शुक्रवार, 31 मार्च 2023
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified शुक्रवार, 27 जानेवारी 2023 (15:31 IST)

तुमच्या शरीरात लोहाचं प्रमाण कमी झालंय, हे कसं ओळखाल?

तुम्हाला सतत थकवा येतो का? श्वास घेण्यात अडथळा येतो का, सारखी धाप लागते का? तुमची त्वचा निस्तेज झाली आहे असं तुमचे मित्र तुम्हाला सांगतात का?  असं असेल तर तुमच्या रक्तामध्ये लोहाचं प्रमाण कमी झालं असण्याची शक्यता आहे. लोहाचं प्रमाण कमी असणं ही जगभरात पोषणाच्या संदर्भातली एक समस्याच झाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार जगभरातील 30 टक्के लोकांना अॅनिमिया म्हणजे रक्तक्षय झालेला आहे. 
 
रक्तक्षय झालेल्या व्यक्तीच्या रक्तातील तांबड्या पेशींमध्ये खनिजांची कमतरता निर्माण होते, त्यामुळे या पेशींपर्यंत ऑक्सिजन कमी प्रमाणात पोहोचू लागतो. 
या स्थितीत तुम्ही स्वतःच स्वतःचं निरीक्षण करून उपचार घेणं अपेक्षित नाही.
 
कारण ही लक्षणं एखाद्या दुसऱ्या आजाराचीही असू शकतात. स्वतःच लोहयुक्त पदार्थ जास्त खायला सुरू करणं हे यकृतासाठी धोकादायक ठरू शकतं.
 
त्यामुळे हा निर्णय स्वतः घेऊ नये, कोणत्याही आजाराचं निदान हे तज्ज्ञ डॉक्टरांद्वारेच करून घ्यावं, उपचारही त्यांच्याच सल्ल्याने घ्यावेत. 

डॉक्टरांकडे कधी जावं 
फारच थकवा आणि ताकद गेल्यासारखं होणं 
धाप लागत असेल, श्वास घ्यायला त्रास होत असेल 
हृदयाचे ठोके वेगाने पडत असतील तर 
त्वचा पिवळसर दिसत असेल तर 
युनायटेड किंग्डमची आरोग्य सेवा एनएचएस आणि मेयो क्लिनिकच्या माहितीनुसार ही रक्तक्षयाची सामान्य लक्षणे आहेत. 
 
याशिवाय काही इतर लक्षणे आहेत 
 
डोकेदुखी आणि चक्कर येणं 
जीभ सुजणं किंवा दुखणं 
भरपूर केस गळणं 
कागदासारख्या अखाद्या गोष्टी खाव्याश्या वाटणं 
तोंड येणं नखं खराब होणं 
सतत पाय हलवण्याची सवय असणं 

 रक्तक्षय होण्याची कारणं काय? 
अॅनिमिया म्हणजे रक्तक्षय होण्याची अनेक कारणं असू शकतात. यातलं मुख्य कारण म्हणजे आपल्या आहारात लोहाचं प्रमाण कमी असणं.
 
हे खनिज आपलं शरीर आपोआप तयार करू शकत नाही. ही कमतरता भरून काढण्यासाठी लोहयुक्त पदार्थ भरपूर खाण्याचा विचार करत असलात तर आपले शरीर सर्वप्रकारचे लोह ग्रहण करू शकत नाही हे सुद्धा तुम्हाला माहिती हवे. 
 
लोह हे हेम आणि नॉन-हेम या दोन प्रकारचं असतं. हेम लोक लाल मांस, यकृत, अंडी, मासे यातून मिळतं आणि ते सहज पचवलं जाऊ शकतं.
 
याशिवाय गडद हिरव्या रंगाच्या भाज्या म्हणजे पालकासारख्या भाज्या आणि डाळींमध्येही लोह असतं. पण हे लोक नॉन हेम प्रकारातलं आहे.  
याचाच अर्थ भाज्यांतून मिळणारं लोह तुम्ही मोठ्या प्रमाणात पचवू शकत नाही.
 
त्याचप्रमाणे खनिजयुक्त ब्रेड, ब्रेकफास्ट सिरियल्स म्हणजे ओट्ससारख्या पदार्थांत लोह असतं पण ते पचवणं सहज शक्य नाही.  
 
कॉफी पिण्यापूर्वी थोडा विचार करा... 
तुम्ही काय खाता याबरोबर तुम्ही काय पित आहात याकडेही लक्ष देणं गरजेचं आहे. तुम्ही यातून किती प्रमाणात लोक मिळवत आहात हे पाहाणं गरजेचं आहे. 
 
याबद्दल बीबीसीने पोषणतज्ज्ञ पॉल शार्प यांच्याशी चर्चा केली. त्यांनी लंडनमधील किंग्ज कॉलेजमध्ये पचनक्रिया समजून घेण्यासाठी काही प्रयोग केले होते. 
 
अन्न पचवण्याच्या क्रियेत सहभाग घेणाऱ्या स्रावांचा परिणाम आणि आतड्याच्या कोशिकांमध्ये होणाऱ्या रासायनिक अभिक्रियेला दाखवण्यात आलं.
आपलं शरीर किती लोह ग्रहण करू शकतं हे यातून समजून घ्यायचं होतं. जर तुम्ही नाश्त्याबरोबर संत्र्याचा रस घेतलात तर खाण्याऐवजी या पेयातून तुम्हाला जास्त लोह मिळेल, असं पॉल शार्प यांनी या प्रयोगात सांगितलं. 
 
संत्र्याच्या रसात सी व्हिटॅमिन असतं आणि त्यामुळे शरीरात लोह शोषून घेणं सोपं जातं.
 
पण तुम्ही नाश्त्याच्यावेळेस कॉफी घेतलीत तर कमी प्रमाणात लोह तुमच्या शरीरात शोषलं जाईल. 
 
तसं करायचंच असेल तर नाष्ट्यानंतर 30 मिनिटे थांबून कॉफी प्यावी. 
 
हिरव्या भाज्या 
लोहासाठी कोबी हासुद्धा एक चांगला स्रोत आहे. फक्त तो शिजवल्यामुळे, गरम केल्यामुळे त्यातलं लोह कमी होऊ शकतं हे लक्षात ठेवा.
 
संत्र्याप्रमाणेच कोबीमध्येही सी व्हिटॅमिन असतं. पण तुम्ही जेव्हा ही भाजी पाण्यात उकळता तेव्हा त्यातलं व्हिटॅमिन सी पाण्यात विरघळून जातं. त्यामुळे जर तुम्हाला पोषणमूल्यं हवी असतील तर ते कच्चं किंवा वाफवून खावे.
 
लोह आणि सी व्हिटॅमिन असणाऱ्या इतर भाज्याही अशाच प्रकारे खाव्यात. पण पालक याबाबतीत वेगळा आहे. उकळल्यामुळे पालक 55 टक्के अधिक वापरण्यायोग्य लोह स्रवतो असं शार्प सांगतात. 
 
“पालकातली ऑक्सेलेट लोहाला बांधून ठेवतात.” शार्प सांगतात, “आपण जेव्हा पालक उकळतो तेव्हा तो पाण्यात ऑक्सेलेट सोडतो आणि त्यामुळे लोह शोषलं जाण्याची शक्यता वाढते.” 
गव्हातलं फायटिक एसिट हे शरीरातलं लोह कमी प्रमाणात शोषलं जातं.
 
ज्या ब्रेडमध्ये यिस्ट तयार होत नाही असा ब्रेड चांगला समजला जातो.  
 
तुम्हाला सतत थकवा जाणवत असेल तर डॉक्टरांचा जरूर सल्ला घ्या.
 
कदाचित या थकव्यामागे काही दुसरं गंभीर कारण असू शकतं. सप्लीमेंट, गोळ्या घेण्याआधी तुमच्या फॅमिली डॉक्टरला जरूर विचारा कारण त्यांच्या अतिसेवनाचे गंभीर परिणाम होऊ शकतात.
 
Published By- Priya Dixit