सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By

गर्भावस्थेतील व्यायाम प्रसूतीच्या वेदनेस हितकारक

नियमित व्यायाम करणारे लोक फक्त निरोगी व ताजेतवानेच राहत नाहीत, तर आजारही त्यांच्यापासून कोसो दूर राहतात. सामान्य लोकांप्रमाणेच गर्भवती महिलांनाही व्यायाम केल्याने चांगला लाभ मिळतो. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार नियमितपणे व्यायाम करणार्‍या महिलांना प्रसववेदनांचा वेळ 50 मिनिटांनी कमी होतो. स्पेनमधील टेक्निकल युनिव्हर्सिटी ऑफ माद्रिदच्या शास्त्रज्ञांनी हे अध्ययन केले असून त्यांनी असे सांगितले की, गर्भावस्थेदरम्यान नियमितपणे व्यायाम करणार्‍या महिलांना जास्तवेळ प्रसववेदना सहन कराव्या लागत नाहीत. या अध्ययनासाठी शास्त्रज्ञांनी 508 महिलांच्या माहितीचे पहिल्या तिमाहीपासूनच अध्ययन करण्यास सुरुवात केली. त्यात निम्म्या महिलांना दर आठवड्याला तीन तास व्यायाम करण्याचा सल्ला दिला. उरलेल्या अर्ध्या महिलांना आरामाचा सल्ला देण्यात आला. त्यानंतर शास्त्रज्ञांना मुलाच्या जन्मवेळच्या प्रसववेदनेचा कालावधी व नियमित व्यायाम यांच्यात संबंध दिसून आला. त्यांनी सांगितले की, नियमित व्यायाम करणार्‍या महिलांचे स्नायू प्रसूतीच्या प्रक्रियेत पूर्ण योगदान देण्यास सक्षम होते. या अध्ययनाच्या निष्कर्षामुळे गर्भवती महिलांना नियतिम व्यायामासाठी प्रेरित केले जाऊ शकते. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार गर्भावस्थेदरम्यान तंदुरुस्तीवर लक्ष देणे धोकादायक ठरते, हा विचार आता जुनाट झाला. उलट प्रसववेदनांदरम्यान जिवासमोरचे संकट दूर करण्यासाठी व्यायाम चांगला उपाय असल्याचे या अध्ययनातून स्पष्ट झाले आहे.