शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. सामान्य ज्ञान
Written By
Last Modified: मंगळवार, 3 ऑगस्ट 2021 (14:03 IST)

स्वामी विवेकानंद : ‘माझे गुरुदेव’

स्वामी विवेकानंद हे धर्मप्रसारासाठी भारताचे प्रतिनिधी म्हणून शिकागो येथे गेले होते. तेथे त्यांनी धर्मपरिषदेत श्रोत्यांची मने जिंकून घेतली. त्यांचा विलक्षण प्रभाव निर्माण झाला. त्यामुळे स्वामी विवेकानंदांना तेथील अनेक संस्थांतर्फे व्याख्यानांसाठी निमंत्रणे मिळू लागली. त्यात स्वामींनी ज्ञानयोग, भक्तीयोग, कर्मयोग, राजयोग हे विषय प्रभावीपणे मांडले. त्यात सर्व श्रोता अगदी मंत्रमुग्ध होत असे आणि देहभान विसरुन त्यांच्या निरूपणाचा आस्वाद घेत असे. 
 
एकदा अशाच एका कार्यक्रमाच्या समारोपानंतर श्रोत्यांनी स्वामी विवेकानंद यांना घेराव करत तीव्र जिज्ञासेपोटी त्यांना प्रश्न विचारू लागले की हे महान तपस्वी स्वामी आपण हे अलौकिक ज्ञान कुठल्या शाळेत संपादन केले ? कृपा करून आम्हाला विस्तारपूर्वक सांगा. 
 
त्यावर स्वामी विवेकानंद उत्तरले, अवश्य. हे अमूल्य ज्ञान मला केवळ माझ्या गुरुदेवांकडूनच प्राप्त झाले आहे. तेव्हा श्रोत्यांनी अधीरतेने प्रश्न विचारला, ‘आपले गुरु कोण आहेत ?’ स्वामी विवेकानंदांनी सांगितले, ‘आपली या संबंधी ऐकण्याची तीव्र जिज्ञासा असेल, तर आम्ही अवश्य सांगू.’
 
तेव्हा स्वामी विवेकानंदांच्या विशेष प्रवचनाचे आयोजन करण्यात आले. प्रवचनाच्या विषयाचे नाव होते, ‘माझे गुरुदेव’. त्या संबंधी प्रसिद्धी करण्यात आली ज्यामुळे कुतुहलापोटी व्याख्यानासाठी अफाट असा जनसमुदाय उपस्थित होता. व्याख्यानाच्या नियोजित वेळी स्वामी विवेकानंद संबोधन करायला जेव्हा व्यासपिठावरील आसंदीवरून उठून उभे राहिले, तेव्हा नीरव शांतता निर्माण झाली. ते सद्गुरूंसंबंधी बोलण्यासाठी उभे असून उपस्थित अफाट श्रोत्यांना पाहून त्यांच्या मनात सद्गुरूंविषयी कृतज्ञतेचा भाव दाटून आला. त्यांनी जेव्हा बोलण्यास प्रारंभ केला तेव्हा त्यांच्या मुखातून पहिले वाक्य बाहेर पडले ते म्हणजे ‘माझे गुरुदेव !’ हे शब्द अतिशय सद्गदित अंतःकरणाने अवस्थेमध्ये उच्चारले गेले.
 
त्यांच्या भावापूर्ण उच्चारणामुळे त्यांच्या डोळ्यांसमोर साक्षात गुरूंचे रूप उभे ठाकले. सद्गुरूंचे साक्षात रूप डोळ्यांसमोर आल्याने त्यांचा कंठ दाटून आला. डोळ्यांतून घळाघळा अश्रूधारा वाहू लागल्या. अंग रोमांचित होऊन थरथर कापू लागले. अशा परिस्थितीत ते १० मिनिटे काही बोलू शकले नाही. त्यांची ही अवस्था पाहून श्रोते हैराण झाले. केवळ गुरुच्या स्मरणाच्या प्रभावामुळे डोळ्यांमधून अश्रूप्रवाह वाहिल्याचे यापूर्वी कधीच कोणी बघितले नव्हते. ते सर्व हैराण नजरेने स्वामी विवेकानंद यांच्याकडे बघत राहिले.