सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: मंगळवार, 3 जानेवारी 2023 (21:23 IST)

मंत्रपाठ किंवा ध्यानधारणा करुन मन शांत होऊ शकतं का?

आपलं आयुष्य वेगवान आणि महत्त्वाकांक्षायुक्त आहे. स्वप्नं प्रत्यक्षात आणणं हेच अनेकांच्या आयुष्याचं ईप्सित आहे. दुष्टचक्रासदृश आयुष्यामुळे आपलं आयुष्य चिंतातूर झालं आहे.
आपण सगळे सध्या जसा विचार करतो त्यात नेमकं काय चुकतंय? मंत्रपाठ किंवा ध्यानधारणा करुन मन शांत होऊ शकतं का? हा कळीचा प्रश्न आहे.
 
कोणत्याही सर्वसाधारण दिवशी आपल्या डोक्यात 24 तासात 24000 प्रकारचे विचार येतात.
 
ध्यान म्हणजे सदाभटकू पाहणाऱ्या आपल्या मनाला झाडाच्या एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर उडी मारणाऱ्या माकडासारखं वागू न देणं.
 
मंत्रांच्या माध्यमातून एकाचवेळी अनेक गोष्टींवर चित्त एकाग्र करुन आपली ऊर्जा वाचवतं.
मन आणि त्र यांच्या संगमातून तयार झाला मंत्र शब्द
'द एनशियंट सायन्स ऑफ मंत्राज' या पुस्तकाचे लेखक ओम स्वामी सांगतात, "मंत्र आणि ध्यान यांची ओळख लहानपणीच झाली होती. तेव्हापासून मी मंत्रपठणाला सुरुवात केली.
 
संस्कृतातील मंत्र हा शब्द मन आणि त्र यांच्या एकत्रीकरणातूनच तयार झाला आहे. मनाचा अर्थ आपला मेंदू आणि त्र म्हणजे अवजार. भरकटलेल्या मनावरचा उतारा यादृष्टीने लोक मंत्रांकडे पाहतात."
"पण मंत्रपठणाच्या पारंपारिक उपयोगात गहिरा अर्थ दडला आहे. आवाज हा मानवी अस्तित्वाचा अविभाज्य घटक आहे. ओम स्वामी सांगतात, आपण जे बोलतो ते आपल्या तोंडावाटे उच्चारण होणारे शब्द असतात. हे शब्द आपलं जग असतं आणि हेच शब्द आपलं जग बिघडवूही शकतात".
 
मंत्र अशा पद्धतीने तयार करण्यात आले आहेत की आपण चुकीच्या वाटेने जाऊ लागलो तर ते कवच बनेल. मंत्र आपल्या डोक्याला सातत्याने विचलित करणाऱ्या गोष्टीला बाजूला सारतात."
 
नकारात्मक विचार
भूतकाळ लक्षात ठेवणं आणि भविष्याचं चित्र रंगवणं या मानवी क्षमतांमुळेच अनेक पिढ्यांचं यशस्वी संक्रमण झालं आहे. पण हा सद्गुण आपलं नुकसानही करु शकतो.
 
लिंकोपिंग विद्यापीठातील न्यूरोइमेजिंगच्या असोसिएट प्राध्यापक रोजालिन सायमन यांच्या मते, भूतकाळ लक्षात राहणं आणि भविष्याची स्वप्नं पाहणं हे आपलं गुणवैशिष्ट्यच आहे. सैद्धांतिक पातळीवर माणसाचं अस्तित्व राखण्यात या कौशल्याचं प्रमाण मोठं आहे.
 
त्या सांगतात, "जेव्हा आपण निसर्गाचा जंगलीपणा किंवा नकारात्मक विचारांपासून दूर जाण्याचा प्रयत्न करतो तेव्हा हे कौशल्य कामी येतं".
 
पण माणूस म्हणून रोजच्या धकाधकीच्या जीवनात गोष्टी लक्षात ठेवणं, कल्पनाविलास यांचा सातत्याने सामना करतो. पण ही गोष्ट आपलं आयुष्य सोपं करत नाही. कारण या सवयींमुळे आपण आणखी विचार करू लागतो.
 
आपल्या आयुष्यात नकारात्मक गोष्टीही असतात. खूप साऱ्या माणसांच्या डोक्यात हाच विचार डोकावतो तो म्हणजे- मी या जगण्यासाठी लायक नाही.
 
मी अमुक गोष्ट करुच शकत नाही, माझं नेहमी असंच होतं असे विचार मनात सातत्याने येतात.
 
'मी यशस्वी होणारच नाही'
आपण जेव्हा पुढचा म्हणजे भविष्याचा विचार करतो तेव्हा डोक्यातला एक भाग सक्रिय होतो ज्याला वैज्ञानिक भाषेत डिफॉल्ट मोड नेटवर्क म्हटलं जातं. समस्यांच्या निराकरणाच्या दृष्टीने मेंदूचा हा भाग अतिशय महत्त्वाचा असतो.
 
पण मेंदूचा हा भाग निराशाच्या गर्तेत नेणारे विचार आणि आत्मविश्लेषण याचंही केंद्र असतं. जेव्हा मेंदूचा डिफॉल्ट मोड सक्रिय होतो, तेव्हा आपल्या मनात मनातल्या मनात स्वत:चं मूल्यमापन, आपल्या कामाचा ताळेबंद असे विचार येतात.
 
या विचारांच्या आधारावर भविष्यात आपलं काय होईल याचा अंदाज मेंदू लावू लागतो.
 
जेव्हा मेंदूचा हा हिस्सा सक्रिय होऊन कार्यरत असतो तेव्हा तुमची तंद्री लागते. ब्रह्रानंदी टाळी म्हणतात त्या स्थितीत आपलं मन जातं. माणसं विचारांमध्येच भरकटतात. त्यांना भवतालाचं भान राहत नाही.
 
रोजालिन सायमन सांगतात, "स्मरणशक्तीच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर आपण त्या क्षणी सभान नसू तर ती गोष्ट तुमच्या लक्षात राहणार नाही. जो अनुभव तुम्ही समरसून जगत नाही तो तुम्हाला नंतर आठवत नाही. रोजालिन आणि त्यांच्या सहकारी मारिया यांच्या मनात एक प्रश्न फेर धरुन होता की मंत्र खरंच आपल्या मेंदूला चालना किंवा शांतता मिळवून देतात का? शास्त्रीय पातळीवर हे सिद्ध करता येऊ शकतं का"?
 
यासाठी मारिया यांनी एक संशोधन हाती घेतलं. यामध्ये महिलांना सामील करुन घेण्यात आलं. या महिला शांतपणे मंत्राचा जप करत होत्या त्यावेळी त्यांच्या मेंदूतल्या हालचाली टिपण्यात आल्या. रोजालिन यांनी या हालचालींचा अभ्यास केला.
 
दोन आठवड्यांच्या अभ्यासानंतर हे स्पष्ट झालं की या अभ्यासात सहभागी महिलांच्या बाबतीत मंत्राचं पठण होत असताना मेंदूच्या डिफॉल्ट मोड नेटवर्क या भागातील हालचाली कमी झाल्या होत्या. जेव्हा अभ्यासात सहभागी महिलांनी मंत्राचा पुनरुच्चार केला तेव्हा त्यांच्या मेंदूचं अटेंशन नेटवर्क सक्रिय झालं आणि डिफॉल्ट मोड नेटवर्क शांत होऊ लागतं.
 
ध्यानाने स्मरणशक्ती तल्लख होते का?
जी माणसं नियमितपणे मंत्र म्हणतात त्यांच्या मनात, डोक्यात अन्य लोकांबाबत कोणतंही मत तयार करताना किंवा त्रासदायक नकारात्मक विचार मनात येतच नाहीत. मंत्र म्हटल्यामुळे एखाद्या गोष्टीवर चित्त एकाग्र करण्याची क्षमता वाढीस लागते तसंच स्मरणशक्ती तल्लख होते.
 
रोजालिन सांगतात की, "ज्ञानप्राप्ती कशी होते यासंदर्भात आपल्याकडे ठोस परीक्षण नाही. पण आम्ही अशा स्वरुपाची परीक्षा तयार करण्यासंदर्भात काम करत आहोत".
 
ओम स्वामी यांनी आपल्या आयुष्यात 15 हजारहून अधिक तास मंत्रपठणात व्यतित केला असल्याचं सांगितलं.
 
2018 मध्ये वैज्ञानिकांनी ओम स्वामी ध्यानधारणा करत असताना त्यांच्या मेंदूतील हालचाली टिपल्या. ओम स्वामी यांचा मेंदू स्थिर राखण्यात आणि मन शांत ठेवण्यात मंत्रांनी अद्वितीय अशी भूमिका बजावली होती.
 
मंत्र म्हणत असताना ध्यान लावण्याची प्रक्रिया कशी सुरू होते असा प्रश्न तुमच्या मनात आला असेल.
 
ओम स्वामी सांगतात, "एक चांगला मंत्र एका अक्षराचाही असू शकतो किंवा एक मोठं वाक्यही असू शकतं. अशा लांबलचक मंत्राला माला मंत्र म्हटलं जातं. मोत्यांच्या माळेप्रमाणे हा मंत्र असू शकतो.
 
मंत्र अक्षरांच्या खास पद्धतीने तयार होतो. मंत्र उच्चारणातून मेंदूत नव्या लहरी निर्माण होऊ शकतात. आपण मुखावाटे जे शब्द उच्चारतो त्याचंच महत्त्व असतं असं नाही. एखादा शब्द वेगळ्या पद्धतीने उच्चारला तरीही ते परिणामकारक होतं."
 
ओम स्वामी पुढे सांगतात, "मंत्र म्हणजे आवाज आणि ठहरावाचा सारासार विचार करुन खास पद्धतीने तयार केलेली व्यवस्था आहे.
 
मंत्राची भाषा आणि धर्माशी नातं
मंत्र म्हणताना ध्यानधारणेसाठी धार्मिक असण्याची आवश्यकता नाही.
 
कोणताही माणूस कोणत्याही भाषेतील मंत्र ध्यानधारणेसाठी निवडू शकतो. मंत्रोच्चारांना भाषेचा किंवा धर्माचा अडथळा येत नाही.
 
रोजालिन सायमन सांगतात, "कोणत्याही गोष्टीवर लक्ष केंद्रित केलं तर आपल्या विचारासाठी ते कामी येतं.
 
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या मेंदूत कोणते विचार आहेत. तुमच्या मनात लाडक्या कुत्र्याचा विचार आहे, तर तोही तुमचे विचार पालटवू शकतो. तोही तुम्हाला सकारात्मक ऊर्जा देऊ शकतो."
 
"तुमच्यासाठी जे महत्त्वाचं आहे त्याचं महत्त्व आपोआप वाढतं. हीच गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे. आपण मंत्रोच्चराच्या माध्यमातून विचारांच्या वेढ्यातून स्वत:ला बाहेर काढू शकतो".
 
Published By- Priya Dixit