सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: शनिवार, 19 फेब्रुवारी 2022 (14:16 IST)

ताप : लास्सा ताप काय आहे? तो कसा पसरतो?

गेल्या आठवड्यात युकेमध्ये एका तान्ह्या बाळाचा लास्सा तापाने मृत्यू झाला.या बाळासोबतच त्याच्या घरातल्या इतर 2 जणांनाही या Lassa Fever ची लागण झाल्याचं लक्षात आलं आणि त्यानंतर केंब्रिजमधल्या हॉस्पिटलच्या शेकडो कर्मचाऱ्यांचीही या तापासाठीची चाचणी करण्यात आली. काय आहे हा लास्सा ताप किंवा Lassa Fever?
 
लास्सा ताप (Lassa Fever) काय आहे?
हा ताप Multimammate Rodent या एका विशिष्ट प्रकारच्या उंदराच्या मूत्र आणि विष्ठेद्वारे पसरतो.
 
1969 मध्ये नायजेरिया देशातल्या लास्सा (Lassa) शहरात या तापाचा सर्वप्रथम उद्रेक झाला आणि त्यावरूनच याला हे नाव मिळालं.
तेव्हापासून पश्चिम आफ्रिकेतल्या नायजेरियासोबतच घाना, माली आणि सिएरा लिओनमध्ये हा ताप आढळतोय.
 
बदलत्या तापामानाचा Multimammate Rodent या उंदरांवर परिणाम होऊन या तापाचे विषाणू तयार होतात.
 
पश्चिम आफ्रिकेतल्या देशांमध्ये या प्रकारचे उंदीर सर्रास आढळतात आणि घरांतही ते शिरतात.
 
या उंदरांची सू, विष्ठा, रक्त किंवा थुंकी ही अन्न वा पेयांतून पोटात गेल्यास वा या उंदराचा स्पर्श झालेली वस्तू हाताळल्याने या विषाणूचा संसर्ग माणसांत येतो.
 
हा विषाणू एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे घाम, लाळ, थुंकी, मूत्रं वा वीर्य याद्वारे पसरत असल्याने लास्साच्या रुग्णांची काळजी घेणाऱ्या व्यक्ती वा आरोग्यसेवकांना संसर्गाचा धोका असतो.
हा विषाणू शरीरात शिरल्यापासून 3 आठवडे संसर्गक्षम असतो.
 
लास्सा हा एक 'viral haemorrhagic fever' आहे. या तापाचा शरीरातल्या अनेक अवयवांवर परिणाम होऊ शकतो आणि हा व्हायरस मानवी शरीरातल्या रक्तपेशींचं नुकसान करू शकतो.
 
इबोलाप्रमाणेच हा लास्सा ताप रुग्णाच्या म्हणजेच या विषाणूचा संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या रक्त, थुंकी, मूत्र किंवा वीर्याद्वारे पसरू शकतो.
 
या Lassa विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर ताप येतो आणि इतर लक्षणं ही फ्लू सारखीच असतात. पण या संसर्गामुळे नाक, तोंड किंवा शरीराच्या इतर भागांमधून रक्तस्राव होण्याची शक्यता असते.
 
या विषाणूचा संसर्ग झालेले बहुतांश जण यातून पूर्ण बरे होत असले तरी हा आजार गंभीर आणि जीवघेणाही ठरू शकतो.
 
पश्चिम आफ्रिकेतल्या अनेक देशांमध्ये हा आजार आढळतो. प्राण्यांद्वारे पसरणारा हा आजार तिथे Endemic म्हणजे साथीच्या रोगांमधला एक समजला जातो.
 
युकेमध्ये गेल्या काही दिवसांत या आजाराचे जे रुग्ण आढळले त्यांनी नुकताच पश्चिम आफ्रिकेतल्या देशांमध्ये प्रवास केल्याचं आढळल्याचं युकेतल्या डॉक्टर्सनी म्हटलंय.
 
1980 पासून जानेवारी 2022पर्यंत युकेमध्ये या तापाच्या फक्त 8 केसेस आढळल्या होत्या.
 
लास्सा ताप हा अनेक अवयवांवर आणि शरीरातल्या रक्तपेशींवर परिणाम करत असला तरी त्यावर उपचार करणं अवघड आहे.
 
या तापाचा संसर्ग होणाऱ्यांपैकी बहुतेकांना फक्त ताप, डोकेदुखी आणि साधारण थकव्यासारखी सौम्य लक्षणं आढळतात. अनेकांमध्ये तर ही लक्षणं आढळतही नाहीत. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये डेंग्यू आणि मलेरियापेक्षा हा ताप वेगळा आहे, हे ओळखणंही कठीण जातं.
 
पण काही रुग्णांमध्ये हा ताप इबोलाप्रमाणाचे गंभीर स्वरूप धारण करतो. हेमोरेजिक फिव्हर (रक्तस्राव होणारा ताप)मध्ये त्या रुग्णाच्या नाक, तोंड वा शरीराच्या इतर अवयवांतून रक्तस्राव होतो.
 
लास्सा तापाचा संसर्ग झालेल्यांपैकी मृत्यूचं प्रमाण सुमारे 1 टक्का आहे. पण नायजेरियामध्ये या तापाच्या संसर्गाचं आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण मोठं आहे.
 
प्रेग्नंसीच्या प्रगत टप्प्यात महिलेला या तापाचा संसर्ग झाल्यास पोटातल्या बाळाचा मृत्यू होण्याची किंवा या मातेचा मृत्यू होण्याची शक्यता जवळपास 80% आहे.
 
रुग्णाच्या रक्त किंवा टिश्यूच्या नमुन्याची प्रयोगशाळेत चाचणी केल्यानंतरच या तापाचं निदान होऊ शकतं.