शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: शनिवार, 12 डिसेंबर 2020 (09:54 IST)

अल्झायमरवरील नियंत्रणासाठी

अल्झायमर हा वार्धक्याशी संबंधित विकार असला तरी 65 वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तीलाही तो जडू शकतो. वयोपरत्वे अल्झायमरची तीव्रता वाढू लागते. हा डिमेन्शियाचा सर्वसाधारणपणे आढळून येणारा विकार आहे. यामुळे माणसाची विचार करण्याची शक्ती आणि पद्धत, स्मरणशक्ती आणि वागणूक यावर परिणाम होतो. मेंदूतल्या पेशी मृतवत झाल्याने अल्झायमर जडतो. हा विकार पूर्णपणे बरा करणे शक्य नसले तरी औषधोपचारांनी नियंत्रण मिळवता येते. अल्झायमरमागील नेमकी कारणे आप स्पष्ट झालेली नाहीत. मेंदूत अॅशमिलॉइड प्लाक आणि ताउ टँगल्स या घटकांची निर्मिती झाल्याने स्मरणशक्तीवर परिणाम होऊ लागतो, असे तज्ज्ञ सांगतात. यामुळे मज्जासंस्थेच्या पेशींच्या कार्यात अडथळे येऊन मेंदूतल्या पेशी नष्ट होतात. अल्झायमरच्या रूग्णांच्या मेंदूत विशिष्ट रसायनांची कमतरता निर्माण होते. यामुळे संदेशवहन योग्य पद्धतीने होत नाही. अर्थात या सगळ्यामागचे कारण माहीत नसले तरी काही गोष्टी याला कारणीभूत ठरू शकतात. वाढते वय हे हा विकार जडण्या मागचे महत्त्वाचे कारण असते. 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना हा विकार जडण्याची शक्यता दुपटीने जास्त असते. महिलांना अल्झायमर जडण्याची शक्यता अधिक असते. यामागे 
अनुवांशिक कारणेही असू शकतात.
 
छोट्या-छोट्या गोष्टींचे विस्मरण होणे, दररोजच्या वापरातल्या लहानसहान वस्तू विसरणे, बोलताना अडखळणे, शब्द न आठवणे, रस्ता विसरणे, आधी बोलल्यापैकी काहीही न आठवणे ही याची लक्षणे आहेत. काळानुसार लक्षणे तीव्र होत जातात. लक्षणांचे दुष्परिणाम जाणवू लागतात. रुग्ण सतत तेच तेच बरळू लागतो. त्याला अस्तित्वात नसणार्याव गोष्टींची जाणीव होऊ लागते. दैनंदिन कामांमध्ये अडचणी जाणवतात. सतत मेंदू कार्यरत ठेवणे, मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्टेरॉलवर नियंत्रण ठेवणे, मद्यपान, धूम्रपान टाळणे,ताज्या पालेभाज्या, फळे, सुकामेवा यांचा समावेश करणे, आनंदी राहणे, ताणतणाव कमी करणे, अल्झायमरशी संबंधित पदार्थ खाणे टाळणे, भरपूर पाणी पिणे, साखर, मिठाचे प्रमाण नियंत्रणात ठेवणे अशा उपायांनी अल्झायमरवर नियंत्रण ठेवता येईल किंवा त्याचे धोके कमी करता येतील.
मनोज मनोहर