गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By

हृदयविकार टाळण्यासाठी 30 ते 40 वयोगटातल्या लोकांनी 'ही' काळजी घ्या

heart attack women
गेल्या काही वर्षांमध्ये आधुनिक जीवनशैलीमुळे सर्वच आर्थिक-सामाजिक स्तरांमधील लोकांच्या आयुष्यात मोठे बदल झालेले दिसून येतात. यामुळे उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग, लठ्ठपणा असे अनेक आजार सर्वच वयोगटातील लोकांमध्ये वाढलेले दिसत आहेत.
 
या जीवनशैलीविषयक आजारांमध्ये अनेक मानसिक आजार आणि मानसिक अवस्थांचाही समावेश आहे. कोरोनानंतरच्या काळात जीवनशैलीविषयक आजारांत मोठी वाढ झालेली आहे. हृदयरोगाचं प्रमाण एकेकाळी 50 ते 60 वयोगटापलिकडच्या लोकांमध्ये असे मात्र आता ते हळूहळू खाली येत तरुणांमध्येही हृदयरोगाच्या धक्क्याचं प्रमाण वाढलेलं दिसतं. हृदयरोगाच्या या संकटाला वेळीच ओळखून 30-40 वयोगटातील लोकांनी काय करणं गरजेचं आहे ते आपण पाहू.
 
तारुण्यात हृदयविकार होऊन अकाली मृत्यू येणं यामागे बदलती जीवनशैली, लठ्ठपणा, व्यायामाचा अभाव ही मोठी कारणं असावीत असं तज्ज्ञ सांगतात मात्र यासर्व गोष्टींची काळजी घेणारी व्यक्ती सर्व रोगांपासून पूर्ण मुक्त असेलच असं नाही. कोणत्याही व्यक्तीला हृदयविकाराचा धक्का आणि आरोग्याच्या इतर समस्या भेडसावू शकतात.
 
अकाली मृत्यूची कारणे शोधण्यासाठी सरकार आणि यंत्रणेने योग्य विश्लेषण केले पाहिजे आणि आवश्यक तेथे शवविच्छेदन केले पाहिजे. त्यानंतरच या प्रकारच्या मृत्यूची खरी कारणे समोर येऊ शकतात आणि त्याचा अभ्यासही लोकांसाठी उपयुक्त करू शकतो. असं तज्ज्ञ सुचवतात.
 
हृदयविकाराचा झटका येण्याची बरीच कारणं आहेत. त्यात हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्ताच्या धमन्यांमध्ये फॅट जमा (कॅल्शियम कमी असल्याने) झाल्यामुळे हृदयाला होणारा रक्तपुरवठा खंडित होतो. अशा परिस्थितीत, रक्तवाहिन्यांमधील अडथळा वेळेवर दूर केला नाही तर शरीरात ऑक्सिजनची कमतरता निर्माण होते. आणि छातीत वेदना जाणवू लागतात. यालाच हृदयविकाराचा झटका म्हणतात आणि तो जीवघेणा ठरू शकतो.
 
पण कधीकधी अॅसिडिटी किंवा गॅसेसच्या त्रासामुळे देखील आपल्याला अस्वस्थ वाटू शकतं. हाच त्रास असेल असा गैरसमज होऊन लोक या दुखण्याकडे दुर्लक्ष करतात. अशा वेळी योग्य उपचार न मिळाल्याने लोकांना जीव गमवावा लागल्याची अनेक प्रकरणे आहेत. त्यामुळे डॉक्टर ईसीजी करण्याचा सल्ला देतात.
 
अहमदाबादच्या चौधरी हॉस्पिटमधील तज्ज्ञ डॉ. मुकेश चौधरी यांच्या मते, “लहान वयात हृदयविकाराचा झटका येण्यामागे आहाराच्या सवयी आणि जीवनशैलीचा मोठा वाटा असतो.”
 
ते म्हणतात, “अनेक वेळा आहारातील व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे हृदयाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. तसंच, हृदयाशी संबंधित समस्या पुढील काळात धोकादायक ठरेल, याचा अंदाज रुग्णाला सुरुवातीला येत नाही. त्यामुळे उपाचारात दिरंगाई होते.”
 
ते पुढे म्हणतात, “अनेक वेळा कार्डिओग्राम सामान्य असू शकतो. हृदयाशी संबंधित समस्यांचे निदान करण्यासाठी महत्त्वाची मानली जाणारी चाचणी म्हणजे अँजिओग्राफी. ही चाचणी वेळेवर होणं गरजेचं असतं.”
 
“कधीकधी हृदयविकाराचा झटका इतका तीव्र असतो की अँजिओग्राफीसाठी वेळच मिळत नाही. हृदयविकारासाठी योग्य वेळी योग्य उपचार करणं अत्यंत महत्त्वाचं असतं.”
 
30 ते 40 वयोगटातील लोकांनी आतापासूनच काय काळजी घ्यावी
हृदयरोगापासून दूर राहाण्यासाठी आपण काही प्रयत्न आधीपासूनच करू शकतो. तिशी ओलांडलेल्या प्रत्येकानं याकडे गांभीर्यानं लक्ष दिलं तर एक चांगली जीवनशैली आपण आत्मसात करू शकू.
 
बीबीसी मराठीला वोकहार्ट हॉस्पिटल्स, मुंबई सेंट्रल येथील हृदयरोगज्ज्ञ आणि शल्यचिकित्सक डॉ. गुलशन वोहरा यांनी यासंदर्भात अधिक माहिती दिली.
 
डॉ. वोहरा सांगतात, “सध्याच्या काळात तारुण्यात येणाऱ्या हार्ट अटॅकमागे त्यांच्या कौटुंबिक इतिहासात मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा हृदयाचे आजार असू शकतात. तसेच धूम्रपान, मद्यपान, बैठी जीवनशैली, व्यायामाचा अभाव आणि ताण ही सुद्धा कारणं आहेत.”
 
ते सांगतात, ईसीजी, टूडी एको आणि कोरोनरी अँजिओग्राफी या तीन चाचण्यांतून रुग्णाची स्थिती बहुतांश समजून येते आणि त्यावरुन या आजाराचं निदान केलं जातं.
 
हृदयरोग टाळण्यासाठी डॉ. वोहरा जीवनशैलीतील बदलांवर भर देतात. ते सांगतात, “प्रत्येक व्यक्तीला आपल्या कुटुंबात जर जनुकीय आजार असतील तर ते माहिती पाहिजेत. तसेच दारू-सिगारेट सोडणं अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येक व्यक्तीने नियमित व्यायाम म्हणजे किमान मिनिटं चालणं आवश्यक आहे. संतुलित आहार आणि दरवर्षी आरोग्याची तपासणी करणं आवश्यक आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ताण टाळला पाहिजे.”
 
जर आहार आणि जीवनशैलीतील बदल आजपासूनच केले तर हृदयरोगाच्या संभाव्य शक्यतेला दहा ते पंधरा वर्षं पुढं ढकललं जाऊ शकतं. काही लोकांच्या बाबतीत तो पूर्णतः टाळलाही जाऊ शकतो. महिलांनीही एक चांगली जीवनशैली आत्मसात करावी आणि वेळेत चाचण्या कराव्यात असं डॉ. वोहरा सांगतात.
 
अचानक हार्ट अटॅक येण्याची कारणं?
बीबीसीशी बोलताना बॉम्बे हॉस्पिटलचे हृदयविकारतज्ज्ञ डॉ. लक्ष्मण खेराडे सांगतात, "बी-12 शरीरामध्ये कमी प्रमाणात असेल तर, रक्ताची गाठ तयार होते. रक्त घट्ट होण्याची शक्यता असते. ही गाठ हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये गेल्यास हार्ट अटॅक येतो. असं झाल्यास कार्डिअॅक अरेस्टने रुग्णाचा मृत्यू होण्याची शक्यता असते."
 
तज्ज्ञांच्या माहितीनुसार, काहीवेळा अचानक तयार झालेली रक्ताची गाठ डोक्यात जाते. पण, यात रुग्णाला अर्धांगवायूचा झटका येण्याची शक्यता असते.
 
"काही रुग्णांना त्यांना हृदयाचा आजार आहे याची माहिती नसतं. अशावेळी हृदयावर जास्त प्रेशर आल्याने हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते, " असं डॉ. खेराडे सांगतात.
 



Published By- Priya Dixit