1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: मंगळवार, 28 ऑगस्ट 2018 (14:49 IST)

आरोग्यदायी बहुगुणी ‘तांबे’

Healthy Multicolor Copper
काही वर्षांपूर्वी आपण सगळेच पाणी पिण्यासाठी काचेची, स्टीलची किंवा तांब्याची भांडी वापरात होतो. काळाच्या ओघात अचानक प्लास्टिकचा प्रभाव वाढला. प्लास्टिक हे वापरण्यास सोपे आणि ते सहज तूटत ही नाही, प्लास्टिकच्या वस्तूंना खूप सांभाळावे लागत नाही. सहज हाताळता येणारे आहेत. परंतु या प्लास्टिकचे अनेक दुष्परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतात. दैनंदिनी जीवनामध्ये प्लास्टीकचा वापर जास्त प्रमाणात केल्यामुळे त्या मधील हानिकारक रसायने पाण्यामार्फत शरीरात जातात आणि आपल्या शरीरास घातक ठरतात. प्लास्टिकमुळे पाण्यावाटे आपल्या शरीरात फ्लोरॉईड, डायॉक्झिन आणि बीपीए सारखी विषारी रसायने पोहोचतात.
 
प्लास्टिकमुळे आरोग्यावर अनेक घातक परिणाम होतात हे संशोधनातून आढळले आहे. संशोधनाप्रमाणे डायॉक्झिन मुळे कॅन्सर होण्याची शक्यता असते. तर बीपीए हे इस्ट्रोजेन सदृश रसायन असल्यामुळे शरीरावर वाईट परिणाम होतात. यामुळे मधुमेय लठ्ठपणा, लवकर वयात येणं, रोग प्रतिकारक शक्ती कमी होणे, वंध्यत्व असे आरोग्यावर विविध दुष्परिणाम होतात.
 
प्लास्टिकमुळे आपल्याला अनेक दुष्परिणाम होतात हे आपल्याला माहित असेल तरी प्लास्टिक ने आणलेला सोयीस्करपणा आपल्याला भुरळ घालत होता. पण आता पर्यावरणाच्या मुदद्यामुळे कायद्यानेच प्लास्टिकवर बंदी आली आहे. त्यामुळे आपण आपोआपच जुन्या पद्धतीकडे वळू लागलो आहोत.
 
कोणत्या भाड्यातून पाणी पिणे आरोग्यास हितकारक ?
 
१.  काचेच्या भांड्यातून पाणी पिणे उत्तम कारण काचेमुळे पाण्यामध्ये काहीच बदल होत नाहीत.
२. तांब्याच्या भांड्यातून पाणी पिणे केव्हाही चांगले कारण आरोग्याला उपयुक्त तांब्याचा अंश शरीरात जातो.  
 
तांब्याच्या भांड्यातून पाणी का प्यावे?
 
१. तांब्याच्या भांड्यातील पाणी जास्त आरोग्यदायी असते कारण तांब्याचा अंश भांड्यातील पाण्यामध्ये उतरतो. त्यामुळे पाण्यातील रोगजंतू मरून जातात.
२. तांब्यामुळे यकृत आणि मूत्राशय असे महत्वाचे अवयव सशक्त होतात.
३. आपल्या मेंदू आणि मज्जासंस्थेला मदत होते.
४. मज्जातंतूवरील प्रवाहकीय आवरणाच्या डागडुजीसाठी आणि ह्या आवरणाला सशक्त करण्यासाठी तांबे मदत करते.
५. तांब्यामध्ये ऍन्टिऑक्सिडेंट तत्व असल्यामुळे तांबे हे उत्तम ऍन्टिएजिंग आहे.
६. या तत्वामुळे तांबे कॅन्सर विरुद्धच्या लढाई मध्ये शरीराला मदत करते.
७. तांब्यामुळे हाडे व स्नायू मजबूत होतात.
८. रक्तदाब समप्रमाणात होण्यास मदत होते,
९. ऍन्टिइनप्लमेट्री असल्यामुळे संधीवातासारखे आजार बरे होण्यास मदत होते.
 
अशा प्रकारे तांब्याचा वापर करून आपण आपले आयुष्य सुकर करू शकतो. तसं पाहिलं तर सोने, चांदी नंतर तांबे या धातूचा तिसरा क्रमांक लागतो. काही वर्षांपूर्वी लग्नात तांब्यांच्या भांड्यांचा आहेर देणे हे प्रतिष्ठेचे मानले जाई. काही घरांत तर आज सुद्धा तांब्यांची भांडी शो-केस मध्ये दिमाखाने दिसतात. या तांब्यांच्या भांड्यांची अनेक वैशिष्ट्ये आहेत. जी शरीरास उपकारक आहेत. म्हणूनच जुनं ते सोनं असं का म्हणतात ते तांबे या धातूला पाहून उमजतं. तेव्हा तांब्यांच्या भांड्यातून पाणी प्यायला सुरुवात करुया. सुदृढ होऊया.

-  डॉ. अस्मिता सावे. रिजॉंइस वेलनेस’