कुरुंदवाडजवळ असलेल्या नरसोबाच्या वाडीत दत्त जयंतीच्या दिनी केली जाणारी आतषबाजी पहायला लहानगा विष्णू गेला आणि तेथे उडालेल्या फटाक्याने त्याच्या डोळ्याला दुखापत झाली. त्यामुळे त्यांना अंशतः अंधत्व आले. त्याच्यावर उपचार करता करता डॉक्टरांना समजले की याचा गळा चांगला आहे. त्यांनी कुरुंदवाड संस्थानच्या राजेसाहेबांना त्याची शिफारस केली. त्यांनीही ती स्वीकारून विष्णूला बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांच्याकडे त्याला गाण्याची शिकवणी लावली.

बाळकृष्णबुवांनी स्वतःचे गायनाचे शिक्षण ग्वाल्हेर येथे अनेक दिग्गजांकडून घेतले होते. त्यांच्यासारख्या विद्वानाचे शिष्यत्व विष्णू दिगंबरांना खूप काही देऊन गेले. बाळकृष्णबुवांचे सारे काही टिपकागदाप्रमाणे शोषून घेऊन समृद्ध होत जाणार्‍या विष्णूविषयी बाकीच्या शिष्यांना मात्र मत्सर वाटू लागला. त्यांनी बाळकृष्णबुवांच्या मनात विष्णूविषयी भरवून दिले. त्यामुळे या दोघांमधील संबंधांमध्ये दरी निर्माण झाली. अखेर पलुस्करांनी आपल्या दोन मित्रांसह नाईलाजाने मिरज सोडून बडोदा गाठले. तेथील राजांसमोर गाण्याची त्यांना संधी मिळाली. त्यावेळी ग्वाल्हेरप्रमाणे बडोदा हेही संगीताला पोषक असे ठिकाण होते. बडोद्याहून त्यांनी आपली संगीतयात्रा पुढे सुरू ठेवली.

बडोद्याहून ते सौराष्ट्र, ग्वाल्हेर, मधुरा, भरतपूर, दिल्ली आणि नंतर पंजाबला पोहोचले. मथुरेला असताना ते तेथील ब्रज भाषा शिकले. हिंदूस्थानी संगीतातील अनेक चीजा या भाषेतील आहेत. सहाजिकच त्या संपूर्णपणे कळाव्या या हेतूने त्यांनी या भाषेत प्रावीण्य मिळविले.

त्यांचे पंजाबमधील वास्तव्य आयुष्याला कलाटणी देणारे ठरले. पंजाबात अमृतसर, ओकारा येथून त्यांनी लाहोर गाठले. लाहोरला त्यांनी ५ मे १९०१ मध्ये गांधर्व महाविद्यालयाची स्थापना केली. भारतीय आधुनिक संगीतातील हा टर्निंग पाईंट म्हणता येईल. गुरूकुलाश्रम पद्धतीने हे विद्यालय चालविले जात असे. संगीत विषयाचा चढता अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तके, अंतिम परिक्षेनंतर मिळणारे प्रमाणपत्र यामुळे विद्यालय भरभराटीला आले. तेथील शिक्षणही दर्जेदार असे. विशेष म्हणजे कुणाचीही मेहेरबानी न घेता त्याचा आर्थिक गाडा चालविला जाईल. लोकांच्या देणग्या आणि पलुस्कराच्या कार्यक्रमांतून जमा होणारे पैसे हे त्याचे स्त्रोत होते. महाविद्यालयात कठोर शिस्त पाळली जाई. शिवाय नैतिक शिस्तही विद्यार्थ्यांना शिकवली जाई. त्यामुळेच या महाविद्यालयाचे सुरवातीचे शिष्य पुढे हिंदूस्थानी संगीतातील दिग्गज बनले.

यानंतर महाविद्यालयाच्या विस्तारासाठी मुंबई गाठली. लाहोरचे विद्यालय त्यांनी मुंबईत हलविले. तेथे त्यांनी विद्यार्थ्यांना रहाण्याची सोयही केली. पण एवढे करताना त्यांना खूप कर्ज झाले. ते फेडण्यासाठी त्यांनी अनेक कार्यक्रम केले. पण कर्ज वाढतच गेले. एकदा ते कार्यक्रमाच्या दौर्‍यावर असताना त्यांच्या कर्जदारांनी त्यांची वास्तू लिलावात विकून टाकली आणि आपले पैसे सोडवून घेतले. या बातमीने पलुस्करांच्या जीवनाची लयच बिघडली.

विरक्ती आल्याने ते नाशिकला गेले. तेथे त्यांनी रामनाम आधाराश्रमाची उभारणी केली. तेथे रामधून म्हणत आपले मन रममाण केले. त्यांची भटकंती नाशिकला आल्यानंतरही सुरूच होती. पूर्ण भारताबरोबरच नेपाळलाही ते जाऊन आले. पण हे सर्व करताना प्रकृतीने दगा द्यायला सुरवात केली. नंतर ते पुन्हा मिरजेला गेले. तेथेच त्यांनी २१ ऑगस्ट १९३१ ला देह ठेवला.

पलुस्करांनी काही लोकांपुरतेच असलेले संगीताचे विश्व त्यांनी सगळ्यांसाठीच उघडे केले. त्या काळात संगीत शिकणे हलके समजले जायचे. शिवाय त्यासाठी कुणा उस्तादाकडे जावे लागायचे. हौसेने संगीत शिकण्याची सोयच उपलब्ध नव्हती. पलुस्करांनी ती मिळवून दिली. संगीताला अभ्यासक्रमात बसवून त्यांनी प्रतिष्ठा दिली. संगीताच्या नोटेशन्स लिहून त्याचा ठेवा पुढील पिढीकडे दिला. त्यामुळे मूळ चीज कशी होती ते समजणे सोपे झाले. गवई म्हणजे विविध व्यसने असणारा अशी पारंपरिक समजून मोडीत काढून त्यांनी नैतिक शिस्तीला महत्त्व दिले. त्यामुळे त्यांचे शिष्य आचरणातही चांगले निघाले. संगीत महाविद्यालयामुळे मुलीही गाणे शिकायला येऊ लागल्या. त्यांच्या कार्यक्रमांना बडे लोक बोलाविले जायचे. ते रेल्वे प्रवासही फर्स्ट क्लासने करायचे.

संगीत त्यांच्यासाठी अत्यंत पवित्र होते. देवाच्या अस्तित्वाची जाणीव त्यामुळे होते, असे त्यांचे मत होते. त्यामुळे हे पावित्र्य सांभाळण्यासाठी ते कायम जागरूक असत. एकदा एका राजाने बोलाविलेल्या बैठकीत ते गायनासाठी गेले. थोड्या वेळाने राजाने धुम्रपान सुरू केले. पलुस्करांना संताप आला. दिसत नसले तरी त्यांना धुर जाणवत होता. त्यांनी धुम्रपान बंद करण्यास सांगितले. पण कुणीतरी त्यांच्या कानात सांगितले की प्रत्यक्ष महाराजा धुम्रपान करीत आहेत. त्यावेळी संतापून पलुस्कर ओरडले, या खोलीत मी महाराजा आहे. त्यामुळे त्यांना थांबवायला सांगा किंवा निघून जा म्हणाव. इंग्लंडचे युवरात भारतात आले तेव्हा संगीताचा कार्यक्रम करण्यासाठी त्यांनाच बोलविण्यात आले होते.

पलुस्करांच्या रघुपती राघव राजाराम या रामधुनेनंतरच महात्मा गांधी यांची दांडीयात्रा सुरू झाली होती. पुढे हीच धुन गांधीजींची नैमित्तिक प्रार्थना बनली. कॉंग्रेसच्या अधिवेशनात तेच राष्ट्रीय गाणी म्हणत असत. १९२३ मध्ये काकीनाडा येथे कॉंग्रेसचे अध्यक्ष मौलाना महम्मद अली जीना यांनी त्यांना वंदे मातरम म्हणण्यास मनाई केली. त्यावेळी कॉंग्रेस काही कोणाची खासगी मालमत्ता नाही, असे सांगून त्यांनी ते गीत संपूर्णपणे गायले. असा हा बाणेदार संगीतकार, गायक आयुष्यात केवळ संगीताच्या लयीवरच जगला.