मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Modified: सोमवार, 26 डिसेंबर 2022 (18:48 IST)

केसांवरूनही लावता येतो स्वभावाचा अंदाज

बर्‍याच तरूणी केसांना जिवापाड जपतात. कारण, लांबसडक, काळेभोर केस हा सौंदर्याचा आरसा असतो. त्यामुळे काहींना लांबसडक केस आवडतात तर काहींना वेगवेगळे हेअर कट करणं आवडतं. केसांची ठेवण पर्सनॅलिटीमध्ये कमालीचा फरक घडवून आणते. आजकाल ब्युटी पार्लर्स तेजीत असल्यामुळे केसांवर आपल्याला हवे तसे प्रयोग करता येतात. म्हणजेच व्यक्तिमत्त्वामध्ये केसांना किती महत्त्व प्राप्त झालं आहे हे लक्षात येईल. पण, हे केस बोलतातही बरं का? एका संशोधनानुसार केसांवरून त्या व्यक्तीचा स्वभाव ओळखता येतो हे स्पष्ट झालं आहे. एखाद्या व्यक्तीला कशा प्रकारची हेअरस्टाईल आवडते अथवा त्या व्यक्तीच्या केसांची ठेवण कशी आहे यावरून स्वभावाचा अंदाज बांधता येऊ शकतो.
 
केसांमध्ये वापरण्यात येणार्‍या अँक्सेसरीजमधूनही स्वभावाची पारख करता येते. केसांमध्ये चित्रविचित्र, ठसठशीत हेअर अँक्सेसरीज घालणं आवडणार्‍या तरूणी गर्दीपासून निराळ्या राहणार्‍या किंवा फटकून वागणार्‍या असतात. त्यांचे वागणे चारचौघींप्रमाणे नसते. अँक्सेसरीज घालून रॅम्पवर अवतरणार्‍या मॉडेल आपल्यातल्या वाटत नाहीत ते याचमुळे. 
 
कपाळाच्या वर फार चकमक नसणारा, साधासा, निटेड, पिंट्रेड हेअरबेल्ट वापरल्याने व्यक्तिमत्त्वाला कोझीनेस प्राप्त होतो. अशा प्रकारे केस बांधणार्‍या मुली आतल्या गाठीच्या वाटत नाहीत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला एक प्रकारचा उबदारपणा प्राप्त होतो. 
 
काही जणींना केसांमधल्या एखाद्या बटेला लपेटण्याची हौस असते. अशांना थोडी हटके हुशारी असणारं आर्टिस्टिक समजलं जातं. शिवाय अशा मुली ट्रेण्डी असतात.
 
 तुमचेही केस लांब आणि वेव्ही असतील तर तुम्ही निश्चितच भाग्यवान आहात. अशा प्रकारचे केस मादक आणि फेमिनाईन समजले जातात. चारजणींमध्ये लक्ष वेधून घेणारा हा केशसंभार परफेक्ट समजला जातो.
 
लांबसडक केस मोकळे सोडणं आवडणार्‍या स्त्रिया मोकळ्या, फुलपाखरी वृत्ती असणार्‍या समजल्या जातात. मध्यम लांबीच्या मोकळ्या केसातून तुमचं ईव्हन टेम्पर झळकतं, आत्मविश्वास दिसतो. अशा प्रकारचे केस असणार्‍या स्पष्टवक्त्या असतात. 
 
मध्यम लांबीचे किंवा लांब, मोकळे, वार्‍यावर उडणारे, थोडे अस्ताव्यस्त केस आय डोण्ट केअर वृत्ती दर्शवतात. अशा स्त्रिया बिनधास्त आणि जगाची पर्वा न करणार्‍या असतात. 
 
बॉयकटपासून डायनाकटपर्यंत सगळे छोटय़ा कटचे प्रकार व्यक्तिमत्त्वातली शिष्टपणाची बाजू समोर आणतात. त्यातून समोरच्याला हातभर दूर राहाण्याचा संकेत दिला जातो. भांग पाडून वेणी घालणं हा गर्लिश लूक आहे आणि तो क्यूट, इनोसंट समजला जातो.