बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: शुक्रवार, 28 जून 2024 (18:02 IST)

ब्रेस्ट कॅन्सर झाल्याची हिना खानची सोशल मीडियावर पोस्ट, 'या' रोगाची लक्षणं कशी ओळखायची जाणून घ्या

breast cancer
अभिनेत्री हिना खान हिला स्तनांच्या कर्करोगाचं (Breast Cancer) निदान झालं आहे. हिना खानने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम आणि फेसबुक अकाऊंटवरून याबाबत माहिती दिली.हिना खानने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत म्हटलंय की, "गेल्या काही दिवसांपासून अफवा उठतायेत, त्यामुळे 'हिनाहोलिक्स' आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्या, माझी काळजी करणाऱ्यांसोबत एक महत्त्वाची बातमी शेअर करायची आहे. मला तिसऱ्या स्तराचा स्तनाचा कार्गरोग झालाय."
 
हिनाने पुढे लिहिलंय की, "स्तनाच्या कर्करोगाचं निदान झालं असतानाही, मी उत्तम आहे. मी कणखर आहे आणि यातून बाहेर पडेन, याचा विश्वासही आहे. माझ्यावरील उपचार सुरू झाले आहेत. यातून बाहेर पडण्यासाठी जे काही आवश्यक आहे, ते सर्व मी करेन."
या पोस्टवर हिनाचे चाहते आणि इतर अनेकांनी तिच्या आरोग्यासाठी प्रार्थना केल्या आहेत.
 
आपण या बातमीतून स्तनांच्या कर्करोगाबाबत (ब्रेस्ट कॅन्सर) अधिक माहिती घेऊ. यासाठी बीबीसी मराठीवरील यापूर्वीच्या बातम्यांचा आधार घेण्यात आला आहे.
 
ब्रेस्ट कॅन्सरची लक्षणे कशी ओळखावी?
स्तनामध्ये गाठ किंवा लंप असणं हे ब्रेस्ट कॅन्सरच्या सामान्य लक्षणांपैकी एक आहे. जर ब्रेस्टमध्ये अशाप्रकारची गाठ जाणवली तर लगेचच मेडिकल तपासणी करण्याचा सल्ला डॉक्टर देतात.
 
स्तनामध्ये कोणत्याही प्रकारची सूज आढळून आली तर, त्याबाबत बेजबाबदारपणा बाळगता कामा नये. ही सूज स्तनाच्या एका बाजूला किंवा पूर्ण स्तनाला असेल तर वेळीच काळजी घ्यावी.
 
स्तनाच्या त्वचेमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल जाणवला, म्हणजे त्याठिकाणी जळजळ होणं, लाल होणं किंवा त्वचा कडक होणं, त्वचेत बदल जाणवणं, त्वचा ओलसर वाटणं, असे फरक जाणवल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
निप्पलमधून (स्तनाग्रे) पदार्थाचा स्त्राव होत असेल, किंवा ते आतल्या बाजूला जात असेल किंवा वेदना होत असतील, तर डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा.
 
अनेकदा महिलांना ही लक्षणं ओळखण्यात अडचणी निर्माण होतात. त्यांना लक्षणं नीट जाणवत नाहीत. लहान ट्युमर लक्षात येत नाही, तसंच अनेकदा मॅमोग्राफीमध्येही काही लक्षात येत नाही. मात्र, कोणत्याही प्रकारचा बदल किंवा वरील लक्षणं आढळली, तर डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा.
 
एम्समधील सर्जिकल ऑन्कलॉजी विभागातील प्राध्यापक डॉक्टर एसव्हीएस देव सांगतात, "कोणत्याही प्रकारची लक्षणं आढळली तर लगेचच डॉक्टरांना दाखवावं. तसंच एखाद्याच्या घरात आधीची कॅन्सरची हिस्ट्री असेल तर त्यांना आम्ही 25 वर्षाच्या वयानंतर स्क्रिनिंग आणि जेनेटिक टेस्टिंगचा सल्लाही देतो."
 
तरुण मुलींमध्ये का वाढतोय ब्रेस्ट कॅन्सरचा धोका? अशी बातमी बीबीसीनं 2021 साली केली होती. ती बातमी तुम्ही इथे वाचू शकता.
 
ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे स्तनाच्या कर्करोगाची 12 लक्षणं
त्वचा राठ होणं
खळी सदृश खाच
स्तनाग्राभोवतीची त्वचा तडकणं
स्तनाग्रातून स्त्राव होणं
खाज येणं किंवा वेदना होणं
आक्रसलेली स्तनाग्रं
नसा फुगणं
उंचवटा येणं
अल्सर (व्रण)
संत्र्याच्या सालीसारखी त्वचा
आकारातील फरक
कडक गाठ
असं काही वेगळं जाणवल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या. याविषयी बीबीसी मराठीनं यापूर्वी व्हीडिओ केला होता, तो तुम्ही इथे पाहू शकता.
 
इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या माहितीनुसार, 2025 पर्यंत देशात कॅन्सरग्रस्तांची संख्या 15.6 लाखापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
 
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानंही ब्रेस्ट कॅन्सरची लक्षणं जाहीर केली होती. त्यांच्या माहितीनुसार, निपलमधून पाणी किंवा रक्त येणं, स्तन किंवा काखेत कायम दुखणं, निपलची जागा, आकार बदलणं, स्तनांवरील त्वचेत बदल, स्तनांच्या आकारात झालेला बदल, स्तनांवर गाठ आणि निपलच्या आजूबाजूला लाल होणं किंवा पुरळ येणं ही लक्षणं आहेत.
 
स्तनांची घरच्या घरी कशी तपासणी कशी करायची?
घरच्याघरी स्तनांची तपासणी शक्य आहे. असं तुम्हाला कोणी सांगितलं तर, तुमचा विश्वास बसणार नाही. अनेक लोकांना तर स्तनांची तपासणी म्हणजे काय? याबद्दलही माहिती नसते.
 
स्वत:च स्तनांची तपासणी कशी करायची? खरंच असं करता येतं? हे कसं शक्य आहे? असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील. या प्रश्नांची उत्तरं देणारी बातमी बीबीसी मराठीचे माजी पत्रकार मयांक भागवत यांनी 4 फेब्रुवारी 2021 रोजी केली होती. ती इथे देत आहोत.
 
'Self-Breast Examination' म्हणजे काय?
सोप्या शब्दात सांगायचं तर, स्वत:च स्वत:च्या स्तनांची तपासणी करणं म्हणजे 'Self-Breast Examination'.
 
कॅन्सरतज्ज्ञांच्या मते, घरच्या-घरी अत्यंत सोप्या पद्धतीने काही मिनिटात महिला आणि पुरूष 'Self-Breast Examination' करू शकतात.
फोर्टिस हॉस्पिटलच्या कन्सल्टंट मेडिकल ऑन्कोलॉजी विभागाच्या डॉ. उमा डांगी सांगतात, "स्तनांमध्ये अचानक बदल झालाय का? स्तनांमध्ये काही वेगळेपण आहे का? याची तपासणी म्हणजे 'Self-Breast Examination'.
 
स्तनांची तपासणी का महत्त्वाची?
भारतात महिलांमध्ये प्रामुख्याने आढळून येतो तो स्तनांचा कॅन्सर. भारतात गेल्या 20 वर्षांत स्तनांच्या कॅन्सरने ग्रस्त महिलांची संख्या वाढतेय.
 
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, भारतातील एकूण कॅन्सरग्रस्त महिलांच्या संख्येत ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण 25 ते 30 टक्के आहे.
 
मुंबईच्या नानावटी रुग्णालयाचे कॅन्सर सर्जरी विभागप्रमुख डॉ. संजय दुधाट सांगतात, "20 ते 40 वर्ष वयोगटातील महिलांमध्ये स्तनांच्या कॅन्सरचं प्रमाण वाढतंय. या मुली-महिलांमध्ये स्वत:च्या स्तनांची तपासणी कशी करायची याबाबत जागरुकता नाही. कॅन्सरच्या लवकर निदानासाठी 'Self-Breast Examination' महत्त्वाचं आहे."
केंद्र सरकारने लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार, 2018 मध्ये देशात 1 लाख 59 हजार स्तनाच्या कॅन्सरचं निदान झालं होतं. 2016 च्या तुलनेत ब्रेस्ट कॅन्सरग्रस्तांची संख्या 17 हजारांनी वाढली.
 
जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीप्रमाणे, "स्वत:च स्तनांची तपासणी केल्याने स्तनांच्या कॅन्सरचं निदान लवकर होण्यास मदत मिळते."
 
स्वत:च्या स्तनांची तपासणी कशी करायची?
स्तनांची तपासणी करण्याचे दोन प्रकार आहेत. आरशासमोर उभं राहून किंवा झोपून आपण स्तनांची तपासणी करू शकतो.
 
डॉ. उमा डांगी यांनी 'Self-Breast Examination' कशी करायची याची माहिती दिली.
 
स्तनांचा आकार, रंग बदलला आहे का हे पहाणे.
स्तनांना सूज येणं, स्तन लाल होणे, व्रण आले आहेत का याकडे लक्ष द्या.
स्तनाग्रांची (निपल) जागा बदलली आहे का हे पाहा?
निपल आतील बाजूस गेले असतील तर लक्ष देणं गरजेचं आहे.
निपलमधून पाणी, रक्त किंवा पिवळ्या रंगाचा पदार्थ येतो का याकडे लक्ष ठेवा.
हाताच्या तीन बोटांनी स्तनांच्या वर, खाली, डाव्या-उजव्या बाजूला आणि त्यानंतर गोलाकार पद्धतीने पूर्ण स्तनांवर हात फिरवून पाहा
तीन बोटांच्या मदतीने काखेत हळूवार दाब द्या.
केव्हा करावी स्तनांची तपासणी?
तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, स्तनांची तपासणी यावेळी करावी,
 
मासिक पाळीनंतर चार-पाच दिवसांनी करावी.
स्तन सॉफ्ट किंवा मऊ असताना करावी.
जेणेकरून स्तनांची तपासणी योग्य पद्धतीने होऊ शकते
 
याबाबत बीबीसी मराठीशी बोलताना मुंबईच्या अपोलो स्पॅक्ट्रा रूग्णालयातील सल्लागार ब्रेस्ट कॅन्सर सर्जन डॉ. संदीप बिपटे म्हणाले, "स्तनांच्या तपासणीसाठी फक्त तीन ते पाच मिनिटं वेळ लागतो. मासिक पाळी सुरू असलेल्या महिलांनी, पाचव्या किंवा सहाव्या दिवशी. तर मासिक पाळी बंद झालेल्यांनी महिन्यातून एकदा ब्रेस्ट तपासणी करणं आवश्यक आहे."
 
Self-Breast Examination च्या फायद्याचं उदाहरण देताना डॉ. संदीप बिपटे सांगतात, "मुंबईतील 22 वर्षीय तरूणीला घरच्या घरी 'सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन' नंतर हाताला गाठ लागली. ही गाठ साधी असेल म्हणून तिने दुर्लक्ष केलं. पण, गाठ वाढल्यानंतर रूग्णालयात आली. तपासणीत ही गाठ कॅन्सरची असल्याचं निदान झालं."
 
Published By- Priya Dixit