नवीन वर्ष आणि तुमचे आरोग्य!
अन्नपदार्थ असोत की सौंदर्यवर्धक उत्पादनं, त्यांच्या निर्मितीत घातक रसायनांच्या वापराचं प्रमाण प्रचंड वाढलंय. अशी सौंदर्यप्रसाधनं, अन्नपदार्थांच्या सततच्या वापरामुळं तसंच सेवनांमुळं आरोग्याच्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे नव्या वर्षात या गोष्टी विकत घेताना त्यात वापरलेल्या घटक पदार्थांविषयी माहिती घ्यायला हवी. विविध घटक पदार्थ, रसायनं आणि त्यांच्या दुरुपयोगांबद्दल माहिती घ्यावी. आपण काय खायचं आणि अंगाला काय लावायचं याचा निर्णय गांभीर्यानं घेणंच हिताच ठरतं.
* काही गोष्टी आहारातून वर्ज्य करण्याऐवजी आरोग्यदायी, पोषक गोष्टींचा समावेश करावा. फळं, भाज्या, हिरव्या पालेभाज्या, सुकामेवा, पूर्ण धान्य तसंच प्रथिनयुक्त आहाराचं सेवन करावं. यामुळे आरोग्याला हानिकारक पदार्थांचं सेवन कमी होईल आणि काही गोष्टी खात नसल्याबद्दल वाईटही वाटणार नाही.
* शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यासाठी आपण काही उपाय करतो. त्याचप्रमाणे नव्या वर्षात चुकीच्या माणसांना आपल्यापासून दूर ठेवण्याचा निश्चय करावा. आपल्या आसपासच्या वातावरणाचा आयुष्यावर फार मोठा परिणाम होत असतो हे जाणून घ्यावं. नकारात्मक ऊर्जा आणि माणसांना स्वत:पासून दूर ठेवावं.
* नेहमी सकारात्मक विचार करा. कधीही स्वत:ला कमी लेखू नये. स्वत:शी बोलताना सकारात्मक गोष्टींकडे लक्ष केंद्रीत करावे. आपण गेल्या वर्षात काय मिळवलं. याचा विचार करावा आणि वाईट गोष्टी, अपयशाला मागे सारावे.
* आपल्या आवडीचा व्यायाम करावा. दररोज उठून धावणं शक्य नसेल तर ते करू नका. वेगवेगळे व्यायाम प्रकार करून पहावेत. आपल्या आवडीचा व्यायाम प्रकार निश्चित करावा आणि निश्चयाने तो करावा.