मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: सोमवार, 29 नोव्हेंबर 2021 (23:19 IST)

एंडोमेट्रिओसिस: एक असीमित वेदना

युनायटेड स्टेट ची प्रसिद्ध कवयित्री कॅरी गेन्सने २००९ मध्ये तिच्या 'द फाईट' कवितेमध्ये एंडोमेट्रिओसिसच्या त्रासाबद्दल बद्दल लिहिले, ती म्हणते 'तू माझे शरीर मारले, तू माझे मन मारले, तू माझ्या आशा, महत्वाकांक्षा आणि स्वप्ने मारली' तिच्या कवितेतील ह्या तीन ओळींमधून महिलांमधील एंडोमेट्रीओसिसच्या त्रासाची भीषणता लक्षात येते.
 
एंडोमेट्रिओसिस हा एक क्रोनिक विकार असून, हा विकार विविध वेदनेशी संबंधित आहे. यांत मासिक पाळी दरम्यान, संभोग दरम्यान तसेच शौचास आणि लघवी करताना असहाय्य वेदनेला सामोरे जावे लागते. त्याचप्रमाणे मासिक पाळी अनियमित किंवा अधिक रक्तस्राव होणे, थकवा आणि पाय व पाठदुखी सारखे
इतर समस्या देखील होतात.
 
एंडोमेट्रिओसिसचा त्रास कुटुंबातील जवळपास १० पैकी एका स्त्रीला वेगवेगळ्या प्रमाणात असतो. ज्याकडे दुर्लक्ष केल्याने गंभीर समस्येला सामोरे जावे लागते. याचा प्रजनन वयोगटातील महिलांवर दीर्घकालीनपरिणाम होतो, तसेच संबंधित स्त्रीच्या आरोग्यावर आणि मानसिकतेवर देखील एंडोमेट्रिओसिस गंभीर परिणाम करू शकतो. कारण, ह्यामुळे दीर्घकाळ वंध्यत्व येण्याची शक्यता असल्यामुळे, भावनिक त्रास वाढतो. एंडोमेट्रिओसिसच्या काही दुर्मिळ केसेस मध्ये क्लियर सेल कार्सिनोमा म्हणजेच गर्भाशयाच्या कर्करोगाचा धोका दिसून आला आहे.
 
गर्भाशयाच्या आत असलेल्या अस्तराला एंडोमेट्रियम असे म्हणतात, त्यात एंडोमेट्रियल पेशी आणि ग्रंथी असतात. प्रत्येक स्त्रीचे दर महिन्याला गर्भशयातील हे अस्तर वाढते व जर स्त्रीबीज फलित झाले तर ते त्या गर्भाशयाच्या अस्तराला चिकटून तिथे गर्भधारणा होऊ शकते. तसेच जर गर्भधारणा नाही झाली तर त्या स्त्रीला मासिक पाळी येते व ते अस्तर त्याद्वारे बाहेर पडते.
 
दुर्दैवाने, एंडोमेट्रिओसिसचे नेमके कारण अद्याप कळू शकले नाही, तरी ही हार्मोन्स संबंधित समस्या असल्याचे ज्ञात आहे. Endometriosis या आरोग्य समस्येमध्ये महिलांच्या गर्भाशयातील अस्तर जे आतील बाजूने असणे अपेक्षित असते ते त्या महिलेच्या गर्भाशयाच्या बाहेरील बाजूला असते. हे ऊतक गर्भाशयावर किंवा त्याभोवती, अंडाशयांवर आणि फॅलोपियन ट्यूबवर असू शकतात. क्वचितच हे ऊतक गुदाशय आणि गर्भाशयाच्या मागे, उदर आणि श्रोणि (पेरिटोनियम) च्या अस्तरावर देखील आढळतात. ही सर्व क्षेत्रे मासिक हार्मोनल बदलांना प्रतिसाद देतात. अशा स्त्रीला मासिकपाळी येते तेव्हा तिचा रक्तस्त्राव कधी फार तर कधी अति प्रमाणात देखील होऊ शकतो. ज्यामुळे एंडोमेट्रीओसिसची तीव्र वेदना स्त्रीला होते.
 
मुळात शरीरात विविध स्थानांवर एन्डोमेट्रियमचे स्कार टिश्यू बनतात. हे टिश्यू पुढे तीव्र वेदना आणि एंडोमेट्रिओसिसच्या इतर लक्षणांना आमंत्रण देतात. हे स्कार टिश्यू प्रजननासाठी आवश्यक असलेले पेल्विक अवयव नष्ट करून टाकतात, आणि त्यामुळे वंध्यत्व येते. हे प्रक्रियाचक्र दर महीने असच चालू राहते. 
 
रक्त साठून राहिल्याने कधीकधी त्याजागी डिम्बग्रंथि सिस्ट तयार होतात, ज्यांना 'चॉकलेट सिस्ट' असे देखील म्हणतात. गर्भाशयाच्या स्नायूमध्ये आढळणारे एंडोमेट्रियल टिश्यू (एडेनोमायोसिस) मुळे गर्भाशयाला मोठे सूज येते, ज्यामुळे मासिक पाळीदरम्यान वेदना वाढतात, तसेच आतडीचे विकार, ओटीपोट दुखणे, चिडचिड या समस्या देखील एंडोमेट्रिओसिस सोबत उद्भवतात.
 
या समस्ये संबंधित लक्षणांचा पूर्व इतिहास आणि परीक्षणांवर निदान आणि उपचार अवलंबून असतो. पहिल्या टप्प्यामध्ये श्रोणिचे अल्ट्रासाऊंड स्कॅन केले जाते, आवश्यक असल्यास एमआरआय स्कॅन देखील उपयुक्त ठरू शकते. बर्‍याचदा, लेप्रोस्कोपी (अनेस्थेसिया अंतर्गत प्रक्रिया) ज्यामध्ये एक सूक्ष्म दुर्बिण गर्भाशयापर्यंत घेऊन जात, प्रत्यक्षात एण्डोमेट्रिओटिक क्षेत्रची पाहणी केली जाते, आणि त्यानंतर योग्य परीक्षण करून अचूक निदान करणे सहजशक्य होते.
 
यांवर केले जाणारे उपचार मुख्यतः हार्मोनल स्थिती आणि शस्त्रक्रियेशी संलग्न असतात. या समस्येवर सामान्यतः गर्भनिरोधक गोळ्या दिल्या जातात ज्यांत इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉनची संतुलित मात्रा असते. हे नेहमी किंवा काही अंतराच्या गेप ने दिले जातात. इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन यांच्यात संतुलन राखणे
आणि इस्ट्रोजेनिक प्रभाव कमी ठेवणे हे त्याचे उद्दिष्ट असते. त्याचप्रमाणे अनेकवेळा केवळ प्रोजेस्टेरॉनच्या गोळ्या, इंजेक्शनच्या माध्यमातून प्रोजेस्टेरॉनची उत्पत्ती केली जाते. शिवाय, दुसरा आणि प्रभावी पर्याय म्ह्णून इंट्रा युटेरियन सिस्टमचा देखील वापर केला जातो, ज्यांद्वारे गर्भाशयाच्या आत प्रोजेस्टेरॉन सोडले जाते, ज्यामुळे वेदना कमी होते आणि मासिक पाळी हलकी होते.
 
GnRHA (गोनाडोट्रॉफिन रिलीझिंग हार्मोन ऍगोनिस्ट) हे एक अत्यंत प्रभावी माध्यम आहे, कारण ते अंडाशय बंद करून कार्य करतात, ज्यामुळे शरीरातील हार्मोनल पातळी कमी होते, त्यामुळे एंडोमेट्रिओसिस देखील कमी होतात. GnRHA मुळे बॉन लॉस आणि मोनोपॉज सारख्या समस्या देखील उद्भवू शकतात, त्यामुळे याचा केवळ मर्यादित काळासाठीच वापर केला जाऊ शकतो.
 
एंडोमेट्रिओटिकमध्ये जमा एंडोमेट्रिओसिस, सिस्ट्स शस्त्रक्रियेद्वारे काढले जातात. ही शस्त्रक्रिया गर्भाशयात एंडोमेट्रिओसिस कुठवर पसरला आहे यांवर आधारित असते. हि एक यशस्वी प्रक्रिया असून, या शस्त्रक्रियेमुळे बऱ्यापैकी फायदा होतो. शस्त्रक्रियेचा सर्वात सामान्य मार्ग म्हणजे लॅपरोस्कोपिक. त्याहून अधिक गंभीर प्रकरणांमध्ये, लॅपरोटॉमी ही एक राखीव प्रक्रिया आहे ज्यामध्ये पोट कापले जाते.
 
एंडोमेट्रियोसिस च्या काही गंभीर प्रकरणांमध्ये, जर समस्या सारख्या उद्भवत असतील, आणि सिस्टेक्टॉमी करून देखील या समस्येवर तोडगा निघत नसेल, तर हिस्टेरेक्टॉमीचा (यूट्रस चा एक हिस्सा किंवा संपूर्ण यूट्रस काढून टाकणे) अंतिम मार्ग निवडला जाऊ शकतो. केवळ, या शस्त्रक्रियेपूर्वी संबंधित महिलेचे वय आणि तिची प्रजनन स्थिती लक्षात घेतली जाते. तसे पाहिले तर, सर्वसामान्य शस्त्रक्रियेद्वारे गर्भाशय आणि अंडाशयची रचना पूर्ववत करण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र, काही गंभीर प्रकारणांमध्ये दोन्ही अंडाशय जोपर्यंत काढून टाकले जात नाही तोपर्यंत रुग्णाला आराम मिळत नाही. त्यामुळे काही गंभीर केसेसाठी म्हणजेच जर गर्भाशय मोठा किंवा व्याधिग्रस्त असेल, तर हिस्टरेक्टॉमी (गर्भाशय काढून टाकणे) आवश्यक असते. आतडी आणि मूत्राशयाशी संबंधित गंभीर प्रकरणांमध्ये विशेषज्ञ सर्जन या शस्त्रक्रियेचा सल्ला देतो. जर, वंध्यत्वासोबतच असीमित वेदना आणि इतर लक्षणे देखील असतील तर प्रजनन तज्ञ महत्वाची भूमिका बजावतो. असहाय वेदनेसाठी वेदना व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला देखील घेण्यात येतो. मानसशास्त्रीय उपचार, समुपदेशन, नियमित जीवनशैलीसह सकस आहार आणि पुरेसा व्यायाम एंडोमेट्रिओसिसची लक्षणे कमी करण्यात खूप मदत करतात. त्यासाठी, संबधित रुग्ण होमिओपॅथी, आयुर्वेद, रिफ्लेक्सोलॉजी, ऍक्युपंक्चर, ऍक्यूप्रेशर, व्हिटॅमिन सप्लिमेंट्स, TENS (ट्रान्सक्यूटेनियस इलेक्ट्रिकल नर्व्ह स्टिम्युलेशन) या पर्यायी उपचारांचा देखील उपयोग करू शकतात. ह्यांमुळे अनेक सकारात्मक फायदे झालेले आहेत.
 
थोडक्यात सांगायचे तर, एंडोमेट्रिओसिस ही एक तीव्र दुर्बल स्थिती आहे जी प्रजनन व्यायोगटातील स्त्रियांमध्ये समस्या निर्माण करू शकते. याचे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक अनेक परिणाम होतात. सीन मॅके यांनी सांगितले आहे, कि 'क्रोनिक पॅन केवळ शरीराचं किंवा मेंदुचं दुखणं नाही, ते प्रत्येक घटकाला लक्ष्य करतं.“ त्यामुळे, उपचार पद्धतीचा अवलंब करण्यापूर्वी कोणत्या पद्धती आणि साधनांचा अवलंब केल्याने रुग्णाला बरे वाटेल याचा अभ्यास करणारी आणि दूरदृष्टीकोन ठेवून काम करणाऱ्या टीमची आवश्यकता असते.
Dr. Samar Gupte, MD
Consultant Gynecologic & Cancer specialist