शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: रविवार, 8 ऑक्टोबर 2023 (16:57 IST)

काही मुलांच्या हृदयाला छिद्र का असतं? यावर काही उपचार आहेत का?

एखाद्या व्यक्तीच्या हृदयात छिद्र असणं हा मुळात जन्मजात दोष आहे. हे छिद्र गर्भधारणेदरम्यान बाळाच्या हृदयाच्या विकासातील समस्यांमुळे होऊ शकतं.
जर समस्या लवकर समजली तर, त्वरित उपचाराने मूल पूर्णपणे बरं होतं. पण उपचाराला उशीर झाला तर मात्र यातील गुंतागुंत वाढते.
 
हृदयात छिद्र कोणत्या ठिकाणी आहे आणि ते किती मोठं आहे यावर उपचार अवलंबून असतात.
 
यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल आणि यूके डिपार्टमेंट ऑफ हेल्थ - एनएचएस आणि तज्ज्ञ डॉक्टरांनी हृदयाच्या छिद्राबद्दल तपशीलवार माहिती गोळा केली आहे.
 
हृदयात छिद्र
मानवी हृदयाला चार कप्पे असतात. वरच्या विभागांना अनुक्रमे उजवा आणि डावा अलिंद आणि खालच्यांना अनुक्रमे उजवा आणि डावा निलय असे म्हणतात.
 
वरच्या दोन अलिंदांना वेगळं करणाऱ्या पडद्याला 'इंटरएट्रियल सेप्टम' म्हटलं जातं. तर खालच्या निलयांना विभागणाऱ्या पडद्यांना 'इंटरव्हेंट्रिक्युलर सेप्टम' म्हटलं जातं.
 
जन्मतःच लहान मुलांच्या हृदयाच्या एखाद्या कप्प्यात छिद्र असू शकते. वरच्या 'ॲट्रियल सेप्टम'मधील छिद्राला 'ॲट्रियल सेप्टल डिफेक्ट' म्हणतात. खालच्या सेप्टममधील छिद्राला 'वेंट्रिक्युलर सेप्टल डिफेक्ट' म्हणतात.
 
या छिद्रांमुळे हृदय आणि फुफ्फुसांदरम्यान रक्त प्रवाह होतो.
 
मानवी शरीराची फुफ्फुसे रक्त तयार होण्यासाठी ऑक्सिजन पुरवतात. आणि ते ऑक्सिजनयुक्त रक्त संपूर्ण शरीरात पोहोचवण्याचे काम हृदय करते.
 
शरीरातील दूषित रक्त प्रथम महाधमनी आणि नंतर उजव्या निलयाद्वारे हृदयाच्या उजव्या अलिंदामध्ये आणले जाते. या निलयातील दूषित रक्त फुफ्फुसाच्या धमन्यांमधून फुफ्फुसात पोहोचते.
फुफ्फुसे दूषित रक्ताला ऑक्सिजनचा पुरवठा करतात. नंतर फुफ्फुसातून शुद्ध केलेले रक्त हृदयाच्या डाव्या अलिंद आणि नंतर डाव्या निलयात प्रवेश करते. हृदयाच्या डाव्या निलयातून हे ऑक्सिजनयुक्त शुद्ध रक्त महाधमनीद्वारे संपूर्ण शरीरात वाहते.
 
जर हृदयाला 'ॲट्रियल सेप्टल डिफेक्ट' असेल तर फुफ्फुसातून होणारा रक्तप्रवाह असामान्य असतो. कारण हे छिद्र रक्ताच्या सामान्य प्रवाहात अडथळा आणते.
 
ऑक्सिजनयुक्त शुद्ध रक्त डाव्या अलिंदामधून वाहते, परंतु छिद्र असेल तर थोडं शुद्ध रक्त उजव्या अलिंदामध्ये ही वाहते. हे शुद्ध रक्त दूषित रक्तामध्ये मिसळते आणि फुफ्फुसात वाहणाऱ्या रक्ताचे प्रमाण वाढवते.
 
जर छिद्र मोठे असेल आणि खूप वर्षांपासून असेल तर हृदय आणि फुफ्फुसांना धोका उद्भवू शकतो.
 
यामुळे फुफ्फुसाच्या धमन्यांमध्ये रक्तदाब वाढतो. त्यानंतर हृदयाला रक्त पंप करण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागते. यामुळे हृदयाच्या झडपांवर अतिरिक्त दबाव येतो. परिणामी हृदयाच्या झडपा खराब होतात.
 
याव्यतिरिक्त, फुफ्फुसाच्या धमन्यांवर उच्च दाब येऊन फुफ्फुसाचे कायमचे नुकसान होऊ शकते. आणि फुफ्फुसे ऑक्सिजन पुरवण्यात अपयशी ठरतात.
 
यामुळे रुग्णाचा मृत्यू ओढवू शकतो.
 
बाळाच्या हृदयात छिद्र का असतं?
हृदयाला छिद्र पडणं हा जन्मजात दोष आहे. म्हणजेच, मूल जन्माला येतानाच त्याच्या हृदयात छिद्र असण्याची शक्यता असते. बाह्य कारणांमुळे हृदयाला छिद्र पडल्याचे कोणतेही पुरावे अस्तित्वात नाहीत.
 
गर्भाशयात, बाळाचे हृदय एका नळीद्वारे विकसित होत असते. ती नळी नंतर चार कप्प्यांमध्ये विभागली जाते. या कप्प्यांचे दोन भाग वेगळे करण्यासाठी पडदा लावला जातो.
 
जर या प्रक्रियेदरम्यान काही अडचणी आल्या तर छिद्र पडू शकतात असं बांगलादेश चिल्ड्रन हॉस्पिटलच्या चाइल्ड कार्डिओलॉजी विभागाच्या प्रमुख आणि वरिष्ठ सल्लागार डॉ. खलिफा महमूद तारिक सांगतात.
 
डाउन सिंड्रोमसारख्या अनुवांशिक समस्यांमुळे बाळाच्या हृदयाला छिद्र पडू शकते.
याशिवाय, गरोदरपणाच्या पहिल्या काही महिन्यांत आईला रुबेला झाला असेल, तर बाळाच्या हृदयाला छिद्र पडण्याचा धोका किंवा हृदयाच्या समस्या उद्भवू शकतात.
 
आईला अनियंत्रित मधुमेह असेल किंवा गरोदरपणात मातेला विषाणूजन्य संसर्ग झाला असेल किंवा गरोदरपणात माता कुपोषणाने पीडित असेल तर बाळाला हृदयाच्या समस्येचा धोका संभवतो.
 
आईला अल्कोहोल आणि तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करण्याची सवय असेल किंवा औषध सुरू असतील तर त्याचा परिणाम होऊ शकतो.
 
तसेच, गरोदरपणात फिट येणारी औषधे, कोलेस्टेरॉल कमी करणारी औषधे, चेहऱ्यावरील मुरुमांची औषधे आणि मानसिक विकारांसाठी औषधे घेत असल्यास त्याचाही बाळावर विपरीत परिणाम होऊ शकतो.
 
त्याचप्रमाणे वरील कोणत्याही स्पष्ट कारणाव्यतिरिक्त बाळाच्या हृदयात छिद्र पडू शकते.
 
लक्षणे
मुलं जसजशी मोठी होतात तसतशी त्यांची धावपळ वाढत जाते. त्यामुळे हृदयावरील दाब वाढतो. त्यानंतर ही लक्षणे दिसू लागतात.
 
हृदयातील छिद्राच्या आकारावर लक्षणे अवलंबून असतात.
 
जर छिद्र लहान असेल तर, मूल जोरजोरात श्वास घेते, वारंवार खोकला आणि श्वासोच्छवासाचा त्रास होतो. श्वसनमार्गाचे संक्रमण किंवा न्यूमोनिया होण्याची शक्यता असते.
 
तो त्याच्या वयाच्या इतर मुलांप्रमाणे जास्त धावूखेळू शकत नाही. थोडासा व्यायाम केल्याने किंवा पळल्याने अशी मुलं थकतात. त्यांना वारंवार अशक्तपणा जाणवतो.
 
अनियमित हृदयाचे ठोके, छिद्रांमधून रक्त वाहण्यामुळे हृदयात डबडब असा आवाज येतो. कधी कधी छातीचे स्नायू जोरजोरात धडधडू लागतात.
 
सतत ताप येतो
भूक लागत नाही.
जेवताना थकवा येतो, घाम येतो.
रडत असताना गुदमरणे.
शारीरिक वाढ न होणे, वयानुसार वजन वाढत नाही.
कामात किंवा अभ्यासात एकाग्रता नसते.
पाय, पोटऱ्या, पोट सुजणे.
 
छिद्र मोठे असल्यास, वरील समस्यांव्यतिरिक्त मुलाला उच्च रक्तदाबाचा त्रास होतो. फुफ्फुसांना पुरेसा रक्तपुरवठा होत नसल्यामुळे, ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मुलाचे ओठ आणि जीभ निळी पडतात.
 
अशी लक्षणे दिसू लागताच, उशीर न करता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
 
उपचार
छिद्र आहे की नाही किंवा ते किती मोठं आहे यासाठी छातीचा एक्स-रे, इलेक्ट्रोकार्डियोग्राम (ईकेजी), इकोकार्डियोग्राम, कार्डियाक कॅथेटेरायझेशन इत्यादी चाचण्या केल्या जातात.
 
हृदयाच्या छिद्राचा आकार आणि स्थान यावर त्याचे उपचार अवलंबून असतात. लहान छिद्र काही महिन्यांनंतर आपोआपच बंद होतात.
 
हृदयातील हे छिद्र लहान आहे की मोठे हे रुग्णाच्या वयावर अवलंबून असते.
 
यावर डॉ. तारिक सांगतात, "एखाद्या प्रौढ व्यक्तीसाठी, चार ते पाच मिलिमीटरचे छिद्र खूपच लहान असते. परंतु लहान मुलांच्या दृष्टीने हे छिद्र खूप मोठे असते."
 
हृदयातील छिद्रांमुळे दूषित आणि शुद्ध रक्त एकमेकांत मिसळते. जर छिद्र लहान असेल तर रक्त कमी प्रमाणात मिसळलं जातं. जर छिद्र मोठं असेल तर रक्त मिसळण्याचं प्रमाणही जास्त असतं.
 
अशावेळी काही लहान छिद्रांच्या प्रकरणामध्ये छिद्र बंद होईपर्यंत, फुफ्फुसातील अतिरिक्त रक्तदाब कमी करण्यासाठी औषधे दिली जातात.
 
मात्र, लहान मुलांमध्ये ही गुंतागुंत टाळण्यासाठी सुरुवातीलाच शस्त्रक्रिया आवश्यक असते.
 
जर छिद्र रक्तवाहिनीच्या झडपेच्या अगदी जवळ असेल तर शस्त्रक्रियेशिवाय दुसरा पर्याय नाही.
शस्त्रक्रिया सामान्यतः बाळाच्या जन्मानंतर पहिल्या काही आठवड्यांत ते काही महिन्यांत केली जाते. शाळेत प्रवेश घेण्यापूर्वी शस्त्रक्रिया करून घेणं उत्तम.
 
शल्यचिकित्सक छातीच्या भिंतीमध्ये एक उपकरण लावून शस्त्रक्रिया करतात.
 
शस्त्रक्रियेनंतर सहा महिन्यांच्या आत जखम भरून येते.
 
कार्डियाक कॅथेटेरायझेशनद्वारे देखील शस्त्रक्रिया केली जाते. यासाठी मुलाच्या पायातील रक्तवाहिनीमध्ये पातळ, लवचिक नळी (कॅथेटर) टाकून हृदयाकडे नेली जाते. या कॅथेटरवर जाळीसारखे उपकरण ठेवलेले असते.
 
त्यानंतर हे उपकरण हृदयाच्या छिद्रात टाकले जाते आणि छिद्राभोवती पडद्यावर जाळी पसरवली जाते.
 
कालांतराने, शरीरात नवीन पेशी तयार होतात. किमान सहा महिन्यांत हे उपकरण शरीराचाच भाग बनते.
 
या प्रकारची शस्त्रक्रिया नॉन-इनवेसिव्ह असल्याने, कमी वेळ लागतो आणि मुलं लवकर बरी होतात.
 
मात्र, छिद्र खूप मोठे असेल किंवा छिद्र गुंतागुंतीच्या ठिकाणी असेल तर ओपन हार्ट सर्जरीशिवाय पर्याय नाही. बाळ दोन महिन्यांचे झाल्यानंतर ही शस्त्रक्रिया करता येते.
 
मुलाच्या हृदयात छिद्र आढळून आल्यास काय काळजी घ्याल?
मुलाच्या हृदयात छिद्र आढळून आल्यास त्याला नियमित औषध देण्याबरोबरच त्याची अधिक काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टर देतात.
 
खेळ, धावणे किंवा अंगमेहनतीचे काम टाळले पाहिजे.
जर छिद्र मोठे असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने लवकरात लवकर शस्त्रक्रिया करून घेणं चांगलं. त्यामुळे मूल पटकन सामान्य जीवन जगू शकते.
उपचारानंतर मुलांचं बारकाईने निरीक्षण करायला हवं. यासाठी डॉक्टरांकडे रूटीन चेकअप आवश्यक आहे.
योग्य वेळी उपचार न केल्यास छिद्र आणखीन मोठं होऊ शकतं.
यामुळे एंडोकार्डिटिस, हृदयाच्या आतील पृष्ठभागावर रक्ताचा जीवाणूजन्य संसर्ग, हृदयाच्या झडपांचे नुकसान, एरिथमिया आणि किंवा हृदयविकाराचा झटका देखील येऊ शकतो.
 








Published By- Priya Dixit