बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: रविवार, 27 जून 2021 (14:56 IST)

कोरोना: तुम्हालाही झोप येत नाही का? मग हे वाचून समजून घ्या

सरोज सिंह
कोरोना आणि झोप यांचा परस्परसंबंध आहे का?
 
दोन वर्षांपूर्वी गाद्या बनवणाऱ्या कंपनीने 'स्लीप इंटर्नशिप' अशी एक योजनारुपी जाहिरात काढली. यासाठी त्यांच्याकडे 1.7 लाख अर्ज आले.
 
स्लीप इंटर्नशिपसाठी 100 रात्री 9 तास झोपण्याची अट ठेवण्यात आली होती. कंपनी ही अट पूर्ण करणाऱ्यांना प्रत्येकी एक लाख रुपये द्यायला तयार होती.
 
जाहिरात पाहून प्रत्येकाला वाटलं, यात काय विशेष? मीही शंभर दिवस रोज नऊ तास झोपू शकतो. अनेकांनी अर्ज भरला. मुलाखतीनंतर हे झोपणं किती अवघड आहे याचा अंदाज सहभागींना आला.
 
तुम्हीही असा विचार करत असाल तर थांबा.
 
संशोधनानुसार हे स्पष्ट झालं आहे की कोरोनातून बरं झालेल्या 10पैकी 3 रुग्णांना झोपेशी संबंधित काही ना काही त्रास होतो आहे. कोरोना संकटाआधीही दहापैकी तीन लोकांना झोप न येण्यासंदर्भात अडचणी होत्याच.
 
झोपेशी निगडीत प्रत्येक गोष्ट आजार किंवा व्याधी असेलच असं नाही. यामुळे झोप न येणं याचं रुपांतर आजारात कधी होतं हे डॉक्टरांकडून समजून घेणं आवश्यक आहे. डॉक्टरांचा सल्ला यासंदर्भात कधी घ्यावा हेही माहिती असायला हवं.
 
झोपेचे टप्पे
इन्स्टिट्यूट ऑफ ह्यूमन बिहेव्हिअर अँड अलाईड सायन्सेसमधील ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ डॉ.ओम प्रकाश यांनी सांगितलं की, "झोपेचा एक टप्पा नव्वद मिनिटं म्हणजे दीड तासाचा असतो. रात्रभरात आपण साधारण असे चार पाच टप्पे पार करतो.
 
नव्वद मिनिटांच्या पहिल्या टप्प्याला नॉन रॅपिड आय मूव्हमेंट स्लीप (NREM) असं म्हणतात. रोजच्या भाषेत याला गाढ झोप असं म्हणतात. दुसऱ्या टप्याच्या तुलनेत हा टप्पा प्रदीर्घ असतो. झोपण्याआधी 60-70 मिनिटं
 
दुसऱ्या टप्प्याला रॅपिड आय मूव्हमेंट स्लीप (REM) असं म्हटलं जातं. या टप्प्यात आपल्याला स्वप्नं पडतात. या टप्प्यातल्या झोपेतल्या गोष्टी आपल्या लक्षात राहतात.
 
 
जसं आपल्याला झोप लागते तसतसं एनआरईएम कमी होत जातं आणि आरईएम वाढत जातं".
 
ज्या लोकांना झोपेसंदर्भात समस्या असतात त्या याच दोन टप्प्यांशी निगडीत असतात.
 
ज्यांना एनआरईएमशी निगडीत समस्या असते ते सांगतात, मला कळलंच नाही झोप कशी लागली. चांगली झोप लागली. आरईएम समस्येने त्रस्त माणसं सांगतात की मी सकाळी लवकरच उठलो कारण रात्रभर झोपच लागली नाही.
 
झोपेशी निगडीत त्रास कधी आजार बनतात?
झोपेशी निगडीत विकार काय असतात? झोप न येणं, जास्त झोप, झोपेत घोरणं, झोपेत भीतीचा अटॅक. कोरोनातून बरं झालेल्यांना झोपेचे विकार त्रास देत आहेत मात्र यापैकी काहीही डिसऑर्डर नाही. काही लोक याला अपवाद असू शकतात.
 
डॉ. ओम प्रकाश यांच्या मते झोपेत अडथळे येणं आणि झोपेशी निगडीत व्याधी यामध्ये फरक आहे. जसं भूक लागण्यात अडथळे येऊ शकतात. मात्र त्यामुळे जे समोर ते खाणं हा आजार आहे.
 
सगळ्याच लोकांना महिन्यातून 3 ते 4वेळा झोप येत नाही अशी तक्रार असते. अशावेळी कोणाला असा त्रास झाला तर त्याला आजार म्हणता येणार नाही. कोरोनानंतर दहापैकी तीन लोकांना हा त्रास जाणवतो आहे. ही समस्या आहे पण आजार नाही.
 
नैराश्य, एंग्झायटी, फुप्फुसांशी निगडीत आजार असलेल्यांना हा त्रास अधिकच होतो आहे. याचे अनेक दुष्परिणाम आहेत. विस्मरण होणं, निर्णय घेण्याची क्षमता कमी होणं, वजन वाढणं या गोष्टी जाणवू लागतात. हे धोके सगळ्यांना ठाऊक असतात पण आपण दुर्लक्ष करतो.
 
झोपेच्या आजाराची सुरुवातीची लक्षणं

डॉ. ओमप्रकाश यांनी झोपेच्या आजाराची सुरुवातीची लक्षणं स्पष्ट केली.
 
पहिलं- झोपेचा वेळ कमी होणं

दुसरं- अखंड झोप न लागणं

तिसरं- झोपेच्या वेळेत विस्कळीतपणा

प्रत्येक व्यक्तीची झोपेची गरज वेगवेगळी असते हे समजून घेणं आवश्यक असतं.
 
काही लोकांना 5-6 तास झोपलं तरी पुरेसं होतं. अशा लोकांना शॉर्ट टर्म स्लीपर म्हटलं जातात. काही लोकांना 8-10 झोप लागते. त्यांना लाँग टर्म स्लीपर म्हटलं जातात.
 
पाच-सहा तास झोप आवश्यक असणाऱ्यांची झोप घटली आणि दोन तीन तासांवर आली तसंच आठदहा तास झोपणाऱ्यांचे तास पाच-सहावर आलं तर झोपेचे विकार जडल्याचं ते लक्षण आहे.
 
दोन ते तीन आठवडे ही लक्षणं कायम राहिली तर आजाराचा सुरुवातीचा टप्पा असू शकतो. यासाठी तुम्ही जनरल फिजिशियन म्हणजेच तुमच्या डॉक्टरांकडून सल्ला घेऊ शकतात. त्यांनी मानसोपचारतज्ज्ञांकडे जायचा सल्ला दिला तर तुम्ही त्यांची मदत घेऊ शकता.
 
कशा प्रकारची झोप लागते हे जाणून घेणंही आवश्यक आहे. एखादा माणूस 8-10 झोपत असेल, पण यादरम्यान त्याला 4-5 वेळा जाग येत असेल तर त्याला चांगली झोप म्हणता येणार नाही. याचा अर्थ अडचण पहिल्या टप्पात आहे.
 
तिसरं लक्षण म्हणजे झोपेच्या वेळेची असते. काही लोकांना बिछान्यात खूप तास पडून राहिल्यानंतर झोप येते. ते या कुशीवरून त्या कुशीवर करत राहतात. इनिशियल इनसोमिया म्हटलं जातं.
 
काही लोकांना चटकन झोप येते पण ते रात्री उठतात. याला 'मिडल इनसोम्निया' म्हटलं जातं. तिसरा प्रकार या लोकांचा असतो. ज्या लोकांची झोप सकाळ होण्याआधीच संपते त्यांना 'टर्मिनल इनसोम्निया'चा त्रास होतो.
 
या तीनपैकी कोणतीही लक्षणं प्रदीर्घ काळ जाणवत असतील तर डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.
 
झोपेशी निगडीत विकार समजून घेण्यासाठी एक सोपी पद्धत आहे. काही प्रश्नांची उत्तरं तुम्ही देऊ शकता. तुमची लक्षणं कोणत्या प्रकारची आहेत. आणि यावर काय इलाज आहे.
 
 
कोरोना नंतर झोपेची अडचण
चेन्नईस्थित इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थच्या संचालिका डॉ. पूर्णा चंद्रिका सांगतात, "कोरोना काळात लोकांचं राहणीमान पूर्णत: बदललं आहे. कोरोना झाल्यानंतर अनेकांना आयसोलेशनमध्ये राहावं लागलं आहे. काहींना रुग्णालयात दाखल करावं लागलं आहे. जे धडधाकट आहेत तरी त्यांच्या बाहेर जाण्यावर मर्यादा आहेत. लोकांशी भेटीगाठीं कमी झाल्या आहेत. शारीरिक श्रमाचं प्रमाण कमी झालं आहे. सोशल मीडियाचा वापर वाढला आहे".
 
असंख्य प्रकारच्या अनिश्चिततांमधून आपण जात आहोत. लोक दिवसदिवस घरीच असतात. त्यांचं दैनंदिन वेळापत्रक कोलमडलं आहे. या सगळ्याचा परिणाम लोकांच्या झोपेवर आणि स्लीप सायकल म्हणजेच झोपेच्या चक्रावर झाला आहे. म्हणूनच झोपेचे त्रास अनेकांना होऊ लागले आहेत.
 
झोप न येणं आजार असू शकतो किंवा दुसऱ्या कुठल्यातरी आजाराचं लक्षण असू शकतं.
 
2020 मध्ये लॅन्सेट या जगप्रसिद्ध आरोग्य मासिकात प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार, चीनमध्ये कोरोना काळात 35 आणि त्यापेक्षा अधिक वयाच्या 7236 लोकांच्या झोपेचा अभ्यास करण्यात आला. यामध्ये एक तृतीयांश लोक आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी होते.
 
यातून हे स्पष्ट झालं की 35 टक्के लोकांमध्ये अँग्झायटी तर 20 टक्के लोकांना नैराश्याचा तर 18 टक्के लोकांना झोपेसंदर्भात त्रास असल्याचं स्पष्ट झालं. याचं कारण लोक कोरोनाच्या भीतीने काळजीत होते.
 
यावर काय उपाय आहेत?
डॉ. पूर्णा आणि डॉ. ओमप्रकाश चांगली झोप लागावी यासाठी सल्ला देतात. स्लीप हायजिनचा अर्थ झोपण्याआधी करायच्या गोष्टी.
 
झोपायच्या आधी दोन तास चहा-कॉफीचं सेवन करू नका
 
खूप जेवू नका.
 
झोपण्याआधी ध्रूमपान करू नका.
 
झोपण्याआधी एखादी जागा पक्की करा. तिथे खाणंपिणं, अभ्यास करणे, खेळणे ही कामं करू नका.
 
दिवसा डुलकी काढायची असेल तर दिवाणावर-पलंगावर घेऊ नका.
 
झोपण्याआधी दोन तास कोणताही स्क्रीन म्हणजेच स्मार्टफोन, लॅपटॉप, डेस्कटॉप, टॅब, टीव्ही वापरू नका.
 
सतत लघवीला जावं लागत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या
 
तुम्हाला मधुमेह किंवा रक्तदाबाचा त्रास असेल तर वेळच्या वेळी औषधं घ्या
 
रोजच्या कामांचं एक वेळापत्रक निश्चित करा. ते पाळण्याचा प्रयत्न करा. झोपणं, उठणं, व्यायामाची वेळ पक्की करा.
 
या गोष्टींचं पालन केलं तर झोपेची समस्या बऱ्याच प्रमाणात दूर होऊ शकते.
 
मात्र हे केल्यानंतरही तुम्हाला चांगली झोप येत नसेल तर डॉक्टरांचा सल्ला नक्कीच घ्या. डॉ. पूर्णा यासाठी औषधंही सांगतात. दोन ते तीन आठवड्यांसाठी ही औषधं डॉक्टरांच्या सल्ल्याने घेता येऊ शकतात.
 
या झोपेच्या गोळ्या नसतात. त्यामुळे घाबरून जाऊ नका. या गोळ्यांची तुम्हाला सवय लागणार नाही. दोन तीन आठवड्यानंतर तुम्ही यातून पूर्णपणे बरे होऊ शकता.