शनिवार, 1 ऑक्टोबर 2022
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Updated: शनिवार, 13 नोव्हेंबर 2021 (17:56 IST)

Norovirus : नोरोव्हायरस काय आहे? त्याची लक्षणे काय?

केरळच्या वायनाडमध्ये नोरोव्हायरस नामक एक विषाणू आढळून आला आहे.
 
केरळच्या आरोग्यमंत्री विणा जॉर्ज यांनी शुक्रवारी याबाबत माहिती दिली. त्यांनी लोकांना सतर्क राहण्याची सूचना देऊन यासंदर्भात दिशानिर्देश जारी केले आहेत.
 
उलट्या आणि जुलाब ही या व्हायरसची प्रमुख लक्षणं आहेत.
 
नोरोव्हायरस हा पशूंमधून मानवात दाखल झालेला व्हायरस आहे. दोन आठवड्यांपूर्वी वायनाड जिल्ह्याच्या विथिरी परिसरात पुकोडे गावात हा व्हायरस आढळून आला.
 
इथल्या एका पशू चिकित्सालयातील 13 विद्यार्थ्यांना नोरो व्हायरसची लागण झाल्याची माहिती मिळाली.
 
आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, "परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात आता यश आलं आहे. व्हायरसचा संसर्ग पुढे होत असल्याबाबत कोणतीही नोंद नाही. लोकांमध्ये या व्हायरसबाबत जागरुकता निर्माण करणं तसंच पशू चिकित्सा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची माहिती गोळा करणं, ही कामं सध्या सुरू आहेत."
 
नोरोव्हायरसचा संसर्ग सर्वप्रथम महाविद्यालयाच्या आवाराबाहेरील वसतीगृहामध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आढळून आलं.
 
या विद्यार्थ्यांची चाचणी करून तत्काळ त्यांचे नमुने पुढील तपासासाठी अलाप्पुझा येथील विषाणू विज्ञान संस्थेत (NIV) पाठवण्यात आले. त्यानंतर पीडित विद्यार्थ्यांना नोरो व्हायरसची लागण झाल्याची माहिती समोर आली.
 
यानंतर आरोग्यमंत्री जॉर्ज यांनी आरोग्य अधिकाऱ्यांसोबत एक बैठक घेतली. वायनाड येथील परिस्थितीचा त्यांनी आढावा घेतला.
 
आरोग्य विभागाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, मंत्री जॉर्ज यांनी अधिकाऱ्यांना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठीच्या उपाययोजना वेगाने करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
 
सध्यातरी काळजी करण्याची गरज नसून सर्वांनी सतर्क राहणं जास्त आवश्यक आहे, असं या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.
 
नोरोव्हायरस हा दूषित अन्न आणि पाण्यातून तसंच संसर्ग झालेल्या व्यक्तीमार्फत पसरतो. पाण्याची स्वच्छता करण्यासाठी परिसरात सुपर क्लोरिनीकरण करण्यात येत आहे.
 
केरळच्या आरोग्य मंत्रालयाच्या वतीने जारी करण्यात आलेल्या दिशानिर्देशांनुसार, नोरो व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांनी घरातच राहून आराम करायला हवा. त्यांनी ORS आणि उकळलेल्या पाण्याचं सेवन करावं. जेवण्यापूर्वी तसंच शौचालयाच्या वापरानंतर आपले हात साबणाने स्वच्छ धुतले पाहिजेत. शिवाय जनावरांच्या संपर्कात असणाऱ्या लोकांनी विशेष काळजी घेण्याची गरज असल्याचंही यामध्ये म्हटलं आहे.
 
नोरोव्हायरस हा सुदृढ किंवा निरोगी लोकांवर इतका प्रभावी ठरत नाही. मात्र लहान मुले, वयोवृद्ध व्यक्ती आणि इतर व्याधींनी त्रस्त लोकांना याचा विशेष त्रास होऊ शकतो.
 
नोरो व्हायरसची लक्षणे कोणती?
 
इंग्लंडमध्ये यावर्षी जुलै महिन्यात नोरोव्हायरसच्या संसर्गाची 154 प्रकरणे समोर आली होती. अचानक उलट्या,जुलाब होणं ही या व्हायरसची प्रमुख लक्षणे आहेत.
 
तसंच जोराचा ताप, अंगदुःखी हीसुद्धा या व्हायरसच्या संसर्गाची लक्षणं आहेत. संसर्ग झाल्यानंतर रुग्णांना एक ते दोन दिवसांनंतर याची लक्षणे दिसून येतात. हा व्हायरस अत्यंत वेगाने पसरू शकतो.
 
एक संक्रमित व्यक्ती कोट्यवधी नोरोव्हारसचे कळ पसरवू शकतो. याचा संसर्ग होण्यासाठी केवळ काही कळसुद्धा पुरेसे असतात. संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने तसंच एखाद्याच्या थुंकण्यामुळेही या व्हायरसचा प्रसार होऊ शकतो.
 
सुरक्षात्मक उपाय काय?
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, या व्हायरसपासून सुरक्षित राहण्यासाठी सतत साबण आणि गरम पाण्याने हात धुत राहिले पाहिजेत.
 
कपडे आणि शौचालय स्वच्छ ठेवावेत. पाण्यात ब्लीच टाकून घराची सफाई केली पाहिजे.
 
हा व्हायरस कोरोना व्हायरसप्रमाणे अल्कोहोलने नष्ट होत नाही. तर कपड्यांना 60 अंश सेल्सियस तापमानावरील पाण्याने धुतल्यास हा व्हायरस निष्क्रिय होऊ शकतो.