गुरूवार, 28 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: गुरूवार, 26 नोव्हेंबर 2020 (15:10 IST)

आयुष मंत्रालय Guideline : इम्यून सिस्टम मजबूत कसे करावे, जाणून घ्या

संपूर्ण देश सध्या कोरोनाच्या साथीने लढत आहे. या साथीच्या आजाराला टाळण्यासाठी आपल्याला आरोग्याची काळजी घेणं आणि स्वतःला निरोगी ठेवणं आवश्यक आहे. जेणे करून कोणताही रोग आपल्यावर प्रभुत्व मिळवू शकणार नाही. या साठी आपली प्रतिकारक क्षमता चांगली असावी लागते. या सर्व बाबीला लक्षात घेता आयुष मंत्रालयाने कोरोना व्हायरसच्या संकटाच्या वेळी स्वतःची काळजी आणि रोग प्रतिकारक शक्ती बळकट करण्यासाठी काही सूचना जाहीर केल्या आहेत. ज्यांना पाळून आपण आपली प्रतिकारक शक्ती सुदृढ करू शकतो. 
 
* दिवसभर फक्त गरमपाणी प्यावं.
 
* व्यायाम- आयुष मंत्रालयाने सल्ला दिला आहे की दररोज किमान 30 मिनिटे योग केले पाहिजे. या मध्ये प्राणायाम आणि ध्यान यांचा समावेश करावा.
 
* आहार - आपल्या आहारात हळद, जिरे, धणे आणि लसूण इत्यादींचा समावेश नक्की करा. हे सर्व पदार्थ आपल्या प्रतिकारक शक्तीला बळकट करण्यात मदत करतात. 
 
* च्यवनप्राश घ्या- दररोज 1 चमचा च्यवनप्राशचे सेवन करावे. जे मधुमेहाचे रोगी आहेत, ते शुगरफ्री असलेले च्यवनप्राश घेऊ शकतात.

* हर्बल चहा - हर्बल चहा आपल्या दररोजच्या दिनचर्येचा एक भाग बनवा. तुळस, दालचिनी, काळीमिरी, सुंठ, मनुका घालून काढा बनवून दिवसातून 2 वेळा घ्यावा. यामध्ये आपण गूळ आणि ताजे लिंबू देखील मिसळू शकता.
 
* हळदीचं दूध - हळदीच्या दुधाचे सेवन नक्की करावे. गरम दुधात अर्धा चमचा हळद मिसळा, हे आपण दिवसातून 1 ते 2 वेळा घेऊ शकता.
 
* सकाळ संध्याकाळ तीळ किंवा नारळाचं तेल किंवा साजूक तुपाचा वापर करू शकता. याला आपल्या नाकाच्या छिद्रात लावा.
 
* 1 चमचा तिळाचे किंवा नारळाचं तेल तोंडात घेऊन 2 ते 3 मिनिटे तोंडात ठेवून गुळणे करा. नंतर गरम पाण्याने गुळणे करा. असे दिवसातून 2 वेळा करावे.
 
* दिवसातून किमान 1 वेळा पुदीन्याची पाने आणि ओवा टाकलेल्या पाण्याची वाफ घ्यावी. 
 
* जर आपल्याला खोकला किंवा घशात खवखव होत असल्यास लवंगाची पूड गूळ किंवा मधात मिसळून दिवसातून 2 ते 3 वेळा चाटण घ्या.
 
हे उपाय कोरडा खोकला आणि घशाच्या खवखवीसाठी फायदेशीर आहे, तरी पण हे लक्षण कायम राहिल्यास तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. वरील दिलेल्या सर्व उपायांना आपल्या सोयीनुसार वापरा. हे उपाय देशातील नामांकित वैद्याने सांगितलेले आहेत, जे संक्रमणविरुद्ध रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यास सक्षम आहे.