गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: शुक्रवार, 16 सप्टेंबर 2022 (09:11 IST)

अंगावर पांढरं जाणं म्हणजे काय? व्हाईट डिस्चार्जकडे दुर्लक्ष करू नका, कारण...

Urine
महिला अनेक तक्रारी घेऊन स्रीरोगतज्ज्ञांकडे जातात. यातील एक प्रमुख तक्रार म्हणजे अंगावरून पांढरं पाणी जाणे. ज्याला सामान्य भाषेत White Discharge किंवा श्वेतप्रदर म्हटलं जातं.
 
पाळी सुरू झाल्यापासून ते पाळी बंद होऊन रजोनिवृत्तीपर्यंत (मेनोपॉज) प्रत्येक मुलगी आणि महिलेच्या योनीमार्गातून स्राव बाहेर पडत असतो. सामान्यत: हा स्त्राव पांढऱ्या रंगाचा, बुळबुळीत आणि चिकट असतो.
 
ग्लोबल रुग्णालयाच्या स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अनघा छत्रपती सांगतात, "योनीमार्गातून होणारा व्हाईट डिस्चार्ज ही सामान्य बाब आहे. पण काहीवेळा योनीमार्गात झालेल्या जंतुसंसर्गामुळे याचा रंग बदलतो. ज्यावर तातडीने उपचार गरजेचे आहेत."
 
योनीमार्गातून होणारा व्हाईट डिस्चार्ज म्हणजे काय? याची कारणं काय? जंतुसंसर्गामुळे काय होतं? याची माहिती आपण तज्ज्ञांकडून जाणून घेणार आहोत.
 
व्हाईट डिस्चार्ज म्हणजे काय?
योनीमार्गातून पांढरं पाणी जाणे किंवा द्रव पदार्थ बाहेर पडणे याला 'व्हाईट डिस्चार्ज' असं म्हणतात.
 
ग्लोबल रुग्णालयाच्या स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अनघा छत्रपती सांगतात, "पाळी येण्याअगोदर, पाळी नंतर, गर्भावस्थेच्यामध्ये आणि लैंगिक संबंधांची इच्छा झाल्यानंतर योनीमार्गातून होणाऱ्या व्हाईट डिस्चार्जचं प्रमाण वाढू शकतं."
सामान्यत: व्हाईट डिस्चार्ज पारदर्शक असतो आणि याला कोणत्याही प्रकारचा वास येत नाही.
 
"स्त्रीबीजविमोचनानंतर इस्ट्रोजेनचं प्रमाण कमी होऊन प्रोजेस्ट्रोनचं प्रमाण वाढतं. याच्या प्रभावामुळे योनीमार्गातून निघणारा स्राव घट्ट पांढऱ्या रंगाचा होतो," हिंदुजा रुग्णालयाच्या स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अश्विनी भालेराव-गांधी सांगतात.
 
व्हाईट डिस्चार्जचं प्रमाण वयाप्रमाणे कमी जास्त होतं. महिला जास्त प्रवास करत असतील तर यात बदल होतो.
 
तज्ज्ञ सांगतात की, काही प्रमाणात व्हाईट डिस्चार्ज सामान्य आणि चांगला आहे. यामुळे प्रजनन संस्थेतील मृत पेशी बाहेर टाकल्या जातात. शरीरातील केमिकल्सचं प्रमाण संतुलित रहातं आणि योनीमार्गाचं संरक्षण होतं.
 
योनीमार्गात जंतुसंसर्गामुळे काय होतं?
जंतुसंसर्गामुळे योनीमार्गातून होणाऱ्या या स्त्रावाच्या स्वरूपात आणि रंगात बदल होतो.
 
नॅशनल हेल्थ पोर्टलच्या माहितीनुसार, प्रमाणाबाहेर व्हाईट डिस्चार्ज होत असेल किंवा याचा रंग पिवळा असल्यास आणि वास येत असेल तर याला 'ल्युकोरिया' म्हटलं जातं. ही एक वैद्यकीय समस्या आहे.
 
देशभरात स्त्रीरोगतज्ज्ञांकडे ल्युकोरियाची तक्रार घेऊन येणाऱ्या महिलांची संख्या 25 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. योनीमार्गातून होणारा स्त्राव पिवळा, हिरवा, घट्ट असेल किंवा याला वास येत असेल तर ही जंतुसंसर्गाची लक्षणं आहेत.
 
डॉ. अश्विनी भालेराव-गांधी सांगतात, "लैंगिक संबंध ठेवताना जोडीदाराच्या माध्यमातून जंतू योनीमार्गात शिरतात. मूत्र आणि मलमार्गातूनही जिवाणू-विषाणू योनीमार्गात प्रवेश करतात. त्यामुळे योनिपटल दाह (vaginitis) आणि गर्भाशयमुख दाह (cervicitis) यामुळे व्हाईट डिस्चार्जचं प्रमाण वाढतं. यामुळे लघवी करताना आणि लैंगिक संबंध ठेवताना तीव्र वेदना होण्याची शक्यता असते."
 
व्हाईट डिस्चार्ज अनेक प्रकारच्या जिवाणू आणि विषाणूंमुळे होऊ शकतो. यातील बॅक्टेरिअल व्हजायनॉसिस, कॅडिडियासीस आणि ट्रायकोमोनियासीस हे प्रकार सर्वात जास्त प्रमाणात आढळून येतात.
 
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, बॅक्टेरिअल व्हजायनॉसिसमध्ये योनीमार्गातून होणारा डिस्चार्ज ग्रे (करड्या) रंगाचा असतो. कॅडिडियासीसमध्ये योनीमार्गातून होणाऱ्या डिस्चार्जचा रंग पांढरा असतो.
 
ट्रायकोमोनियासीसमध्ये योनीमार्गातून निघणाऱ्या स्त्रावाचा रंग हिरवा असतो आणि याला वास येतो
 
योनीमार्गातून होणाऱ्या स्त्रावाचे रंग काय सांगतात?
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या नॅशनल हेल्थ पोर्टलवर दिलेल्या माहितीनुसार, योनीमार्गात जंतुसंसर्ग झाल्यास होणाऱ्या स्त्रावाचा रंग पांढरा, पिवळा, लाल किंवा काळा असण्याची शक्यता असते. हा स्त्राव चिकट, वास येणारा आणि पांढरा असेल तर तातडीने वैद्यकीय तपासणी करणं गरजेचं आहे.
 
स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अनघा छत्रपती याबाबत अधिक माहिती देतात.
 
पिवळा डिस्चार्ज ट्रायकोमोनियासीसचं लक्षण आहे. हा लैगिंक संबंधातून होणारा संसर्ग आहे. यात बाहेर पडणाऱ्या पाण्याला खूप वास येतो. महिला आणि पुरुष दोघांनाही उपचार घ्यावे लागतात.
 
ब्राउन डिस्चार्ज योनीमार्गातून जुनं रक्त पडल्यामुळे होतो. गर्भाशय किंवा गर्भाशयाच्या मुखातून याची सुरूवात झालेली असते. अशा परिस्थितीत पॅप स्मिअर चाचणी करून गर्भाशय किंवा गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सरची शक्यता पडताळण्यात येते.
 
ग्रे डिस्चार्ज जिवाणूंच्या संसर्गामुळे होतो.
 
ल्युकोरियाची लक्षणं काय?
नॅशनल हेल्थ पोर्टलच्या माहितीनुसार ल्युकोरियाची प्रमुख लक्षणं आहेत.
 
योनीमार्गातून मोठ्या प्रमाणात होणारा डिस्चार्ज
मांडी आणि पोटरीच्या स्नायूंमध्ये तीव्र वेदना
श्वास घेण्यात अडथळा, डोकेदुखी, अपचन, पाळीदरम्यान वेदना होणं, ओटीपोटात दुखणं आणि बद्धकोष्ठता ही देखील याची काही लक्षणं आहेत
 
डॉ. अश्विनी भालेराव-गांधी व्हाईट डिस्चार्ज जास्त होण्याची खालील कारणं सांगतात,
 
अॅन्टीबायोटिक्सच्या अतिसेवनामुळे चांगले जीवाणू कमी होतात. यामुळे बुरशीसंसर्गाची शक्यता वाढते
ताण तणावामुळे रोगप्रतिकारशक्ती कमी होते
एकापेक्षा जास्त जोडीदारासोबत लैंगिक संबंध
योनीमार्गाच्या स्वच्छतेसाठी दूषित पाण्याचा वापर
व्हाईट डिस्चार्जबाबत महिलांमध्ये जागृती आहे?
तज्ज्ञ म्हणतात, सेक्शुअली अॅक्टिव्ह असणारी प्रत्येक महिला तिच्या आयुष्यात एकदातरी व्हाईट डिस्चार्जच्या त्रासाचा अनुभव करते. पण हा त्रास सारखाच होत राहिला तर जीवनशैलीत बदल करणं महत्त्वाचं आहे.
नानावटी रुग्णालयाच्या स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. गायत्री देशपांडे म्हणतात, "योनीमार्गातून होणारा डिस्चार्ज प्रमाणाबाहेर होतोय का आणि याचं स्वरूप काही वेगळं आहे का हे ओळखण्यासाठी महिलांमध्ये जनजागृती करण्याची गरज आहे."
 
स्त्रीबीजं अंडाशयातून बाहेर येताना (Pre-Ovulatory) व्हाईट डिस्चार्ज थोडा घट्ट असतो. त्यानंतर (Post-Ovulatory) डिस्चार्ज पारदर्शक आणि चिकट असतो. योनीमार्गाची स्वच्छता केल्यानंतर सहजतेने निघून जातो.
 
महिलांना व्हाईट डिस्चार्जबाबत माहिती आहे का? हा त्रास महिला अंगावर काढतात? डॉ. अनघा छत्रपती म्हणाल्या, "काहीवेळा महिला योनीमार्गाच्या जंतुसंसर्गाकडे दुर्लक्ष करतात. याबाबत बोलण्यास त्यांना लाज वाटते. याबाबत काही महिला खुलेपणाने चर्चा करत नाहीत."पब
 
व्हाईट डिस्चार्जवर उपचार काय?
डॉ. अश्विनी भालेराव-गांधी सांगतात, "व्हाईट डिस्चार्जच्या समस्येने महिला रुग्णालयात आल्यानंतर तिची पूर्ण माहिती घेतली जाते. योनीमार्ग आणि पोटाची तपासणी करून जंतुसंसर्गाचं निदान केलं जातं. त्यानंतर अॅन्टीबायोटीक किंवा योनीमार्गात ठेवण्यासाठी औषधं दिली जातात."
 
तज्ज्ञ सांगतात, की फक्त महिलेलाच नाही. तर तिच्या जोडीदारालाही औषधं दिली जातात. जेणेकरून पुरूषापासून संसर्ग पसरणार नाही. गर्भाशयाच्या मुखाशी गाठ किंवा जखम असल्यास त्याची चाचणी केली जाते.