बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: शनिवार, 4 डिसेंबर 2021 (20:55 IST)

Genome Sequencing म्हणजे काय? कोरोना व्हायरसचं बदललेलं रूप शोधण्यासाठी त्याची किती मदत होते

मयांक भागवत
कोरोना विषाणूच्या जनुकीय संरचनेत बदल झालाय.
सोप्या शब्दात सांगायचं झालं तर, 'प्रत्येक व्हायरसची जनुकीय संरचना वेगळी असते. व्हायरसची जनुकीय संरचना कशी आहे याचा शोध घेणं म्हणजे 'जिनोम सिक्वेंसिंग'.
व्हायरसला स्वत:चा DNA किंवा RNA कोड असतो. A, T, G आणि C या न्यूक्लिओ टाइड्सने व्हायरसची संरचना ओळखली जाते. व्हायरसच्या या संरचनेत मोठा बदल झाला. तर, व्हायरसचा नवीन 'स्ट्रेन' तयार झाला असं वैद्यकीय भाषेत म्हटलं जातं.
याबाबत बोलताना पॅथोलॉजिस्ट डॉ. प्रसाद कुलकर्णी सांगतात, "व्हायरसचा विशिष्ट जनुकीय कोड असतो. व्हायरस मोठ्या प्रमाणात पसरत असताना ही जनुकीय संरचना सतत बदलत असते. काहीवेळा व्हायरसचा व्यवहार बदलतो. तर, संसर्ग होण्याची क्षमता कमी-जास्त होते. व्हायरसच्या संरचनेत मोठा बदल झाली नाही, तर काळजी करण्याचं कारण नसतं."
"व्हायरसच्या जनुकिय संरचनेत बदल झाला आहे का. हे शोधण्यासाठी जुना आणि नवीन दोन्ही व्हायरसना मॅच केलं जातं. जिनोम सिक्वेंसिंगमध्ये बदल जास्त दिसून आला. तर, नवीन प्रकारचा 'स्ट्रेन' असल्याचं समजलं जातं," असं डॉ. कुलकर्णी पुढे सांगतात.
 
'जिनोम सिक्वेंसिंग' चा फायदा काय?
'जिनोम सिक्वेंसिंग' बद्दल बीबीसीशी बोलताना केंद्र सरकारच्या 'काउंसिल ऑफ साइंटिफीक आणि इंडस्ट्रीयल रिसर्च' चे (CSIR) महासंचालक डॉ. शेखर मांडे सांगतात, "व्हायरस म्युटेट झाला आहे का नाही. हे जिनोम सिक्वेंसिंग केल्यानंतर ओळखता येतं. यामुळे व्हायरस कुठे आणि कसा पसरतोय याची माहिती मिळण्यास मदत होते."
 
तज्ज्ञांच्या मते, 'जिनोम सिक्वेंसिंग' चे प्रमुख चार फायदे आहेत.
 
1- व्हायरस कसा पसरतोय. कुठून कुठे जातोय याची माहिती मिळते
 
2- व्हायरसवर उपलब्ध असलेली लस प्रभावी आहे का हे शोधण्यासाठी मदत होते
 
3- नवीन व्हायरस 'स्ट्रेन' मनुष्याला संसर्ग करू शकतो का नाही. याबद्दल संशोधन करता येतं
 
4- नवीन व्हायरस ओळखण्यासाठी याचा फायदा होतो
 
"ब्रिटनहून आलेल्या आणि कोरोना पॉझिटिव असलेल्या प्रवाशांची जिनोम सिक्वेंसिंग आपण करू शकतो. यामुळे आपल्याला खूप महत्त्वाची माहिती मिळू शकते. पण, सद्य स्थितीत भारतात नवीन स्ट्रेन आढळून आलेला नाही. त्यामुळे घाबरण्याची गरज नाही," असं डॉ. मांडे पुढे म्हणतात.
'जिनोम' सर्व्हेलन्सची गरज आहे?
ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवीन 'स्ट्रेन' आढळून आल्यानंतर भारतातही 'जिनोम सिक्वेंसिंग' वाढवण्यात येणार आहे.
 
'जिनोम' सर्व्हेलन्सबद्दल बोलताना डॉ. मांडे पुढे सांगतात, "जिनोम सर्व्हेलन्सची खूप जास्त गरज आहे. व्हायरसमध्ये म्युटेशन सतत होत रहातात. त्यामुळे जिनोम सिक्वेंसिंग करून आपल्याला लक्ष ठेवावं लागेल. नवीन स्ट्रेन आला आहे का? पसरतोय का? याची माहिती 'जिनोम' सर्व्हेलन्सच्या माध्यमातून आपल्याला मिळेल."
 
तर, निती आयोगाचे सदस्य डॉ. पॉल सांगतात, "या स्ट्रेनमध्ये झालेलं म्युटेशन, व्हायरस शरीरातील सेलमध्ये शिरण्याच्या जागेबाबत आहे. यामुळे स्पाईक प्रोटीनमध्ये बदल होतोय. या बदलामुळे व्हायरस शरीरात शिरण्याची शक्यता जास्त निर्माण झाली आहे. हे सर्वात महत्त्वाचं आहे."
 
भारतात 'जिनोम सिक्वेंसिंग' ची सद्यस्थिती
भारतात 'जिनोम सिक्वेंसिंग', 'काउंसिल ऑफ साइंटिफिक आणि इंडस्ट्रीयल रिसर्च' च्या दोन प्रयोगशाळेत करण्यात येतं. पुण्याच्या नॅशलन इंन्स्टिट्युट ऑफ व्हायरॉलॉजी सारख्या प्रयोगशाळेतही 'जिनोम सिक्वेंसिंग' केलं जातं.
दिल्लीतील इंन्स्टिट्यूट ऑफ जिनोमिक्स आणि इंटिग्रेटिव्ह बायोलॉजीमध्ये (IGIB) मोठ्या संख्येने 'जिनोम सिक्वेंसिंग' करण्यात आले आहेत.
 
IGIB चे संचालक डॉ. अनुराग अग्रवाल बीबीसीशी बोलताना सांगतात, "भारतात आत्तापर्यंत कोव्हिड-19 शी निगडीत 4,000 सॅम्पलची जिनोम सिक्वेंसिंग करण्यात आली आहे. ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या नवीन 'स्ट्रेन' नंतर यात आणखी वाढ करण्यात येईल."
"जिनोम सिक्वेंसिंगच्या मदतीने व्हायरसमध्ये नवीन म्युटेशन झालंय का याची माहिती मिळेल. या माहितीचा वापर उपचार पद्धतीबाबत केला जाऊ शकतो," असं डॉ. अग्रवाल पुढे म्हणाले.
 
कोणाची करणार जिनोम सिक्वेंसिंग?
भारतात हा नवीन व्हायरस आला तर नाही. हे ओळखण्यासाठी कोणाची 'जिनोम सिक्वेंसिंग' करण्याची गरज आहे. यावर बोलताना डॉ. अग्रवाल पुढे सांगतात,
 
1- कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमधील ठराविक टक्के रुग्णांची
 
2- परदेशातून येणाऱ्या 100 टक्के पॉझिटिव्ह प्रवाशांची
3- कोरोना बरा झाल्यानंतर पुन्हा संसर्ग झालेल्या व्यक्तींची
 
4- लशीच्या चाचणी प्रक्रियेत सहभाग घेणाऱ्यांची
 
जिनोम सिक्वेंसिंग करण्यात आली पाहिजे, असं मत डॉ. अग्रवाल यांनी व्यक्त केलंय.
 
भारतातील परिस्थितीबाबत बोलताना निती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल सांगतात, "प्रयोगशाळांमध्ये व्हायरसच्या स्ट्रक्चरचा अभ्यास आम्ही करत आहोत. हजारो व्हायरसचं आत्तापर्यंत सिक्वेंसिंग करण्यात आलं आहे. पण, हा नवीन व्हायरस भारतात आढळून आलेला नाही."
तज्ज्ञांच्या माहितीनुसार, जिनोम सिक्वेंसिंग रन करण्यासाठी 24-48 तासांचा अवधी लागतो.
रुग्णांच्या नाकातून नमुने घेतले जातात. रुग्ण पॉझिटिव्ह असेल तर त्याचं सॅम्पल तपासणीसाठी पाठवलं जातं.
 
नवीन व्हायरस 'स्ट्रेन' चा लशीवर काही परिणाम?
कोरोना व्हायरसचा नवीन स्ट्रेन झपाट्याने पसरत असल्याची माहिती, ब्रिटन सरकारने दिली आहे. त्यामुळे या नवीन व्हायरसचा कोरोना लशीवर काही परिणाम होईल का?
यावर बोलताना 'काउंसिल ऑफ साइंटिफीक आणि इंडस्ट्रीयल रिसर्च' चे महासंचालक डॉ. शेखर मांडे म्हणतात, "या नवीन स्ट्रेन चा लशीवर काहीच परिणाम होणार नाही. लशीमुळे शरीरात अॅंटीबॉडी तयार होतात. त्यामुळे कोरोनाविरोधातील लस नक्कीच प्रभावी असेल."
 
ब्रिटनमधील नवीन व्हायरस 'सुपरस्पेडर' आहे ?
निती आयोगाचे सदस्य डॉ. पॉल यांच्या सांगण्यानुसार, "व्हायरसमध्ये झालेल्या बदलामुळे संसर्ग होण्याची शक्यता जास्त वाढली आहे. त्यामुळे आता एकापासून दोन लोकांना याची लागण होण्याची शक्यता आहे. ज्यामुळे हा व्हायरस आता 'सुपरस्प्रेडर' बनला आहे."