1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: मंगळवार, 6 डिसेंबर 2022 (09:19 IST)

कमी झोपेमुळे जाडी वाढते - संशोधन

जाडी वाढण्याची अनेक कारणे समोर आली आहेत. आहारातील बदल, व्यायामाचा अभाव ही तर जाडी वाढण्याची मुख्य कारणे समजली जातातच. पण अमेरिकेतल्या संशोधकांनी केलेल्या संशोधनात झोप कमी मिळणे हेही जाडी वाढण्याचे एक कारण असू शकते असे आढळून आले आहे. 
 
 लोकांना झोप कमी मिळते. ती पूर्ण होण्याच्या आतच कामाच्या निमित्ताने उठावे लागते. पण अर्धवट झोपेमुळे आलेला आळस घालविण्यासाठी चहा किंवा मोठा कप भरून कॉफी घेतली की, आळसावलेले शरीर कामाला लागते. मात्र अशा प्रकारची उत्तेजक पेये घेणे आणि झोप न झालेल्या शरीराला तसेच कामाला लावणे यातूनही जाडी वाढते. झोपेच्या वेळा आणि झोपेचा पॅटर्न बदलला की, मेंदूमध्ये होणार्‍या प्रक्रिया विचलित होतात आणि परिणामी माणसाला अधिक उष्मांक पुरवणारे अन्न खाण्याची वासना होते आणि त्यामुळे जाडी वाढते.
 
पुरेशी झोप घेतली नसेल तर शरीरामध्ये घेरलीन नावाचे हार्मोन तयार होण्याची प्रक्रिया ही सुद्धा विस्कळीत होते. या हार्मोनमुळे भूक लागत असते. परंतु त्याचे पाझरणे विस्कळीत झाल्यामुळे जेवणाचा पॅटर्नही विस्कळीत होतो आणि जेवणातला नियमितपणा कमी झाल्याने शरीरात चरबी जमा व्हायला लागते. अनियमित आणि अपुर्‍या झोपेचे इतरही अनेक परिणाम शरीरावर होतात. याबाबत काही तज्ज्ञांनी तर फार गांभीर्याने इशारे दिले आहेत. शरीराच्या कष्टाबरोबरच झोपेची आवश्यकता असते, पण तिच्यात नियमितता नसेल तर शरीराच्या चयापचय क्रियेमध्ये हॅवॉक निर्माण होतो. त्यातून मधुमेहासारखे विकारसुद्धा बळावू शकतात असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.