शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Updated : सोमवार, 18 एप्रिल 2022 (20:24 IST)

गर्भधारणेस समस्या? जननेंद्रियाचा टीबी कारणीभूत ठरू शकतो

टीबी (क्षयरोग) आणि वंध्यत्वचा एकमेकांसोबत खोलवर संबंध आहे. वेळेवर निदान आणि योग्य उपचाराच्या सहाय्याने या दोन्ही समस्यांवर मात करणे शक्य आहे.
 
टीबी (क्षयरोग) हा एक संसर्गजन्य रोग असून तो फुप्फुसावर परिणाम करतो, हे सर्वांना ठाऊक आहे. मात्र तुम्हाला माहीत आहे का, की टीबीमुळे गर्भाशय, फॅलोपियन नलिका आणि गुप्तांगांना देखील संक्रमण होऊ शकते? या समस्येवर जर सुरुवातीच्या टप्प्यात उपचार केला गेला नाही तर ते वंध्यत्वचे कारण बनू शकते!
 
जर तुम्ही गर्भधारणेचा प्रयत्न करत असाल, आणि त्यात तुम्हाला अपयश येत असेल, तर कदाचित बाळ होण्याच्या तुमच्या स्वप्नांच्या आड जननेंद्रियचा टीबी मूळ कारण असू शकतो. तसं पाहिले तर प्रजनन समस्येवर जेव्हा खऱ्या अर्थाने जोडपी उपचार घेतात, तेव्हा त्यांना कळून चुकते की स्त्री आणि पुरुषांमध्ये वंध्यत्वाचे मूळ कारण टीबी (क्षयरोग) देखील आहे.
 
भारतीय अकडेवारी
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO)च्या अंदाजानुसार, भारतामध्ये जगातील सर्वात मोठी क्षयरोगाची महामारी आहे, आणि देशासाठी ही मोठी चिंतेची बाब आहे. 2020 मध्ये, जगभरातील क्षयरोगाच्या घटनांपैकी सुमारे 26% प्रकरणे भारतात होती (WHO च्या जागतिक क्षयरोग अहवाल 2021 नुसार).
 
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR)च्या मते, भारतात IVFकरू पाहणाऱ्या बहुतांश महिलांमध्ये जननेंद्रियाचा टीबी (FGTB)मोठ्या प्रमाणात आढळून आला आहे. ICMR सर्वेक्षणानुसार गेल्या काही वर्षात भारतामध्ये FGTB चा प्रसार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे या समस्येचे निदान आणि व्यवस्थापनासाठी अनेक ICMR अभ्यास टीम राष्ट्रीय स्तरावर लागू अल्गोरिदम विकसित करण्यावर काम करत आहे.
 
कोणत्या वयोगटाने विशेष काळजी घ्यावी?
टीबी कोणत्याही वयोगटात होऊ शकतो, खासकरून 15 ते 45 या प्रजनन वयोगटातील महिलांना जननेंद्रियाच्या क्षयरोगाचा सर्वाधिक त्रास होतो, तर मध्यमवयीन पुरुष गटामध्ये ही समस्या दिसून येते.
 
जननेंद्रियाच्या क्षयरोगाचे लक्षणे:
महिला: महिलांमध्ये अनियमित मासिक पाळी, ओटीपोटात दुखणे, योनिमार्गातून सतत रक्त किंवा रक्तविराहित स्त्राव आणि त्यातून दुर्गंध येणे तसेच संभोगानंतर रक्तस्त्राव यांसारखी विविध लक्षणे आढळून येतात. महिलांमध्ये, जननेंद्रियाचा टीबी फेलोपीयन ट्यूब आणि गर्भाशयावर परिणाम करू शकतो. एंडोमेट्रियमच्या अस्तरावर, गर्भाशयाच्या भिंतीला तो चिकटून राहतो, ज्याला अशेरमॅन सिंड्रोम असे म्हंटले जाते.
 
काहीवेळा तर FGTB चे काहीच लक्षणे आढळून येत नसल्यामुळे, सुरुवातीच्या टप्प्यामध्ये या समस्येचे अचूक व लवकर निदान मिळवणे आव्हानास्पद असते. त्यामुळे निर्धारित लक्षणावर अवलंबून न राहता डॉक्टर रुग्णाचा वैद्यकीय इतिहास, क्लिनिकल परीक्षण तसेच टीबीच्या जिवाणूचे परीक्षण करण्यासाठी मूत्र तपासणी, सोनोग्राफी, सीटी, एंडोमेट्रियल एस्पिरेट (किंवा बायोप्सी), एंडोस्कोपी यांसारख्या वैद्यकीय चाचण्या घेत निर्णायक निदान करू शकतात.
 
पुरुष : जननेंद्रियाचा टीबी प्रामुख्याने स्त्रियांमध्ये दिसून येतो, पुरुषांमध्ये प्रोस्टेट ग्रंथी, एपिडिडायमिस आणि वृषणांवर परिणाम करू शकतो. पुरुषांमध्ये, यामुळे स्खलन होण्यास असमर्थता, शुक्राणूंची कमी हालचाल आणि पिट्यूटरी ग्रंथीची पुरेशी हार्मोन्स तयार करण्यास असमर्थता यां काही समस्या आढळून येतात.
 
महत्वाची काळजी खोकताना आणि शिंकण्याद्वारे हवेत सोडल्या जाणार्‍या लहान थेंबांद्वारे टीबी चे विषाणू एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीमध्ये संक्रमित होऊ शकतात. याचे वेळेत निदान आणि उपचार न झाल्यास, संपूर्ण शरीरात ते पसरू शकतात, तसेच किडनी, उदर, मेंदू, गर्भाशय ते अगदी फॅलोपियन ट्यूबमध्ये सुद्धा टीबीचे दुय्यम संक्रमण होऊ शकते. त्यामुळे यावर वेळेवर उपचार घेणे गरजेचे आहे.
 
सदर लक्षणे आणि त्यांची स्वरूप पाहता, वंध्यत्व तपासणी दरम्यान या समस्यांचे निदान केले जाते. भारतामध्ये क्षयरोगाशी संबंधित रुग्णांना एका वेगळ्या नजरेने पाहिले जाते. टीबी आजारासंबंधीत अनेक सामाजिक भ्रम असल्यामुळे त्यावर निदान आणि उपचार करणे प्रतिबंधक ठरते.
 
उपचार
वेळेत निदान आणि उपचार केल्याने टीबीची समस्या त्वरित आटोक्यात आणता येऊ शकते, ही एक सर्वात चांगली बातमी आहे. इतकेच नव्हे तर टीबीचा उपचार घेत असताना, गर्भधारणेसाठी प्रजनन संबंधित अनेक प्रगत उपचार घेणे देखील शक्य आहे. जसे की, असिस्टेड रिप्रॉडक्टिव्ह टेक्नॉलॉजी (ART),इन विट्रो फर्टिलायझेशन (IVF),किंवा इंट्रायूटरिन इन्सेमिनेशन (IUI)या उपचार प्रक्रियेचा वापर केला जाऊ शकतो. FGTB च्या बाबतीत, भ्रूण हस्तांतरण हे सर्वात यशस्वी IVF उपचार असल्याचे आढळून आले आहे, तर पुरुषांमध्ये टेस्टिक्युलर स्पर्म एस्पिरेशन (TESA)सारख्या एका साधारण प्रक्रियेमार्फत समस्येच निवारण करता येऊ शकते, यामध्ये शुक्राणू पेशी आणि ऊतक लहान सुई वापरून अंडकोषातून बाहेर काढले जातात आणि अंडी फलित करण्यासाठी शुक्राणू ऊतीपासून वेगळे केले जातात. या व्यतिरिक्त, राहणीमानात सुधारणा, प्रतिकारशक्तित वाढ, आहारावर लक्षकेंद्रित, गर्दीच्या ठिकाणांपासून दूर राहणे, बीसीजीची लस घेणे यांसारखे गोष्टी क्षयरोगापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी उचललेली महत्वाची पावले आहेत.
- Dr Hrishikesh Pai