शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: सोमवार, 26 डिसेंबर 2022 (20:36 IST)

चाळिशीनंतर पुरुषांमध्ये आढळणारे मेंदूचे हे 6 आजार तुम्हाला माहिती आहेत का?

Author,डॉ. केदार टाकळकर
अमेरिकेतील प्रसिद्ध मेंदूविकारतज्ज्ञ बेन कार्सन यांच्या आयुष्यावर आधारित Gifted Hands हा चित्रपट तयार केला आहे. ते बेन वारंवार सांगतात की माणसाचा मेंदू अतिशय जादुई अवयव आहे.
 
आपण ठरवलं तर योग्य वेळी तो चालवून आयुष्यात काहीही करू शकतो. स्वत: कार्सन त्याचं जिवंत उदाहरण आहेत. मात्र या मेंदूची चाळिशी आली की काळजीही तितकीच घ्यावी लागते.  
 
चाळिशी म्हणजे आयुष्याची मध्यावधी. एक अतिशय महत्त्वपूर्ण टप्पा. या टप्प्यावर व्यावसायिक प्रगती, त्यातले यश, कुटुंब, या सगळ्याची थोड्याफार प्रमाणात सवय झाली असते. आयुष्य प्रगल्भ होतं.
 
आपणही होतो अर्थातच. तर ही प्रगल्भता किंवा मॅच्युरिटी किंवा समंजसपणा मेंदुतील संप्रेरकांतील स्रावांमुळे, आणि त्यातून उद्धभवणाऱ्या पेशींच्या जाळ्यामुळे येतो. त्यालाच सामान्य भाषेत स्मृती असं म्हणतात. त्यामुळे अनुभव येतात. त्यातून एक समंजसपणा निर्माण होतो.
 
चाळिशीचं वय हे या समंजसपणा आणि विस्मृतीचा सुवर्णमध्य आहे. कारण जसं शरीर झिजतं, तसा मेंदूही झिजायला लागतो. त्यामुळे बुद्धीचा तल्लखपणा पूर्वीसारखा राहत नाही हे आपल्यापैकी अनेकांच्या लक्षात आलं असेल.
 
मेंदूची ही झीज जाणवू लागते. कारण मेंदूच्या पेशी, त्यांचं जाळं, संप्रेरके, या सगळ्यांच्या संरचनेत सूक्ष्म बदल होतो.त्यामुळे मज्जासंस्थेचे विविध आजार उद्भवतात. आज आपण अशाच काही आजारांची माहिती घेणार आहोत.
 
1. पक्षाघात
पक्षाघात किंवा स्ट्रोक किंवा लकवा हा सर्वांत परिचित मज्जासंस्थेचा आजार आहे. एका सर्वेक्षणानुसार जगात पक्षाघाताच्या 92 टक्के केसेस चाळिशीनंतर होतात. जसंजसं वय वाढतं तसं पक्षाघात होण्याचं प्रमाण वाढत जातं.
 
पक्षाघात दोन प्रकारचे असतात. पहिला प्रकार रक्तवाहिनी गोठवून टाकणारा असतो त्याला Ischemic Stroke असं म्हणतात. दुसरा प्रकार हा रक्तस्रावामुळे होतो. त्याला haemorrhagic असं म्हणतात.
 
 पक्षाघात हा आजार प्रामुख्याने रक्तवाहिन्यांशी निगडित आहे. रक्तवाहिनी गोठल्यामुळे किंवा तिचं आतलं  अतीव रक्तदाबामुळे आवरण फुटल्यामुळे पक्षाघाताचा झटका येतो. पक्षाघाताचं निदान CT Scan द्वारे करण्यात येतं.
 
वय, उच्च रक्तदाब, मेदाचं (Cholesterol) चं वाढतं प्रमाण, मद्य, तंबाखू, बिडी सिगारेट यांचं व्यसन आणि अनुवांशिकता ही पक्षाघात होण्याची मुख्य कारणं आहेत. याच कारणामुळे हृदयविकाराचा झटका सुद्धा येऊ शकतो.
Published By -Smita Joshi 
पक्षाघातात चेहरा तिरपा होणे, अर्धांगवायू होणं, वाचा जाणं, अचानक दृष्टी अधू होणं, चालण्याचं संतुलन बिघडणं, गोष्टी डबल दिसणं, तीव्र डोकेदुखी, उलटी होणे ही सामान्यत: पक्षाघाताची लक्षणं आहेत.
 
पक्षाघाताचा झटका आल्यावर तीन तासात उपचार केले तर आयुष्यभराचं अपंगत्व येण्यापासून बचाव करता येतो तसंच काही केसेसममध्ये प्राणही वाचवता येऊ शकतात. प्राथमिक उपचारानंतर हाता पायात राहिलेली क्षीणता, नियमित उपचाराद्वारे घालवता येते.
 
रक्तवाहिन्या गोठणाऱ्या आजारात रक्त पातळ करणारी औषधं नियमितपणे आयुष्यभर घ्यावी लागतात. पक्षाघातात रक्तस्राव झाला असेल तर रक्तदाब नियंत्रित ठेवणं हा एकमेव उपाय आहे.
 
पक्षाघात टाळण्यासाठी व्यायाम, रक्तदाब, मधुमेह नियंत्रणात ठेवणं, व्यसनांपासून दूर रहाणे, हृदयविकाराचं निदान करणं आणि त्यावर उपचार करणं अत्यावश्यक आहे.
 
2. स्मृतिभ्रंश
चाळिशीनंतर आढळणारा हा आणखी एक मोठा आजार आहे. स्मृतिभ्रंश हा मज्जातंतूंशी (Neurons) निगडित आजार आहे. मेंदूच्या मज्जातंतू बाधित झाल्यावर त्यांची क्षमता कमी होते आणि स्मृतिभ्रंश होतो. स्मृतिभ्रंशात केवळ विस्मरणच होत नाही तर मेंदूचा प्रत्येक भाग कमी काम करायला लागतो. मानवी मेंदूचे Frontal, Temporal, Occipital, and Parietal lobe असे चार भाग पडतात.
 
या चार भागापैंकी Frontal Lobe हा सर्वांत जास्त उत्क्रांत झालेला भाग आहे. भावनांचं नियंत्रण, समाजभावनेचं नियंत्रण, एकाग्रता, काम करण्याची पद्धत, आणि इतर महत्त्वाची कार्य हा भाग करतो. वाचा, संगीत, स्व ची ओळख Frontal lobe मुळे होते.
 
विस्मृतीच्या आजारात मेंदूचा एक एक भाग त्याचं कार्य करणं थांबवतो. रोग्याचा प्रवास, ‘थोडंफार विसरतो’ पासून ‘मी न माझा राहिलो’ इथपर्यंत होतो. माणसाची ओळखच पुसून टाकणारा हा आजार कुटुबीयांसाठी अत्यंत वेदनादायी असतो. या अवस्थेला आतापर्यंत कोणतंही ठोस कारण सापडलेलं नाही.
 
म्हातारपणात बिटा अम्लॉईड हे प्रथिन लवकर वाढू लागल्याने हा आजार होतो.परंतू हे का वाढतं याचा शोध अद्याप लागलेला नाही. चाळिशीनंतर या प्रथिनाचं प्रमाण वाढत जातं आणि सत्तरीत तर ते आणखी वाढतं.
 
स्मृतिभ्रंशाचं निदान करण्यासाठी MRI हे तंत्रज्ञान वापरतात. एकदा निदान झाल्यावर मेंदूची क्षमता वाढवणारी औषधं दिली जातात. दुर्देवाने ही औषधं एका विशिष्ट पातळीनंतर फारशी प्रभावी नसतात.
 
मग यावर उपाय काय तर डोकं चालवत राहणं. शब्दकोडं, सोडवणं, चिंतन, मनन करणं, चर्चा करणं हाच स्मृतिभ्रंश टाळण्याचा उत्तम उपाय आहे.
 
3. कंपवात (पार्किंन्सन्स डिसिज)
मज्जासंस्थेसारखाच शरीरातले विविध हार्मोन आपला मेंदू शाबूत ठेवण्यासाठी जबाबदार असतात. त्यांच्यात बिघाड झाला की अडचणी निर्माण होतात. डोपामाईन हे त्यापैकीच एक. दिवसरात्र मोबाईल हातात घेतल्यावर मेंदूत आनंदलहरी निर्माण करणारं हेच ते हार्मोन.
 
मात्र डोपामाईनच्या कमतरतेमुळे कंपवात होतो. डोपामाईनच्या अभावामुळे चेहऱ्यावरचा आनंद आणि इतर भाव नाहीसे होतात. शरीरावरचे नियंत्रण सुटत जाते हातात कंप जाणवू लागतो.
 
आवाजाचा जोर वाढतो मात्र शब्द अस्पष्ट होतात. चालताना बाक येणे, तोल जाणे, पाय घासून चालणे, शरीरात ताठरपणा येणं ही लक्षणं दिसू लागतात. चालण्यातली स्फूर्ती पूर्णपणे जाते. योग्य निदान झाल्यास 70-80 टक्के रुग्ण 80 टक्के बरे होतात..
 
 या आजाराचा पूर्णपणे नायनाट करता येत नाही हेही तितकंच खरं. त्यामुळे वर उल्लेख केलेली काही लक्षणं दिसल्यास आजाराचं निराकरण करून घेणं क्रमप्राप्त आहे.
 
4. नसांचे आजार
नसांचे आजार हा एक आणखी त्रासदायक प्रकार या वयात सुरू होतो. मधुमेहींचं वाढलेले प्रमाण आणि मुख्यत:शाकाहारी लोकांमध्ये या आजाराचा चांगलाच प्रादुर्भाव जाणवतो.
 
हातापायांना मुंग्या येणं, आग होणं, ‘विचित्र वाटणं’ इत्यादी अनेक लक्षणं घेऊन रुग्ण डॉक्टरांची वाट धरतात.
 
काही औषधं, मधुमेहावर नियंत्रण, योग्य आहार आणि भरपूर पाणी याद्वारे हे आजार टाळता येतात. नसांच्या आजाराची इतरही अनेक कारणं आहेत. यात थायरॉईड, रक्ताचे आजार इत्यादींचा समावेश होतो.
 
5. डोकेदुखी
गल्ली ते  दिल्लीपर्यंत आढळणारी ही सगळ्यात मोठे डोकेदुखी आहे. चाळिशीमध्ये वयानुसार ती अत्यंत समंजस रूप धारण करते. या वयात एक तर डोकेदुखीची सवय होते किंवा त्याची सवय झालेली असते. परंतु या वयात होणारा अत्यंत दुर्मिळ आजार म्हणजे Cluster headache.
 
या डोकेदुखीत डोळ्याच्या मागे भयंकर वेदना होतात. घणाचे घाव घातल्याप्रमाणे वेदना होतात. डोळ्यात आपोआप अश्रू येतात, डोळे भेसूर लाल होतात. मन अत्यंत बेचैन होतं. हा त्रास काही दिवस ते काही आठवडे चालतो.
 
गुच्छ्यांमध्ये येणारे हे अटॅक असल्याने याला Cluster headache असं म्हणतात. हे असह्य दुखणं नियंत्रणात येतं खरं परंतु त्यासाठी योग्य औषधोपचार घेणं अत्यावश्यक असतं.
 
6. अपस्मार
अपस्मार किंवा मिरगी याचा वयाशी तसा संबंध नाही तरीही याचा उल्लेख शेवटी करत होते. या आजारामागे अनेक रुढी आहेत. मेंदूच्या सर्किट मध्ये काही बिघाड झाल्यास शॉर्ट सर्किट होतं आणि अपस्माराचा झटका येतो. हात पाय कडक होतात, कपड्यात लघवी होणं, असे प्रकार दिसून येतात.
 
सर्वसाधारपणे बाल्यावस्थेत आणि किशोरावस्थेत होणारा हा आजार तसा चाळिशीत कमी होतो आणि साठीत उग्र रुप धारण करतो. हा आजार अनुवांशिक किंवा जनुकीय असू शकतो.त्याचप्रमाणे मेंदूत होणारा संसर्ग, पक्षाघात, डोक्याला मार, रक्तस्राव,  अशा अनेक कारणांनी अपस्माराचा झटका येऊ शकतो.
 
योग्य उपचार केल्यास 90 टक्के रुग्णांमध्ये हा आजार नियंत्रणात येतो.
 
मज्जासंस्थेत बिघाड होऊ नये म्हणून नियमित व्यायाम, योग्य आहार आणि भरपूर पाणी, आवश्यक झोप याचा आधार घेतला तर ‘डोकं ताळ्यावर राहील.’
 
(डॉ. केदार टाकळकर हे नागपूरस्थित मेंदूविकारतज्ज्ञ आहेत. लेखातील विचार त्यांच्या वैद्यकीय ज्ञानावर आधारित आणि वैयक्तिक आहेत.)