शांत झोपेसाठी...
झोपायची तयारी सुरू असताना गॅझेट्स दूर ठेवा. सोशल नेटवर्किंग साईट्स, व्हाट्स अपमुळे आपण लोकांच्या सतत संपर्कात असतो. आपल्या झोपेवर गॅझेट्सचा विपरित परिणाम होऊ लागलाय. झोपेच्या वेळेत काम आणू नका. झोपण्याच्या तासभर आधी गझेट्सपासून लांब राहा.
* झोपेची पद्धत ठरवा. ठरलेल्या वेळी पलंगावर जा. वेळेत झोपा. सकाळी लवकर उठा. झोपण्याची आणि उठण्याची वेळ निश्चित करा. 7 ते 8 तास झोप घ्या.
* खोलीतीलं वातावरण झोपेसाठी योग्य असू द्या. झोपण्याआधी दिवे बंद करा. आजूबाजूला आवाज होत नाही ना याकडे लक्ष द्या. खोलीत शांतता असू द्या.
* पलंगावर आपल्या आवडीची चादर अंथरा. फुलाफुलांचं नक्षीकाम असलेली किंवा तुमच्या आवडीच्या रंगाची चादर आणा. झोपल्यावर तुम्हाला आरामदायी वाटायला हवं.
* झोपण्याआधी भीतीदायक चित्रपट किंवा दृश्य बघू नका. यामुळे झोपेत अडथळे येऊ शकतात.
* सतत कार्यरत रहा. नियमित व्यायाम करा. व्यायामामुळे तुम्हाला शांत झोप लागते. झोपण्याच्या तीन ते चार तास आधी व्यायाम करता येईल.
* झोपण्यापूर्वी आंघोळ केल्यानेही शांत झोप लागेल.