रविवार, 25 फेब्रुवारी 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: शुक्रवार, 17 जून 2022 (20:58 IST)

लैंगिक संबंध ठेवल्यानंतर 'त्याने' गमावली स्मरणशक्ती, काय होतं कारण?

love life
आयर्लंड एक लैंगिक संबंध ठेवल्यानंतर एका व्यक्तीने स्मरणशक्ती गमावल्याची एक विचित्र घटना समोर आली आहे.
 
या व्यक्तीचं वय 66 असून तो त्याच्या पत्नीसोबत लैंगिक संबंध ठेवत होता. पण संभोगानंतर काही वेळातच त्याने स्मरणशक्ती गमावली.
 
शॉर्ट टर्म अम्नेशियाचं निदान झाल्याने संबंधित व्यक्तीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
 
ANI वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार, आयर्लँडच्या एका आरोग्य मासिकात या प्रकरणाविषयी माहिती देण्यात आली. मासिकाच्या मे महिन्याची आवृत्ती बुधवारी प्रकाशित करण्यात आली. यामधील ही घटना वाचून त्यावर चर्चा सुरू झाली आहे.
 
ही घटना म्हणजे ट्रान्सेंट ग्लोबल अम्नेशियाचा (TGA) प्रकार असल्याचं डॉक्टरांनी मासिकात म्हटलं आहे.
 
मासिकातील माहितीनुसार, "या प्रकरणातील पीडित व्यक्तीला लैंगिक संबंध ठेवल्याच्या 10 मिनिटांनंतर शॉर्ट-टर्म मेमरी लॉसची समस्या उद्भवली.
 
झालं असं की लैंगिक संबंध ठेवल्यानंतर काही वेळाने या व्यक्तीने मोबाईलवर तारीख तपासली. पण तारीख पाहून तो प्रचंड अस्वस्थ झाला. आपण आपल्या लग्नाचा वाढदिवस सेलिब्रेट केला नाही. हा दिवस आपण कसा विसरू शकतो, याने तो चिंतातूर झाला.
 
पण, वास्तविक पाहता त्या दिवशी या व्यक्तीने आपला हा खास क्षण पत्नीसोबत थाटामाटात साजरा केला होता. पण त्याच्या काही वेळानंतरच त्याला या सेलिब्रेशनचं विस्मरण झालं.
 
यानंतर संबंधित व्यक्तीने या संदर्भात आपली पत्नी आणि मुलगी यांना सातत्याने वेगवेगळे प्रश्न विचारून भंडावून सोडले. संध्याकाळी नेमकं काय काय घडलं याची चौकशी तो करत होता.
 
तज्ज्ञांच्या मते, "50 ते 70 वयादरम्यान अशी समस्या लोकांना येऊ शकते. TGA मध्ये नुकत्याच घडलेल्या काही गोष्टींबाबत विस्मरण होतं. काही प्रकरणांमध्ये एका वर्षात घडलेल्या घटनांचंही विस्मरण पीडित व्यक्तीला होऊ शकतं. पण या सर्व आठवणी काही तासांनी पुन्हा पूर्ववत लक्षात येतात."
 
अशा प्रकरणांमध्ये रुग्णाच्या लाँग टर्म मेमरीवर काहीच परिणाम होत नाही. अशा रुग्णांना त्यांचं नाव, वय आणि इतर प्राथमिक माहिती योग्यरित्या लक्षात असते.
 
संबंधित पीडित व्यक्तीला यापूर्वीही एकदा शॉर्ट टर्म मेमरी लॉसचा त्रास अनुभवायला मिळाला होता. 2015 मध्येही लैंगिक संबंध ठेवल्यानंतरच त्याने स्मरणशक्ती गमावली होती. पण काही वेळानंतर त्याची स्मरणशक्ती पूर्ववत झाली.
 
यामुळे आपण TGA ने पीडित असल्याचा संशय संबंधित व्यक्तीला आला. त्यामुळे सदर व्यक्ती तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल झाला. येथे त्याच्या मेंदूशी संबंधित काही चाचण्या करण्यात आल्या. पण तो व्यक्ती पूर्णपणे सुदृढ असल्याचं तपासात समोर आलं. दरम्यान, त्या व्यक्तीची स्मरणशक्तीही पूर्ववत झाल्याचं त्याच्या निदर्शनास आलं.
 
या घटनेसंदर्भातील लेख युनिव्हर्सिटी हॉस्पिटल लिमेरिक येथील डिपार्टमेंट ऑफ न्यूरोलॉजीच्या डॉक्टरांनी लिहिला आहे. ते सांगतात, 10 टक्के रुग्णांना TGA ची समस्या एकापेक्षा जास्त वेळा येऊ शकते. TGA म्हणजेच शॉर्ट टर्म मेमरी लॉसच्या समस्येचा थेट संबंध शारिरीक मेहनतीशी संबंधित गोष्टी, अति गरम किंवा अतिथंड पाण्याशी संपर्क, मानसिक ताणतणाव, वेदना किंवा लैंगिक संबंध यांच्याशी जोडलेला आहे."
 
2009 मध्ये एका तज्ज्ञांनी TGA बाबत बोलताना म्हटलं होतं, "या आरोग्य समस्येमुळे मेंदूला कायमस्वरुपी इजा किंवा हानी होत नाही. मेंदू काही वेळात पूर्वस्थितीत येतो. केवळ काही वेळेपुरतं विस्मरण इतकंच या समस्येचं लक्षण आहे."
 
या घटनेबाबत छापून आल्यानंतर याविषयी चर्चा होत आहे, पण TGA गंभीर नसून यामुळे घाबरून जाण्याचं कारण नसल्याचंही तज्ज्ञ डॉक्टरांनी म्हटलं आहे.