मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By वेबदुनिया|

चेहरा सुजल्यासारखा वाटतोय..? हे उपाय करून पाहा

चेहरा जास्त सुजल्यासारखा वाटतोय? डोळे बारीक दिसू लागले आहेत? उत्तर होय असेल, तर वेळीच सावध व्हा. ही चेहर्‍यावर सूज येण्याची लक्षणे असू शकतात. तज्ज्ञांच्या मते, असे अँलर्जीमुळेही होऊ शकते आणि खाण्यापिण्यातील निष्काळजीपणामुळेही. 
ही कारणे असू शकता
तज्ज्ञांच्या मते, शरीरात होणारे अंतर्गत बदल आणि बाह्य कारणांमुळे चेहर्‍यावर सूज येऊ शकते. अनेक वेळा चुकीच्या कॉस्मेटिक्सचा वापर, एखाद्या खाद्यपदार्थाचे वा औषधींचे सेवन केल्यानंतर आणि कधी अँलर्जी निर्माण करणारे घटक श्वासाद्वारे शरीरात गेल्यास असे होऊ शकते, तर अनेकवेळा ओरल कॅव्हिटी वा दातांशी निगडित समस्यांमुळेही चेहर्‍यावर सूज येऊ शकते. चेहर्‍याच्या उतीत फ्लुइड म्हणजेच पाणी गोळा झाल्यामुळेच चेहरा पफी अर्थात सुजल्यासारखा दिसतो. त्यास शास्त्रीय भाषेत ‘फेशियल एडेमा’ म्हणतात. हा एखाद्या आरोग्य समस्येचा संकेत असू शकतो.

हे उपाय असतात
तज्ज्ञांच्या मते, चेहर्‍यावर सूज येण्याची ठोस कारणे जाणून घेण्यासाठी पीडिताने त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधायला हवा. डॉक्टरच तपासणी करून योग्य ते उपचार करू शकतात. जर एखाद्या औषधाच्या सेवनाने असे झाले असेल तर त्याचे सेवन लगेच बंद करण्याचा आणि अँलर्जी रिअँक्शन असेल तर अँटिबायोटिक घेण्याचा सल्ला दिला जाऊ शकतो. जर सूज येण्याबरोबरच थोड्याशा वेदनाही असतील तर अशावेळी इम्फ्लेमेंटरी औषध प्रिस्क्राइब केले जाते. याउलट दातांना असा संसर्ग झाला तर तेव्हाही अँटिबायोटिक वा जास्त त्रास झाल्यास दात काढण्याची वा योग्य उपचार घेण्याचा सल्ला दिला जातो.

हेही अजमावून पाह
चेहर्‍यावर सूज येण्याची कारणे भले कोणतीही असोत, मात्र ती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करता येऊ शकतात. जाणून घेऊया याबाबत..

बर्फ लावा बर्फाचा छोटासा तुकडा चेहर्‍यावर लावल्याने चेहर्‍यावरील सूज कमी होऊ शकते. मुलायम टॉवेल वा एखाद्या कपड्यात बर्फाचा तुकडा ठेवून सूजलेल्या जागी हळूहळू लावा. असे दिवसातून चार ते पाच वेळा करा.

हळद व चंदन चेहर्‍यावरील सूज वा वेदना दूर करण्यात रक्तचंदन वा हळदीच्या पुडीपासून तयार केलेला लेप बराच परिणामकारक ठरू शकतो. वाळल्यानंतर तो कोमट पाण्याने धुऊन टाका.

कमी मीठ अधिक सोडियम म्हणजेच जास्त मीठ असलेला आहार घेतल्यानेही चेहर्‍यावर सूज येते. मिठाच्या जास्त प्रमाणामुळे त्वचेचा आतला थर पाणी रोखू लागतो आणि चेहरा सूजल्यासारखा दिसतो. त्यासाठी जास्त मीठ असलेले भोजन टाळा.

उंच उशी झोपताना वापरल्या जाणारी उशी वा तक्क्या थोडा उंच असायला हवा. तज्ज्ञांच्या मते, जर डोके थोडे उंचवट्यावर असल्यास त्वचेमध्ये पाणी गोळा होणार नाही.