गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: गुरूवार, 16 नोव्हेंबर 2023 (11:55 IST)

इच्छाशक्ती अधिक दृढ कशी करायची? यशस्वी लोक काय करतात? वाचा

एल्व्हियानं (बदलेलं नाव) अत्यंत कमी वयापासून टेनिस खेळायला सुरुवात केली होती. सातत्यानं चांगलं टेनिस खेळत तिनं राज्यपातळीवर अनेक स्पर्धा जिंकल्या होत्या.
 
राष्ट्रीय स्तरावरही तिचं रँकिंग चांगलं होतं. पण नंतर नेमकं काय झालं हेच समजलं नाही. कारण तिनं स्पर्धा जिंकण्याची शक्तीच जणू गमावली की काय? असं वाटू लागलं. कारण सेमिफायनल आणि फायनलमध्ये तिचा पराभव होऊ लागला होता.
 
सुरुवातीला तिचे पालक आणि कोच यांना वाटलं की, तिच्या खेळण्याच्या तंत्रातील त्रुटीमुळं कदाचित असं होत असेल. पण जेव्हा सर्वबाजूंनी अभ्यास केला आणि वरिष्ठ पातळीवरच्या प्रशिक्षकांचाही सल्ला घेण्यात आला तेव्हा तिला एखाद्या मानसोपचारतज्ज्ञाला भेटून समुपदेशन (काऊन्सलिंग) करून घेण्याचा सल्ला देण्यात आला.
 
लखनऊत राहणाऱ्या एल्व्हिया (बदललेले नाव) च्या आई वडिलांनी आधी लखनऊमध्येच डॉक्टरांचा सल्ला घेतला आणि नंतर ते दिल्लीला आले.
 
सुरुवातीला महिन्यात दोन वेळा आणि नंतर एका महिनाआड त्यांचं समुपदेशन सुरू झालं. त्यानंतर ती पुन्हा स्पर्धा जिंकू लागली. सध्या ती नॅशनल रँकिंगमध्ये 40 व्या क्रमांकावर आहे.
 
तिचं समुपदेशन करणारे मानसोपचारतज्ज्ञ अरविंद मौर्य यांनी बीबीसीचे सहकारी अंजिल दास यांच्याशी बोलताना म्हटलं की, "आम्ही लोकांना अशा प्रकारे प्रेरित करतो की, त्यांचा दृष्टीकोन किमान थोडा-फार बदलता यावा. मानसोपचारतज्ज्ञ म्हणून काम करताना आम्ही त्यांच्या विचार करण्याच्या पद्धतीवर अधिक काम करतो. म्हणजे त्यामुळं त्यांचा दृष्टीकोन काहीसा बदलतो."
 
पश्चिम दिल्ली सायकिट्री सेंटरमध्ये मानसोपचातज्ज्ञ असलेले अरविंद यांच्या मते, "आम्ही एल्व्हियाशी (बदललेले नाव) चर्चा केली. तिचं वय कमी असल्यामुळं आम्हाला तिची काळजीही घ्यायची होती. समुपदेशनामुळं एक खेळाडू म्हणून त्यांच्या मानसिक स्थितीत बदल झाला आणि त्यानंतर जिंकता-जिंकता पराभव होण्याची स्थिती निर्माण झाली नाही."
 
प्रचंड इच्छाशक्ती
तुम्ही स्वित्झर्लंडचा 38 वर्षीय स्टार टेनिसपटू स्टेन वावरिंका याच्या हातावरचा एक टॅटू पाहिला असेल.
 
तीन वेळा ग्रँडस्लॅम विजेता राहिलेल्या वावरिंकाच्या हातावर असलेल्या या टॅटूमध्ये,"एव्हर ट्राइड. एव्हर फेल्ड. नो मॅटर ट्राय अगेन. फेल अगेन. फेल बेटर." म्हणजे, "तुम्ही खूप प्रयत्न केले आणि अपयशी झाले तरी हरकत नाही. पुन्हा प्रयत्न करा, पुन्हा अपयशी व्हा, पण आधीपेक्षा चांगली कामगिरी करून अपयशी व्हा."
 
38 वर्षांचा वावरिंका अनेक अपयशांनंतर एकदा नव्हे तर तीन वेळा टेनिसच्या प्रतिष्ठीत स्पर्धा असेल्या ग्रँडस्लॅममध्ये विजयी ठरला आहे.
 
वावरिंकाच्या या यशामागे एक गोष्ट काम करत होती, ती म्हणजे त्याची 'दृढ इच्छाशक्ती'.
 
हे अत्यंत शक्तिशाली शस्त्र आहे. या शस्त्रामुळंच क्रीडाजगताबरोबर इतर सर्वच क्षेत्रात अशी अनेक उदाहरणं सापडतात, जिथं अपयशी झाल्यानंतर लोक पुन्हा एका नव्या उंचीवर पोहोचलेले पाहायला मिळालं आहे.
 
मी अनेक वर्षं जिंकत राहिले, त्याचं कारण म्हणजे माझ्यात इच्छाशक्ती आणि आत्मविश्वास आहे.
 
बुद्धीबळातील ग्रँडमास्टर कोनेरू हम्पीनं बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इअर पुरस्कार जिंकल्यानंतरही असंच काही म्हटलं होतं. "मी अनेक वर्ष जिंकत राहिले कारण माझ्यामध्ये इच्छाशक्ती आणि आत्मविश्वास आहे," असं ती म्हणाली होती.
 
बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन चा जीवनगौरव पुरस्कार मिळाल्यानंर अॅथलिट अंजू बॉबी जॉर्ज यांनी त्यांना किती प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागला आणि त्यातून बाहेर पडायलाही किती प्रचंड मेहनत लागली होती, हे सांगितलं होतं. "योग्य प्रेरणा आणि इच्छाशक्तीनं सर्वकाही शक्य आहे," असं तेव्हा अंजू बॉबी जॉर्ज यांनी म्हटलं होतं.
 
संयमाची परीक्षा
आपण कधीतरी अशा काही परिस्थितीचा सामना करतो की, ती परिस्थिती जणू आपल्या स्वतःवरच्या संयमाची परीक्षा घेण्यासाठी आली आहे.
 
समजा तुम्ही वजन नियंत्रित राहावं म्हणून डाएटवर असाल आणि त्याचवेळी तुमचा सर्वात आवडता गोड पदार्थ तुमच्या समोर ठेवला. तर तो पदार्थ तुमच्या कानात कुजबुजतो की, यावेळी एकदाच खाऊ. पण तरीही तुम्ही त्याला पाहून स्वतःवर संयम ठेवाल आणि खाणार नाहीत.
 
जेव्हा तुमच्यामध्ये असलेली इच्छाशक्ती तुम्हाला तसं करण्यासाठी शक्ती देते, तेव्हाच हे घडू शकतं. इच्छाशक्ती अशा प्रलोभनांपासून संरक्षण करत तुम्हाला तुमच्या लक्ष्यावर टिकून राहण्याची प्रेरणा देते.
 
अशा क्षणी तुमची इच्छाशक्ती तुमच्या मनात निर्माण होणारे विचार, भावना आणि आवेगावर नियंत्रण मिळवण्याची क्षमता तुम्हाला प्रदान करत असते. त्यामुळं तुम्हाला स्वतःवर संयम मिळवता येतो. त्यामुळे तुम्ही एखाद्या कामाची टाळाटाळ बंद करून, तुमचं जे लक्ष्य आहे त्यावर मन केंद्रित करता.
 
मानसोपचातज्ज्ञ अरविंद मौर्य यांच्या मते प्रत्येक रुग्णाची किंवा व्यक्तीची मनस्थिती वेगळी असते. "अशा परिस्थितीत आम्ही एखाद्याशी बोलतो तेव्हा त्यांच्याबरोबर सातत्य टिकवून ठेवण्यावर लक्ष केंद्रित करतो. एकाग्रतेवरही आम्ही जोर देतो आणि त्याचा सकारात्मक परिणाम पाहायला मिळतो."
 
जास्त इच्छाशक्ती असणे
काही लोकांमध्ये इतरांच्या तुलनेत खूप जास्त इच्छाशक्ती असते. उदाहरण द्यायचं झाल्यास काही लोक दिवसभर परिश्रम केल्यानंतरही वर्कआऊट करतात. कारण त्यांना फिटनेसचं लक्ष्य पूर्ण करायचं असतं. तर त्याचवेळी इतर मात्र जंक फूडसह टीव्हीसमोर बसून त्यांचा वेळ घालवत असतात.
 
अनेक लोकांना वाटतं की, त्यांच्याकडे इच्छाशक्ती नावाची गूढ शक्ती असेल तर ते त्यांचं जीवन अधिक चांगलं बनवू शकतात.
 
स्वतःवर जास्त नियंत्रण किंवा संयम असल्यास आपण योग्य आहार घेणे, रोज व्यायाम करणे, नशा-मद्य सेवन टाळणे, निवृत्तीनंतरची बचत करणे आणि काम टाळण्याची प्रवृत्ती दूर करणे अशी अनेक लक्ष्य साध्य करण्यात यशस्वी होऊ शकतो.
 
'कमी अंहकार'
अगदी अलिकडच्या काळापर्यंत मानसशास्त्रीय सिद्धांतानुसार असं मानलं जात होतं की, इच्छाशक्ती बॅटरीसारखी असते. तिची सुरुवात संपूर्ण शक्तीनिशी होते, पण तुम्ही विचार, भावना आणि वर्तन यावर नियंत्रण मिळवण्यातच त्या बॅटरीची ऊर्जा नष्ट करता.
 
बॅटरीप्रमाणे रिचार्ज करण्यासाठी तुम्हाला आराम मिळाला नाही तर तुमची इच्छाशक्तीही प्रचंड वेगानं क्षीण होते. त्यामुळं संयम बाळगणं आणि समोर येणाऱ्या प्रलोभनांपासून वाचणं कठीण होतं.
 
फ्रॉयडवादी मानसिक विश्लेषणात याला 'कमी अहंकार' या दृष्टीनं पाहिलं जातं.
 
ज्या लोकांमध्ये आत्मविश्वास अधिक असतो, कदाचित त्यांच्यात सुरुवातीला इच्छाशक्ती अधिक असेलही, पण दबावात आल्यानंतर ते कमकुवत बनतात.
 
इच्छाशक्तीचा मानसिकतेशी संबंध
इच्छाशक्ती आणि ती टिकून राहण्यासाठीची एकाग्रता ही व्यक्तीच्या मानसिकतेवर अवलंबून असते.
 
2010 मध्ये मानसोपचारतज्ज्ञ व्हेरोनिका जॉब यांनी त्यांच्या संशोधनातील निष्कर्ष प्रकाशित केले. त्यात काही रंजक पुराव्यांसह या सिद्धांतावर प्रश्न उपस्थित करण्यात आला की, इच्छाशक्ती कमी होणं लोकांच्या मूळ मान्यतांवर अवलंबून असतं.
 
नव्या संशोधनात हे सांगण्यात आलं आहे की, यश मिळवण्यासाठी प्रचंड इच्छाशक्तीबरोबरच आखलेली रणनितीदेखिल महत्त्वाची असते. कारण तीच ध्येयाच्या दिशेनं आपल्याला पुढं नेत असते.
 
जॉब यांना असं आढळलं की, मर्यादीत मानसिकता असलेले लोक अगदी, 'कमी अंहकाराच्या' सिद्धांतानुसार काम करतात. एक काम केल्यानंतर त्यांना नंतर पुन्हा खूप एकाग्रता हवी असते. उदाहरण द्यायचं झाल्यास, कंटाळवाणा मजकूर संपादित करणं. पण ज्या लोकांचा दृष्टीकोन व्यापक असतो, त्या लोकांमध्ये या सिद्धांताची लक्षणं आढळली नाहीत. त्यांची एकाग्रताही कमी झालेली नव्हती.
 
याबाबतीत भारतीय विद्यार्थी अमेरिकेच्या विद्यार्थ्यांपेक्षा पुढे असल्याचं दिसून आलं.
 
व्होरोनिका जॉब यांनी या निष्कर्षाच्या इतर संदर्भांचाही अभ्यास केला. उदाहरण द्यायचं झाल्यास, नारायणा टेक्नॉलॉजी यूनिव्हर्सिटी, सिंगापूरमध्ये कृष्णा सावनीबरोबर काम करताना त्यांच्या लक्षात आलं की, इच्छाशक्तीची कल्पना वेगवेगळ्या देशांमध्ये वेगळी असते. अमेरिकेच्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत अमर्यादीत मानसिकता असलेले भारतीय विद्यार्थी अधिक आहेत.
 
जॉब यांनी हेही दाखवलं की, इच्छाशक्तीची मानसिकता वास्तविक जीवनाच्या परिणामांशी संबंधित असते.
 
जॉब यांनी त्यांच्या संशोधनात युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांना सलग दोन आठवडे रद्द होणाऱ्या आठवडी वर्गाच्या वेळेत त्यांना एक अॅक्टिव्हिटी पूर्ण करण्यास सांगितलं.
 
त्यात अमर्यादीत इच्छाशक्ती आणि कमी इच्छाशक्ती असलेल्या विद्यार्थ्यांवर अभ्यास केला.
 
अॅक्टिव्हिटीच्या दुसऱ्या दिवशी अधिक काम असूनही अमर्यादीत इच्छाशक्ती असलेल्या विद्यार्थअयांची काम करण्याची क्षमता वाढलेली दिसली.
 
जॉब यांच्या संशोधनातून असंही समोर आलं की, आजच्या काळात विज्ञानाबाबत उपलब्ध पुस्तकांद्वारे शिकणं हे किमान काही काळासाठी का होईना पण लोकांच्या मान्यता बदलू शकते.
 
अनेक रुग्णांबरोबर तर असं बाँडिंग होतं की, ते दीर्घकाळ आमच्याशी संपर्कात राहतात. दृढ इच्छाशक्तीमुळं आज त्यांच्यापैकी बहुतांश त्यांच्या क्षेत्रात यशस्वी होत आहेत.
 
स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी ऑफ पेन्सल्व्हेनियाच्या संशोधकांनी पूर्वप्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना 'इच्छाशक्तीचा वापर थकवा नव्हे तर उत्साह देणारा अलू शकतो आणि आपण याचा जेवढा अधिक अभ्यास करू तेवढाच आपला आत्मविश्वास वाढेल,' हे शिकवण्यासाठी एक स्टोरीबूक तयार केलं आहे.