गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: मंगळवार, 29 ऑगस्ट 2023 (08:56 IST)

युरिन टेस्टने गरोदरपणाचं निदान आधुनिक नाही, 4 हजार वर्षांपासून केली जाते ही चाचणी

pregnancy stress effects on baby
पृथ्वीवर मानवी जीवनाला सुरुवात झाली, तेव्हापासूनच गर्भधारणा हा प्रश्न आपल्या सर्वांच्या अस्तित्वाचा प्रश्न बनलेला आहे.आजकाल गर्भधारणा झाली किंवा नाही, याची चाचणी करणं खूप सोपं झालं आहे.
 
सध्या बाजारात अशा अनेक प्रेग्नन्सी किट मिळतात, ज्यांच्या मदतीने आपण गरोदर आहोत किंवा नाही हे महिलेला केवळ काही मिनिटांमध्ये कळू शकतं.
 
त्यासाठी संबंधित महिलेने प्रेग्नन्सी किटमधील पट्टीवर तिच्या लघवीचे दोन-चार थेंब सोडणं अपेक्षित असतं. या पट्टीवर दोन रेषा आढळून आल्यास महिला गरोदर आहे, असा निष्कर्ष काढला जातो.
 
अशा प्रकारे घरच्या घरी गर्भधारणा चाचणी करण्याची सुरुवात 1960 च्या दशकापासून झाली.
 
लघवीमध्ये ह्यूमन कोरियोनिक गोनॅडोट्रॉफिन (hCG) हार्मोनची उपस्थिती असल्यास महिला गरोदर आहे, असं मानलं जातं. हे संप्रेरक महिलेच्या गर्भाशयाच्या पेशींमार्फत प्रामुख्याने तयार होतं.
 
लघवीप्रमाणेच रक्त तपासणी करूनही महिलेच्या गरोदरपणाबाबतची चाचणी करता येऊ शकते. अर्थात, गरोदर चाचणी ही पॉझिटिव्ह आली, याचा अर्थ प्रत्येक वेळी हा प्रवास बाळाच्या जन्मापर्यंतच जातो असं नाही.
 
कारण, जगात पाचपैकी एका गरोदर महिलेला गर्भपाताला सामोरं जावं लागतं, असं आढळून आलं आहे.
 
पण, तरीही गरोदरपणाची चाचणी ही महत्त्वाची मानली जाते. खरं तर हाच गर्भधारणा, पालकत्व यांच्या दिशेने सुरू झालेला प्रवास असल्याने याबाबत प्रत्येक जण उत्सुक असतो.
 
सध्या गरोदरपणाची चाचणी करणं सोपं असलं तरी हे शक्य होण्यासाठी बराच काळ जावा लागला आहे. पूर्वीच्या काळी तर स्थिती अत्यंत बिकट होती. पूर्वी केवळ मासिक पाळी चुकणे, किंवा विशिष्ट आहार खावासा वाटणे अशा गरोदरपणाच्या सुरुवातीच्या लक्षणांची नोंद घेतली जात असे.
 
पण, अशी स्थिती एखाद्या आजारपणात अथवा रजोनिवृत्तीच्या काळातही दिसून येत असल्याने याबाबत ठामपणे माहिती मिळवणं पूर्वी खूप अवघड होतं.
 
गर्भधारणा चाचणीचा शोध
प्राचीन ग्रीसमध्ये असं मानलं जायचं की, महिला गरोदर असल्यास तिला स्वतःला त्याची जाणीव होते. लैंगिक संबंध ठेवल्यानंतरच्या काही दिवसांत महिलेला तिच्या गर्भाशयात त्याची अनुभूति होते, असंही त्यावेळी म्हटलं जायचं. पण हे अचूकपणे सांगणं त्यावेळी खुद्द महिलेलाही शक्य नसे.
 
विशेषतः सुरुवातीच्या टप्प्यात शरीराच्या आत सूक्ष्मपणे सुरू असलेल्या या हालचाली ओळखणं हे शक्य नसल्याने याबाबतचे अंदाज अनेकदा चुकत.
 
पण, असं असलं तरी महिला गरोदर आहे किंवा नाही, हे जाणून घेण्याच्या उत्सुकतेने अनेक प्रयोगांना जन्म दिल्याचं दिसून येतं. अगदी ख्रिस्तपूर्व काळापासून गरोदरपणाबाबत माहिती घेण्यासाठी मानवाचे प्रयत्न दिसून येतात.
 
ख्रिस्तपूर्व चौथ्या शतकात लिहिलेल्या एका हिप्पोक्रेटिक मेडिकल टेक्स्ट या लिखाणात एका प्रयोगाचा उल्लेख आढळून येतो.
 
यानुसार, महिलेने रात्री झोपण्यापूर्वी ‘मिड’ नामक वाईन, मध आणि पाणीमिश्रित पेयाचं सेवन करावं. महिला गरोदर असल्यास तिला सकाळी पोटात दुखेल, असं यामध्ये सांगण्यात आलं आहे.
 
युनिव्हर्सिटी ऑफ ऑकलँड येथे इतिहासाचे प्राध्यापक असलेले किम फिलिप्स यांनी 13व्या शतकातील एका वैद्यकीय लिखाणाचा अभ्यास केला. या ग्रंथाचं नाव सिक्रेट्स ऑफ वूमन असं आहे.
 
त्यामधील माहितीनुसार, महिलेची स्तनाग्रे ही खालच्या दिशेने झुकलेली असल्यास ती महिला गरोदर आहे, हे मानावं, असं सांगण्यात आलेलं आहे.
 
याचं कारण म्हणजे महिला गरोदर असताना तिच्या स्तनांकडे असलेला रक्तपुरवठा हा पूर्वीच्या तुलनेत वाढलेला असतो, असा तर्क त्यामध्ये देण्यात आला होता.
 
लघवीची भूमिका
 
सध्या महिलेची लघवी हीच तिचा गरोदरपणा ठामपणे ओळखण्यासाठी आवश्यक असते.
 
लघवीच्या माध्यमातून गर्भधारणेचा अंदाज लावण्याची ही पद्धत आधुनिक आहे, असं अनेकांना वाटू शकतं. पण तसं नाही.
 
कारण, इजिप्तमधील हस्तलिखितांमधील मजकूर पाहिल्यास 4 हजार वर्षांपासून गरोदरपणाच्या चाचणीसाठी लघवीचा वापर करण्यात येत असल्याचं आढळून येतं. इतकंच नव्हे तर ते यामध्ये जन्मणारं बाळ हे मुलगा असेल की मुलगी असेल याचा दावाही करायचे.
 
हस्तलिखितातील माहितीनुसार, एखाद्या महिलेस ती गरोदर आहे किंवा नाही, हे जाणून घेण्याची इच्छा असल्यास तिने काही दिवस गहू आणि बार्ली या दोहोंवर न चुकता मूत्रविसर्जन करावं.
 
अनेक दिवस मूत्रविसर्जनानंतरही गहू अथवा बार्लीला मोड न आल्यास संबंधित महिला गरोदर नाही, असा त्याचा निष्कर्ष काढला जात असे.
 
तर, गहू आणि बार्ली यांच्यापैकी सर्वप्रथम बार्लीला मोड आल्यास महिलेला मुलगा होणार आहे, असा अंदाज लावला जायचा, तर गव्हाला आधी मोड आल्यास तिला होणारं अपत्य हे मुलगी असेल, असं भाकित केलं जायचं.
 
अशा प्रकारे, इतिहासात अनेक गरोदरपणाचा अंदाज लावण्यासाठी लघवीवरचे विविध प्रयोग सांगण्यात आले आहेत.
मध्ययुगीन काळातील एका प्रयोगात महिलेच्या लघवीमध्ये सुई (needle) बुडवून ठेवण्यात येई. सुईचा रंग बदलल्यास ती गरोदर आहे, असा अंदाज लावला जायचा.
 
हे सगळे प्रयोग कधी वैद्यांच्या उपस्थित तर कधी घरगुती स्वरुपातही केले जात असत.
 
1518 साली तर लंडनच्या रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन्सने महिला वैद्यांवर तसंच महिलांनी अशा प्रकारचे वैद्यकीय प्रयोग करण्यावर बंदी घातली होती.
 
त्यामध्ये युरोस्कोपी (लघवी तपासणी) याचाही समावेश होता. पण काही महिलांनी ते गुप्तपणे करणं सुरूच ठेवलं.
 
17व्या शतकात मिसेस फिलिप्स नामक एका आयावर युरोस्कोपी करून गरोदरपणाची चाचणी केल्याचा आरोपाखाली खटला भरण्यात आला होता.
 
1590 च्या काळात कॅथरिन चेअर नामक एक महिला बेकायदेशीररित्या वैद्यकीय उपचार करायची. आपण साबण आणि गुलाबपाण्याने कपडे धुवून गरोदरपणाचं निदान करू शकतो, असा दावा ही महिला करायची.
 
आधुनिक पद्धती
सध्या आरोग्याविषयी माहिती घेण्यासाठी लघवीची चाचणी करणं ही सर्वसाधारण बाब आहे. साधारणपणे 17 व्या शतकापासून असा वापर केला जात असेल, असं तेव्हाच्या काही पुस्तकांमधील उल्लेखामध्ये आढळून येतं.
 
1656 सालच्या ‘कंप्लिट प्रॅक्टिस फॉर मिडवाईव्ह्ज’ नामक एका पुस्तकात लिहिलं आहे, “महिलेची लघवी एखाद्या हवाबंद डबीत काही दिवसांसाठी ठेवल्यास तिच्या गरोदरपणाविषयी समजू शकतं.”
 
दुसरा एक पर्याय असा होता की ‘महिलेची लघवी उकळावी, जर पांढरी रेष आल्यास ती गरोदर आहे.’
 
1930 साली पहिल्यांदा प्राचीन इजिप्शियन पद्धत (गहू/बार्ली संदर्भात) उपयुक्त असल्याबाबत चर्चा सुरू झाली. यानुसार, होणाऱ्या अपत्याचं लिंग कोणतंही असो, पण महिला गरोदर आहे, हे या माध्यमातून समजू शकतं, असं 70 टक्के चाचण्यांमध्ये दिसून आलं.
 
त्यावेळी, गरोदर नसलेल्या महिलांशिवाय पुरुषांच्या लघवीचाही प्रयोगात वापर करण्यात आला. त्यावेळी गहू आणि बार्लीवर त्याचा कोणताच परिणाम दिसून आला नाही.
 
म्हणजेच, गरोदर असलेल्या महिलांच्या लघवीमध्ये काही विशिष्ट घटक असतात, असा निष्कर्ष काढता येऊ शकेल.
 
20 व्या शतकात सुरू झालेल्या गरोदरपणाच्या चाचण्या पाहता कपडे धुणे, स्तनांची तपासणी यांसारख्या इतर कोणत्याही चाचण्यांपेक्षा गहू/बार्ली किंवा सुई बुडवणे यांसारख्या चाचण्या जास्त विश्वासार्ह असू शकतात, याचा अंदाज वर्तवला जाऊ शकतो.
 
उंदीर, ससे आणि बेडूक
वरील सर्व प्रयोगांव्यतिरिक्त 1920 च्या दशकात आणखी एक प्रयोग गरोदरपणाच्या चाचणीसाठी केला जायचा. यामध्ये उंदीर, ससे आणि बेडूक या प्राण्यांचा वापर करण्यात येत असे.
 
एका प्रयोगात, महिलेची लघवी ही इंजेक्शनच्या माध्यमातून उंदीर किंवा सशाच्या शरीरात टोचली जायची. यानंतर त्यांना मारून सदर लघवीचा त्यांच्या अंडाशयावर काय परिणाम झाला, हे पाहिलं जात असे.
 
याशिवाय, टोड या आफ्रिकेतील बेडकाचाही चाचणीसाठी वापर केला जायचा. या बेडकाच्या शरीरात महिलेची लघवी टोचली जायची. महिला गरोदर असल्यास तो बेडून अंडी सोडतो, असं मानलं जायचं.
 
गरोदरपणाची चाचणी करण्यासाठी अनेक प्रयोग 1950 पर्यंत सुरू होते. पण त्यावेळी करण्यात येत असलेल्या चाचण्या या खूपच महागड्या होत्या. तसंच त्यांची विश्वासार्हताही तितकी नसायची.
 
शिवाय, यांसारख्या प्रयोगांमधून उंदीर, ससे आणि बेडकांच्या बाबतीत क्रूरता होत असल्याचाही एक मुद्दा होताच.
 
पुढे, 1960 च्या दशकात अँटीबॉडीज संदर्भात एक चाचणी यशस्वी झाली. सध्या आपणही त्याच चाचणीचा वापर करून गरोदर असल्याचे अंदाज घेतो.
 
महिलांच्या आजवरच्या वाटचालीत गरोदरपणाने खूपच मोठी भूमिका वठवलेली आहे. इतिहासात वारसा आणि उत्तराधिकार यांच्या दृष्टिकोनातून गरोदर राहण्याला खूप मोठं महत्त्व देण्यात आलेलं आहे.
 
गर्भधारणेच्या चाचणीचा इतिहास पाहिला तर मानव पूर्वीपासूनच याबाबत उत्सुक होता. पुरेशी संसाधने आणि तंत्रज्ञान उपलब्ध नसतानाही गर्भधारणेचा अंदाज लावण्यासंदर्भात तो करत असलेले प्रयोग पाहिले तर त्याने त्या दिशेने योग्यरित्या प्रवास पूर्ण केला आहे.
 












Published By- Priya Dixit