जंक फूडमुळे वाढतोय नैराश्येचा धोका!
झपाट्याने बदलत चाललेल्या जीवनशैलीत आपल्या आहारामध्ये मोठा बदल झाला आहे. जगभरातील कोट्यवधी लोक जंक फूडद्वारे आपली भूक भागवत आहेत. पण जंक फूड आरोग्यासाठी चांगले नसल्याची बाब समोर आली आहे. पिझ्झा आणि बर्गरसारख्या जंक फूडमुळे नैराश्येचा धोका अधिक वाढतो, असा इशारा एका नवीन अभ्यासाद्वारे देण्यात आला आहे. जंक फूडपेक्षा पारंपरिक आहार कधीही चांगला. पारंपरिक आहारातील मासे, फळे आणि भाज्यामुंळे नैराश्याचा धोका कमी असतो. त्यामुळे हाच आहार शक्यतो लोकांनी घेतला पाहिजे, असे अभ्यासात नमूद करण्यात आले आहे. ब्रिटन, स्पेन आणि ऑस्ट्रेलियातील संशोधकांनी आहार आणि नैराश्याशी संबंधित यापूर्वीच्या 41 संशोधनांचे विश्लेषण आणि अभ्यास करून निष्कर्ष मांडले आहेत. जंक फूडमुळे शरीरात जळजळ होऊन त्याचा परिणाम थेट नैराश्यावर पडतो, असा इशारा अभ्यासाच्या प्रमुख डॉ. कॅमेली लेस्सेल यांनी दिला आहे. अधिक चरबीयुक्त आणि साखर असलेले पदार्थ खाल्ल्याने फक्त आतड्यांमध्ये नाही, तर शरीरामध्ये जळजळ होण्यास सुरुवात होते. इतकेच नाही तर तीव्र जळजळीमुळे मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होतो, असे संशोधकांनी म्हटले आहे.